टंकनिर्मिती एक श्रमकारक व वेळखाऊ प्रक्रिया आहे हे मान्य, पण आपल्या अक्षरांसाठी आपण हे कष्ट घेतले पाहिजेत. पूर्वेकडील देशांनी त्यांच्या लिप्यांसाठी – ज्यांची अक्षरसंख्या आपल्या अक्षरसंख्येपेक्षा अनेक पटीने जास्त आहे त्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया विकसित केल्या आहेत, आपण त्यांचे अनुसरण का करत नाही?
अक्षर या शब्दाची संस्कृतमधील एक फोड अ+क्षर अशी करता येते. ‘अ’ हा अभाव व्यक्त करणारा उपसर्ग असून, ‘क्षर’चा अर्थ नाशवंत किंवा परिवर्तनीय असा आहे. या फोडीप्रमाणे अक्षर या शब्दाचा शब्दश: अर्थ- ‘ज्याचा नाश करता येत नाही ते किंवा ज्याला बदलता येत नाही ते’, असा लावता येतो. पण हे कितपत खरे आहे? एखादे नाव त्याच्या संकल्पनेशी किती सुसंगत असते? तसे पाहिले तर सलमानचा अर्थ आशीर्वाद असा आहे, पण आपला गडी केवढा मोठा आशीर्वाद आहे हे सर्वानाच माहीत आहे. अक्षरांचेही तसेच आहे, अक्षरे काळानुसार बदलतात, मरतात आणि फुटपाथवरच्या लोकांसारखी मारलीही जातात! अशाच एका अक्षरहत्येची ही कथा.
काही महिन्यांपूर्वी एका वैज्ञानिक प्रयोगासाठी आम्ही एका मराठी शाळेत गेलो होतो. प्रयोग मुलांना मोबाइलवर मराठी लिखाण शिकवण्याचा होता. लिखाण शिकवण्याच्या आधी, मुलांना वाचता येते व सर्वाची वाचनक्षमता समान आहे हे तपासणे गरजेचे असते. या चाचणीसाठी आम्ही एका पुस्तकातील परिच्छेद मुलांना वाचायला दिला. जवळजवळ सगळ्याच मुलांना तो परिच्छेद वाचता आला, पण मुले वाचताना अनेक ठिकाणी अडखळली. निरीक्षणानंतर असे आढळले की मुलांना काही जोडाक्षरे ओळखताच येत नव्हती! यात विशेषत: अल्पदंडयुक्त अक्षरांची (ङ द ट ठ ड ढ) जोडाक्षरे, उभ्या मांडणीची (एकावर एक) जोडाक्षरे, मूळ व्यंजनाचे रूप बदलणारे संयोग उदा. द + ऋ मात्रा, ओळखता आले नाही (बाजूचे चित्र पाहा; तुम्हाला व तुमच्या मुलांना किती अक्षरे ओळखता येतात? हे कुठल्या शब्दांत आढळतात? हे तपासा. सगळी अक्षरे व त्यांचे शब्द ओळखता आले तर आम्हाला पत्राने कळवा).
तपशीलवार शोध घेतल्यावर जाणवले की, यात मुलांचा किंवा शिक्षकांचा दोष नाही. या परिस्थितीला जबाबदार पाठय़पुस्तके आहेत. मराठी पाठय़पुस्तकांत वापरलेल्या टंकात (फॉण्टमध्ये) अनेक त्रुटी आढळल्या. सर्वप्रथम, अनेक व्यंजनांची जोडाक्षरे विभक्त होती, अर्थात विद्य, शुद्ध, द्वितीय सारख्या शब्दांमध्ये जोडाक्षरांच्या ऐवजी हलंतयुक्त तोड-अक्षरे वापरली होती. महाराष्ट्र शासनाने, वर्णमाला आणि वर्णलिपीविषयक शासन निर्णयात मराठी मुद्रणात फाशाच्या श ऐवजी शेंडीचा श व अंत्यदंडयुक्त ल ऐवजी अल्पदंडयुक्त (वाटीचा) ल वापरावा अशी सूचना केली आहे. पाठय़पुस्तकांत यांपकी कुठल्याही सूचना पाळल्या नव्हत्या. थोडक्यात कुठल्यातरी विचित्र अशा पाठय़पुस्तक-धोरणाने अक्षरांची कारकुनी हत्या केली होती. पाठय़पुस्तकांच्या अशा आहाडबाहाड व असंघड रचनेमागे काय कारण असू शकते?
