मालाडच्या मालवणी भागात विषारी दारूमुळे झालेल्या दुर्घटनेचा संदर्भ देत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व नगरसेवकांना उद्देशून चांगल्याच कानपिचक्या दिल्या. दारू पिणाऱ्याला निमित्तच लागते. निवडून आला तरी पितो, पडलो म्हणूनही पितो. पद मिळाले म्हणून आनंदात पितो, न मिळाल्यास द:ुख झाले म्हणून पितो, अशा शब्दात त्यांनी दारू पिणाऱ्यांची हजेरी घेतली.
यशवंतराव चव्हाण रूग्णालयातील रक्तपेढीचे उद्घाटन, साई चौकातील भुयारी मार्गाचे उद्घाटन, जिजामाता रूग्णालयाचे भूमिपूजन, चिंचवडला सावित्रीबाई फुले रूग्णालयाचे उद्घाटन अजितदादांच्या हस्ते झाले. तेव्हा चिंचवडच्या सभेत ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, महापौर शकुंतला धराडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, आयुक्त राजीव जाधव, पक्षनेत्या मंगला कदम, माजी महापौर आझम पानसरे, योगेश बहल, अपर्णा डोके आदींसह मोठय़ा संख्येने राष्ट्रवादीचे नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
पवार म्हणाले, जो कोणी दारू पित असेल, त्याने ती तातडीने बंद करावी. मांजराला वाटते आपल्याला दूध पिताना कोणी पाहत नाही; तसे नसते. आपल्यातील दारू पिणाऱ्यांची तशी अवस्था आहे. कोण कुठे आणि कोणासोबत ‘बसतो’ याची बित्तंमबातमी आपल्यापर्यंत पोहोचते. दारूमुळे आयुष्य उद्ध्वस्त होते, हे लक्षात घ्या. पुढची पिढी निव्र्यसनी असली पाहिजे, त्यादृष्टीने प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी केले. रूग्णालयातील विद्युत तसेच स्थापत्य विभागाच्या निकृष्ट कामांचा उल्लेख करून दोन महिन्यात त्यात सुधारणा करण्याची तंबी त्यांनी दिली. वेळप्रसंगी दोन-चार अधिकारी घरी घालवा. मुंबई जलमय झाल्याचा संदर्भ देत रस्ते, नाल्यांची योग्य खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या

‘महेश लांडगेचे योग्य वेळी पाहू’
´पिंपरी पालिकेच्या निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करणार अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली. पिंपरी मतदारसंघ फाजील आत्मविश्वासामुळे, भोसरी बंडखोरीमुळे तर चिंचवड मोदी लाटेमुळे हातातून गेल्याचे सांगत संजोग वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची नव्याने बांधणी होईल, असे ते म्हणाले. महेश लांडगे भाजप की राष्ट्रवादीत, या प्रश्नावर ते म्हणाले, जोपर्यंत लांडगे आमच्यासोबत आहेत, तोपर्यंत त्याविषयी काही बोलणार नाही, योग्य वेळी पाहू, असे सूचक विधान त्यांनी केले.

Story img Loader