पुणे मेट्रोसाठी प्रामुख्याने भूमिगत मार्गाचा विचार करणे आवश्यक आहे. भूमिगत मार्ग उंचावरून जाणाऱ्या मार्गापेक्षा महाग, हा भ्रम आहे, असे मत रेल्वेच्या संचालक मंडळाचे सदस्य आणि रेल्वे तज्ज्ञ दिलीप भट यांनी व्यक्त केले.
इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअर्सच्या पुणे चॅप्टर व मराठी विज्ञान परिषदेतर्फे पुणे मेट्रोबाबत आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनीअर्सचे व्ही.एन. शिंदे, उद्योगपती अरूण फिरोदिया आदी उपस्थित होते.
मेट्रोच्या मार्गाबाबत ते म्हणाले की, पुणे मेट्रोचा विचार करताना शहराचा सर्वागीण विचार करणे गरजेचेआहे. मेट्रोचा मार्ग ठरवताना व्यावहारिक विचार आवश्यक आहे. दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनतर्फे पुण्यासाठी ‘मीडिअम क पॅसिटी मेट्रो’ सुचवण्यात आली आहे, मात्र पुण्याला त्याची गरज नाही, त्यामुळे मेट्रोच्या एकूणच खर्चात वाढ होते. पुण्यासाठी ‘लाईट कपॅसिटी मेट्रो’ फायद्याची आहे. त्यामुळे खर्चात मोठय़ा प्रमाणावर बचत होईल.
दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने पुणे मेट्रोबाबत दिलेल्या अहवालाबद्दल ते म्हणाले की, डिएमआरसीच्या अहवालात बऱ्याच त्रुटी आहेत. तो अहवाल डोळसपणे स्वीकारला पाहिजे. त्यासाठी पुण्याची भौगोलिक परिस्थिती, पुण्याची नगररचना, हवामान आदींचा विचार केला पाहिजे. पुण्याचे हवामान लक्षात घेता वातानुकूलित स्थानकांचा आग्रह सोडला पाहिजे.
पुणे मेट्रोबाबत सुरू असलेल्या एलेव्हेटेड की भूमिगत याबाबत ते म्हणाले की, एलेव्हेटेड मार्गाचा आग्रह धरताना पुण्यातील रस्त्यांचा विचार करणे आवश्यक आहे. कारण या प्रकारच्या मार्गासाठी रस्त्याची रूंदी ही जास्त असण्याची गरज आहे, जेणेकरून रस्त्यावरील वाहतुकसुद्धा सुरळीत चालू शकेल, मात्र पुण्यातील जंगली महाराज किंवा कर्वे रस्ता हे अतिशय अरूंद रस्ते आहेत, त्यामुळे हा आग्रह सोडला पाहिजे. कोणत्याही एका प्रकारास सरसकट विरोध न करता दोन्हा प्रकारांची सांगड घालून पुणे मेट्रोचा विचार व्हावा, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमात वेगवान रेल्वेसाठी ‘न्यू जनरेशन ब्रेकिंग सिस्टीम’ विषयी जर्मनी येथील एका स्पर्धेत पुरस्कार मिळवलेला ज्ञानगंगा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी पराग पाटील याचा विशेष सत्कार करण्यात आला.

Story img Loader