काही लोकांचे म्हणणे आहे की, अखंड (हलंतरहित) व रूप बदलणारी जोडाक्षरे गोंधळास्पद असतात व मुलांना ती शिकायला अवघड जातात, मूळ स्वर-व्यंजनांबरोबर ‘अतिरिक्त’ आकार शिकावे लागतात; त्याने मुलांचा अभ्यासभार वाढतो. मुलांचे वाचन सुलभ व सोपे करण्यासाठी अखंड संयुक्ताक्षर वापरू नये. याव्यतिरिक्त भरपूर अखंड जोडाक्षरे असलेला टंक बनवणे हे खूप कठीण काम आहे, असे टंक मिळतच नाही, यात खूप तांत्रिक अडचणी येतात इत्यादी. हा झाला दुसरा युक्तिवाद. नीट विश्लेषण केले तर हे दोन्ही युक्तिवाद खोडून काढणे अवघड नाही. चीन आणि जपान या देशांमध्ये प्राथमिक शिक्षणानंतर तेथील विद्यार्थ्यांना हजारापेक्षा जास्त अन्य अक्षरे ओळखता येतात, मग आपल्या विद्यार्थ्यांना शंभरएक तर्कसुसंगत अक्षरआकार शिकवल्याने कसला भार वाढणार आहे?
आज बहुतांश मुद्रक कालबाह्य़ मुद्रण तंत्रज्ञान वापरतात. हे तंत्रज्ञान आधी पाश्चात्त्य देशांत विकसित झाले होते व तिथल्या लिप्यांसाठी साजेसे होते. आपल्या लिप्यांकरता त्याच पद्धती वापरल्याने अनेक मर्यादा उद्भवायच्या, जोडाक्षरांची संख्या ही त्यातलीच एक मर्यादा. भारतात धातूचे मुद्रणयंत्र युरोपीय लोकांनी आणले. ही यंत्रे मुळात इंग्रजी लिपी छापण्याकरता बनली होती. रचनेत विभक्त व मूळ अक्षरांची संख्या कमी असलेल्या लिपीसाठी बनलेल्या यंत्रांवर भारतातील लिप्या कोंबल्या गेल्या. या यंत्रांवर धातूची अक्षरे तयार करताना टंकनिर्मात्यांना खूप अक्षराकार तयार करायला त्रास व्हायचा, प्रत्येक जोडाक्षराकरता विशेषत: उभ्या जोडाक्षरांकरता एक वेगळा अखंड अक्षराकार बनवण्यापेक्षा, एक अर्धे अक्षर बनवून त्यासमोर एक पूर्ण अक्षर लावणे सोपे होते. म्हणूनच अशा दोन अक्षराकारांचा वापर करून तयार केलेल्या आडव्या जोडाक्षरांचे प्रचलन वाढले. काळाच्या ओघात तंत्रज्ञान बदलत गेले पण आपण त्याच चुका करत गेलो.
चिनी, जपानी, कोरीयाई टंकविकासक एका वजनाकरता किमान वीस हजार जटिल अक्षरे बनवतात आणि आपले टंकविकासक हजार अक्षरआकार बनवायला आळस करतात. टंकनिर्मिती एक श्रमकारक व वेळखाऊ प्रक्रिया आहे हे मान्य, पण आपल्या अक्षरांसाठी आपण हे कष्ट घेतले पाहिजेत. हे कष्ट आधीच्या काळात निर्णयसागर टंकशाळेने आद्य तंत्रज्ञान असतानाही घेतले होते. त्यांनी त्या काळात धातूची हजारो अखंड अक्षरे कोरून आणि वापरून अप्रतिम पुस्तके छापली. आज परिस्थिती बदलली आहे, आधुनिक तंत्रज्ञानात अक्षरसंख्येच्या कुठल्याही मर्यादा नाहीत. दोन्ही (उभ्या आणि आडव्या) शैलीची जोडाक्षरे व मूळ अक्षरांचे शैलीभेदी पर्याय एकाच टंकात साठवता येतात. वापरकर्त्यांच्या आज्ञेनुसार किंवा पृष्ठरचनेच्या विशेष संदर्भामध्ये त्यांचा वापर व्हावा यासाठी नियम लिहिता येतात. पूर्वेकडील देशांनी त्यांच्या लिप्यांसाठी – ज्यांची अक्षरसंख्या आपल्या अक्षरसंख्येपेक्षा अनेक पटीने जास्त आहे त्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया विकसित केल्या आहेत, आपण त्यांचे अनुसरण का करत नाही?
