राष्ट्रवादी की भाजप असे ‘तळ्यात-मळ्यात’ करणारे भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांचा अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही. लांडगे यांनी जाणीवपूर्वक राजकीय संभ्रमावस्था निर्माण केली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोसरीत येऊन थेट लांडगे यांच्या कार्यालयात हजेरी लावल्याने सर्वाच्या भुवया उंचावल्या असून राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
राष्ट्रवादीच्या तिकिटावर नगरसेवक व पुढे जाऊन स्थायी समिती अध्यक्ष झालेले महेश लांडगे भोसरी विधानसभेतून अपक्ष निवडून आले. राज्यातील सत्तेच्या राजकारणात अपक्षांची नितांत आवश्यकता असल्याने सुरुवातीपासून भाजपवाले लांडगे यांना गोंजारत आहेत. मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी लांडगे यांनाही सत्ताधारी पक्षाच्या ‘कृपादृष्टी’ची आवश्यक आहे. राज्यात भाजपची तर पिंपरी महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आहे. दोन्हीकडे लांडगे यांचा खुला वावर आहे. राष्ट्रवादीच्या मेळाव्यांना, बैठकांना अजितदादांच्या बरोबरीने लांडगे हजर असतात. दुसरीकडे, भाजपमध्ये पालकमंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वाचे निकटवर्तीय बनले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पक्षप्रवेशाविषयी संभ्रमावस्था आहे. ते राष्ट्रवादीत परततील, असा सूर त्यांचे राष्ट्रवादीतील समर्थक आळवत असतात, तर त्यांनी भाजपमध्ये राहावे, यासाठी भाजपमधून मोठे प्रयत्न सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे तिकीट मिळावे म्हणून लांडगे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. ते निवडून आल्यानंतर आता ‘झालं-गेलं’ विसरून त्यांनी शिवसेनेत यावे, यासाठी सेनेकडूनही बरेच प्रयत्न होत आहेत. तथापि, सेनेऐवजी लांडगे यांचा ओढा भाजपकडे आहे. मात्र, त्यांचा राष्ट्रवादीच्या घरात असलेला पाय निघत नाही, अशी परिस्थिती आहे. शनिवारी एका कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री भोसरीत आले. तेव्हा ते लांडगे यांच्या कार्यालयात आवर्जून आले आणि जवळपास अर्धा तास थांबले. भोसरीकरांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. तेव्हा विविध प्रश्नांचे निवेदन लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले, त्यावर योग्य कार्यवाही करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यानंतर, राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.