माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कारभार असलेल्या आणि बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीत सध्या पक्षपातळीवर कमालीची अस्वस्थता आहे. ताकदीचे नेते असूनही संघटनेत समन्वयाचा अभाव आहे. विरोधक आक्रमक झाले आहेत. सत्तेच्या माध्यमातून केलेल्या घोटाळ्यांची मालिका दिवसेंदिवस उघड होत आहे. कारभारावर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे, ‘साहेब’, पिंपरीतही लक्ष घाला, असा सूर पक्षवर्तुळात आहे.
आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी पुणे महापालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक घेणार असून प्रलंबित विकासकामांविषयी चर्चा करणार आहेत. त्याचपध्दतीने, ‘साहेबांनी’ पिंपरीतही लक्ष घालावे आणि वर्षांनुवर्षे रखडलेल्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करावी, असा सूर पक्षातून व्यक्त होतो आहे. पिंपरीतील तीनही मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार होते. आता तीनही मतदारसंघात राष्ट्रवादी पराभूत झाल्याने तेथे अन्य पक्षाचे आमदार आहेत. महापालिकेत एकूण १३३ पैकी ९६ नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत. लोकसभा आणि विधानसभेच्या पडझडीनंतर हे संख्याबळ टिकवण्याचे मोठे आव्हान पक्षापुढे आहे.
शहरातील महत्त्वाचे प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. राज्यात सत्ता राहिली नाही. स्थानिक नेत्यांच्या वर्चस्वाच्या वादातून पक्षाचे ‘तीन तेरा’ वाजले आहेत. स्थानिक नेत्यांमध्ये गटबाजी असून त्यांचा एकमेकांवर विश्वास नाही. कामापेक्षा धंद्याला महत्त्व देण्याची नेत्यांची प्रवृत्ती आहे. यापूर्वीच्या अध्यक्षांना पक्षातून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही, तोच अनुभव नव्या अध्यक्षांना येतो आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक पक्षाच्या कार्यक्रमांना फिरकतच नाही. पक्षसंघटना आणि पालिकेचे राजकारण यात समन्वय नाही. राष्ट्रवादीच्या पिंपरी पालिकेतील भ्रष्ट कारभाराचे भांडवल करत भाजप-शिवसेनेसह विरोधक आक्रमक झाले आहेत. पूर्वीप्रमाणे अजितदादा लक्ष देत नाहीत. पालिकेतील कारभारावर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे साहेबांनी लक्ष घातले पाहिजे, असा ज्येष्ठ नेत्यांचाच सूर आहे.

Story img Loader