गेल्या काही वर्षांत साहित्य संमेलनाध्यक्षांचे नाव पहिल्यांदाच ऐकतोय, अशी प्रतिक्रिया देणाऱ्यांची.. अगदी साहित्यप्रेमींचीही संख्या वाढते आहे, हे बरे लक्षण नाही.
मराठी साहित्य संमेलनातील गर्दीच्या जाड व यशस्वी पडद्याआड खुज्या उंचीचे साहित्यिक अध्यक्ष म्हणून खपून जात असतील, अध्यक्ष तो दिसतो कसा आननी, याची चिमूटभरही उत्सुकता कुणाला नसेल, तर ते संमेलनाध्यक्ष निवडले गेले काय नि पडले काय आणि साहित्य संमेलन झाले काय नि न झाले काय, कोणास काय फरक पडतो?
अ. भा. मराठी साहित्य संमेलन अलीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडणुकांच्या वळणावर जाताना दिसते. मतदारांना निवडीचे पर्याय दोनच. वाईट आणि अतिवाईट. त्यानुसार डोंबिवली येथे येत्या फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. अक्षयकुमार काळे निवडले गेले. या वृत्तानंतर मराठी सारस्वताच्या चेहऱ्यावर कोण हे काळे हा प्रश्न उमटला असला तरी या प्रश्नांकित चेहऱ्यांना प्रवीण दवणे यांचे निवडून न येणे दिलासा देणारे ठरले असेल. दवणे निवडले गेले असते तर मराठी साहित्यालाच सावर रे, म्हणावे लागले असते. असो. या निवडणूक निकालातील मतविभागणी पाहता या दोघांमध्ये लढत झाली, असे म्हणणेही सयुक्तिक ठरणार नाही. निकाल एकतर्फीच लागला. कारण डॉ. काळे यांना मिळालेल्या मतांची संख्या ६९२. दवणे यांना मिळालेली मते १४२. इतर दोन उमेदवारांपैकी मदन कुलकर्णी यांच्या नावे जमा झालेली मते २७ आणि जयप्रकाश घुमटकर यांच्या खाती मते फक्त तीन. या तीन मतांमध्ये त्यांचे स्वत:चे एक मत असणार, असे गृहीत धरू या. हे गृहीत धरण्याचे कारण म्हणजे प्रा. दवणे यांनी स्वत:ला दिलेले मतही तांत्रिक कारणांमुळे अवैध ठरले. केवळ दवणे यांचेच नव्हे, तर एकूण ५० मते अशी अवैध ठरली. म्हणजे वैध मतांची एकूण संख्या ९१४. ज्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ही निवडणूक होते, त्याचे एकूण मतदार १०७१. हे सर्व साहित्यिक किंवा साहित्याशी संबंधित. म्हणजे लिहिता वाचता येणारे. परंतु तरी यातल्या पन्नासेक जणांना आपल्या मताची वैधतादेखील सांभाळता येत नाही, इतके हे अंगठेबहाद्दर आहेत. ज्या संमेलनासाठी अनेक जण जिवाचा आटापिटा करतात त्यामागील आकडेबाज पाश्र्वभूमी ही अशी.
पण साहित्य संमेलनांचा संबंध आकडय़ांपेक्षा अक्षरांशी आणि त्या अक्षरांच्या निर्मात्यांशी अधिक असतो. आणि संमेलनाध्यक्ष म्हणजे तर या अक्षरनिर्मात्यांचा अध्वर्यूच. तेव्हा आगामी साहित्य संमेलनाध्यक्षाच्या उंचीचा अदमास घेणे येथे उचित ठरते. नियोजित अध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी स्वत:च्या निवडीनंतर केलेले एक विधान पाहता तर असा अदमास घ्यायलाच हवा. अक्षयकुमार काळे हे समीक्षक आणि दवणे हे कवी. संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचारात कवी मोठा की समीक्षक, असा मुद्दा चर्चिला गेला. निवडणुकीत दवणे नामक कवीवर मात केल्यानंतर काळे यांची प्रतिक्रिया अशी की, कविता ही समीक्षेपेक्षा श्रेष्ठच आहे, पण कोणता कवी मोठा, एवढाच प्रश्न आहे. हा शब्दांचा मार अर्थातच दवणे यांच्यासाठी. भरभक्कम गुणांचे जुने कवी हे समीक्षक काळे यांच्या काव्यअभ्यासाचे आणि काव्यसमीक्षेचे प्रमुख विषय. अशांच्या तुलनेत दवणे यांच्या खात्यावर समीक्षक काळे कवित्वाचे किती गुण जमा करणार, हे सांगण्यासाठी कुणा दुसऱ्या समीक्षकाची वा गणितज्ञाची आवश्यकता नाही. म्हणजे येथे कुठला साहित्यप्रकार मोठा, कुठला उजवा हा मूळ प्रश्न नाही. प्रश्न आहे तो कुठला साहित्यिक मोठा, कुठला छोटा असा. अक्षयकुमार काळे हे दवणे यांची उंची किती मोजत असावेत, हे त्यांच्या विधानावरून सूचित होतेच. काळे यांनी केले ते योग्यच. पण तितकेच पुरेसे नाही. काळे यांनी आपल्या उंचीचाही अंदाज घ्यावा. ते ज्या विदर्भातून येतात त्यातल्या एखाद दुसऱ्या शहरातील काही वॉर्ड वगरे वगळले तर हे प्रस्तावित संमेलनाध्यक्ष काळे की गोरे हे उर्वरित महाराष्ट्रातील अनेकांना माहीतही नाही. त्यामुळे त्यांची विचारमौक्तिके ऐकावयास आयोजक आगरी युथ फोरमचे क्रियाशील बांधव वगळता कोणीही फिरकणार नाही. हे काळे समीक्षक आहेत. हल्ली महाविद्यालयांत तासिकांचे रतीब घालणाऱ्या आणि त्या निमित्ताने फुटकळ काही लिहिणाऱ्यास समीक्षक म्हटले जाते. अशा समीक्षकांची उंची आणि ते ज्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर अध्यापन करतात त्या विद्यार्थ्यांची उंची यांतील फरक गेली काही वष्रे झपाटय़ाने कमी होत गेला आहे. रा. भा. पाटणकर, म. वा. धोंड, वा. ल. कुलकर्णी ही समीक्षेच्या आकाशातील लखलखीत, स्वयंप्रकाशित दिवंगत व्यक्तिमत्त्वे अपवाद म्हणून सोडून देता येतील. पण काळे आणि तत्सम मंडळींच्या तुलनेत गेला बाजार दिवंगत द. भि. कुलकर्णीदेखील त्यातल्या त्यात का असेना उंच वाटू लागतात. काळे आणि मंडळी त्या ‘दभि’ आणि तत्समांच्या खुज्या उंचीलाही आव्हान देत नाहीत. तेव्हा ज्याप्रमाणे एखादा व्यावसायिक नक्की करतो काय, या प्रश्नास बिल्डर आहे असे गोलमटोल उत्तर देतो त्याप्रमाणे कोणत्याही लेखनासाठी ओळखले न जाणारे अलीकडे, समीक्षक आहे, असे उत्तर देतात.