उभ्या मांडणीची अखंड जोडाक्षरे वापरण्यात अनेक लाभ आहेत. यासाठी आपण आधी इतिहासाची साक्ष घेऊ . पूर्वीच्या हस्तलिखितांत व पूर्व-मध्यकाली छापील पुस्तकांमध्ये जोडाक्षरांचीच नव्हे तर मूळ अक्षरांचीसुद्धा अनेक दृश्य रूपे आढळून येतात. हस्तलिखितांत लिहिताना लेखकांचा एक हेतू, मर्यादित जागेचा इष्टतम वापर हा होता. म्हणून बरीच जोडाक्षरेही एकावर एक उभी अशी लिहिली जायची. अक्षरांचा आकार मोठा व जाड असल्यामुळे याचा वाचनीयतेवर फार फरक पडायचा नाही. उपयुक्ततावादी दृष्टिकोनातून पाहिले तर विविध माध्यमांत उभ्या मांडणीचे अखंड अक्षराकार वापरणे, विशेषत: मथळ्यांमध्ये वाचनीयतेच्या दृष्टीने सोयीचे ठरते. त्यांच्या वापरामुळे कमी जागेत जास्त शब्द बसवता येतात. सौंदर्याच्या दृष्टीनेही संकुल अशा अक्षररचना अधिक आवाहक वाटतात. अर्थात सौंदर्याच्या दृष्टीने केलेल्या निवडींचे निकष व्यक्तिपरत्वे विविध असू शकतात आणि ते स्वभावत:च वादग्रस्तही असू शकतात, पण जागेचा इष्टतम वापर होतो यात दुमत नाही.
उपयुक्ततावादापलीकडे एक आदर्शवादी युक्तिवादही करता येतो. भारतात विचारविविधतेसोबतच अक्षरविविधतेची समृद्ध परंपरा आहे. या निरनिराळ्या अक्षरांमध्ये विशिष्ट काळांचे, आगळ्या विचारांचे, अथांग कल्पनांचे अर्क विरघळलेले आहेत. आगळ्या कल्पनांना एक विशेष मोल असते आणि मुळात अक्षर ही एक कल्पना आहे, म्हणून ही अक्षरे आपण जोपासली पाहिजेत. मुलांना जितक्या विविध कल्पना, शब्द, अक्षरे, आपण शिकवू तितकीच त्यांची कल्पनाशक्ती वाढेल व तितक्याच सुसंघटितपणे ते आपले विचार अभिव्यक्त करू शकतील.
इतके फायदे असतानाही आपण आपल्या अक्षरांचे मूल्य का ओळखत नाही? आपल्याच लोकांनी आपलीच अक्षरे का मारावी? एवढा बौद्धिक आळस कशाला? ही वृत्ती काही नवीन नाही. १९२५ साली इतिहासाचार्य राजवाडे यांनी लिहिलेल्या ‘मराठी भाषा मुमूर्षू आहे काय?’ या निबंधातील चार ओळी आठवतात. लेखात ते म्हणतात, ‘तुमच्याजवळ नियम नाहीं, तुमच्याजवळ शस्त्र नाहीं, तुमच्याजवळ शास्त्र नाहीं, शास्त्र मिळविण्याला लागणारी तपश्चर्या करण्याची तुमची ताकद नाहीं, लढण्याचें सामथ्र्य व साहस नाहीं, रुसण्याचें कौशल्य नाहीं; तेव्हां तुम्हीं.. व तुमची भाषा यांनी मृत्युपंथ धरीला यांत विचित्र असें काय?.. जे तुम्हीं मृत्युपंथास लागून मढें बनत चाललेल्या तुमच्या भाषेचें साहित्य करण्याची गोष्ट बोलतां हेंच विचित्र आहे.’
गिरीश दळवी
लेखक आयआयटी मुंबई येथील ‘औद्योगिक अभिकल्प केंद्रा’त (आयडीसी- इंडस्ट्रियल डिझाइन सेंटर) प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ई-मेल : girish.dalvi@iitb.ac.in