या मंडळींनी अलीकडे साहित्य व्यवहारात फारच उच्छाद मांडलेला आहे. यातील बरेचसे प्राध्यापकी पेशाशी निगडित असल्याने अन्य उचापत्यांसाठी त्यांच्या हाती वेळ बराच असतो. उदाहरणार्थ गेल्या संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस. त्यांच्या भाषणांचा, वक्तव्यांचा ‘एक विकृत शारदा’ असा ग्रंथदेखील प्रकाशित होऊ शकतो. यंदा तर असे दोन दोन प्राध्यापक संमेलनाच्या िरगणात होते. काळे आणि दवणे. दवणे कवी आणि त्यात प्राध्यापक. त्यामुळे शब्दांच्या रांगोळ्या गावगन्ना घालत िहडायला त्यांच्याकडे वेळच वेळ. रांगोळ्या डोळ्यास सुंदर दिसत असल्या तरी त्या काही काळावर मात करू शकणाऱ्या चित्रकृती नव्हेत. तसेच दवणे यांच्या काव्याचेही. मुरमुरे जसे जागा व्यापतात.. भांडय़ातील आणि पोटातीलही.. पण सत्त्व चिमूटभरदेखील नाही. तसेच दवणे यांच्या कवितेचे. परंतु या काव्यमुरमुऱ्याचे ठेले मांडत िहडावयाच्या त्यांच्या हौसेमुळे ते काळे यांच्या तुलनेत अधिक जणांना माहीत आहेत, हे मान्य करावयास हवे. काळे यांचे नाव ऐकून ते काय करतात, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, तर दवणे यांच्या नावावर ‘काही तरी लिहितात/ बोलतात बुवा’ इतकी तरी प्रतिक्रिया निर्माण होऊ शकते. गेली काही वष्रे निवडले गेलेले संमेलनाध्यक्ष पाहता बदलत गेलेल्या भवतालात अशा संमेलनांतून प्रचंड मोठी वैचारिक घुसळण व्हावी, त्यातून काही विचाररत्ने हाती पडावीत, त्यातून मराठी साहित्याचे काही भले व्हावे, अशी आशा आज कोणीही बाळगणार नाही, हे एकवेळ मान्य. परंतु गेल्या काही वर्षांत संमेलनाच्या अध्यक्षीय खुर्चीत बसलेल्यांकडे नजर टाकल्यावर त्यांचे नावही पहिल्यांदाच ऐकतोय, अशी प्रतिक्रिया देणाऱ्यांची.. अगदी साहित्यप्रेमींचीही संख्या वाढते आहे, हे बरे लक्षण नाही. संमेलनाध्यक्षच हा संमेलनाचा चेहरा हवा. संमेलनासाठी हौशे, गवशे आणि नवशे गर्दी करीत असतात. पण त्या गर्दीच्या जाड व यशस्वी पडद्याआड खुज्या उंचीचे साहित्यिक अध्यक्ष म्हणून खपून जात असतील, अध्यक्ष तो दिसतो कसा आननी, याची चिमूटभरही उत्सुकता कुणाला नसेल, तर ते संमेलनाध्यक्ष निवडले गेले काय नि पडले काय आणि साहित्य संमेलन झाले काय नि न झाले काय, कोणास काय फरक पडतो?
हे वातावरण बदलावयाचे असेल तर संबंधितांनी विचार करावयाची हीच वेळ आहे. तो केला तर साहित्य व्यवहार हाती असणाऱ्यांना आपल्या कार्यपद्धतीत बदल करावयाची बुद्धी सुचेल. या मंडळींच्या संकुचित आणि मर्यादित विचारशक्तीत जयंत नारळीकर, गोिवद तळवलकर, महेश एलकुंचवार, गणेश देवी, श्याम मनोहर, रामदास भटकळ आदी लेखकांना संमेलनाच्या अध्यक्षपदी मानाने बसवावे ही कल्पना बसत नाही. भुक्कड कवी आणि समीक्षकांपेक्षा अशांनी मराठी भाषेस दिलेले योगदान भरीव आणि महत्त्वाचे आहे. तेव्हा असा बदल झाला तर पुन्हा संमेलनाकडे सुजाण ओढले जातील. नपेक्षा उडदामाजी काळे गोरे.. काय निवडणाराने निवडावे.. हा प्रश्न आहेच.