रघुराम राजन यांचे पंख छाटण्याचे उद्योग सरकारने अनेकदा केले, पण ते न बधल्याने मग त्यांनी ‘स्वेच्छानिवृत्त’ व्हावे असे वातावरण तयार केले गेले..

व्यक्ती ही व्यवस्थेचे प्रतीक असते हे लक्षात घ्यावयास हवे. व्यवस्थेच्या सुदृढतेवर तिचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीचेही आरोग्य अवलंबून असते. याचाच अर्थ असा की व्यक्ती जर अस्वस्थ असेल तर त्यातून व्यवस्थेतील स्थिरतेचा अभाव दिसून येतो.  दुसरे असे की, व्यक्ती मोठी की व्यवस्था, हा प्रश्न विचारण्याचा अधिकार कुणाचा?

रघुराम राजन यांचा रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरपदावरून पायउतार होण्याचा निर्णय हा नरेंद्र मोदी सरकारच्या नतद्रष्ट धोरणांचा परिपाक आहे. या धोरणांचा दरुगध पहिल्यांदा गेल्या महिन्यात आला. सुब्रमण्यम स्वामी नावाचा उपटसुंभ राज्यसभेवर निवडून आला तेव्हा. दोनपाच राजकीय पक्षांनी ओवाळून टाकलेल्या या स्वामीस जवळ करावे असे मोदी यांना वाटले कारण स्वदेशी जागरण मंच. राज्यसभेवर वर्णी लागल्यापासून या नावापुरत्याच स्वामीने वॉशिंग्टनच्या कुऱ्हाडीप्रमाणे आपली जीभ सपासप चालवण्यास सुरुवात केली. राजन हे भारतीय नाहीत, त्यांच्या निष्ठा भारतीय नाहीत, त्यांना शिकागोतच परत पाठवावयास हवे ही असली केवळ बेजबाबदारीची परिसीमा असलेली विधाने स्वामी यांनी केली आणि तेव्हापासून मोदी सरकारच्या मतलबी वाऱ्यांची दिशा काय आहे हे स्पष्ट झाले. वरवर पाहता ही विधाने स्वामी यांनी केली असली तरी पंतप्रधानांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याखेरीज स्वामी हे असे बोलले असतील हे मानता येणार नाही. स्वामी यांच्या या विधानापासून आम्ही चार हात दूर आहोत, असे दाखवण्याचा प्रयत्नदेखील मोदी यांनी केला नाही, यातच काय ते आले. या स्वामी यांना राजन यांच्या मुद्दय़ावर सरकारचा पाठिंबा नसता तर पंतप्रधान वा अर्थमंत्री या नात्याने जेटली यांनी झडझडीतपणे स्वामी यांना चार शब्द सुनावले असते. पंतप्रधानांना ते सुनवायचे नव्हते आणि जेटली यांची ते सुनावण्याची प्राज्ञा नाही. कारण जेटली यांना राज्यसभेत पर्याय हवा म्हणून तर स्वामी यांची राज्यसभेवर वर्णी लागली. त्यांच्यासारख्या उपद्रवी व्यक्तीचा उदय हा भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा परिणाम आहे. तेव्हा स्वामी यांनी आपले काम चोख बजावले आणि एकंदरीत वातावरण पाहता राजन यांनी अधिक काळ न थांबण्याचा निर्णय घेतला. हे सर्व किती सुयोजित आहे हे त्यावरील जेटली यांच्या प्रतिक्रियेने कळावे. अर्थमंत्री या नात्याने जेटली यांनी राजन यांच्या निर्णयाचे एका अर्थी स्वागतच केले.

याचे कारण स्वागत करावे असे स्वत: काही करून दाखवण्यात अर्थमंत्री जेटली यांना अद्याप यश आलेले नाही. या सरकारचा उच्चविद्याविभूषित आणि त्यातल्या त्यात सहिष्णू चेहरा यापुरतीच जेटली यांची ओळख आहे. त्यांच्या अत्यंत निष्प्रभ आणि कळाहीन अर्थसंकल्प आणि अर्थधोरणांच्या पाश्र्वभूमीवर राजन यांचे रिझव्‍‌र्ह बँक हाताळणे कौतुकास्पद होते. जेटली यांना हीच खंत होती. याचे कारण त्यांच्या आíथक धोरणांना जराही प्रतिसाद न देणारा उद्योगांचा आणि गुंतवणुकीचा गाडा हलवण्यास राजन यांनी मदत करावी असा त्यांचा आग्रह होता. रिझव्‍‌र्ह बँकेचा प्रमुख या नात्याने राजन ही मदत व्याजदरातील कपातीच्या रूपाने करू शकत होते. राजन यांनी ते केले नाही. सरकारला मदत करणे हे रिझव्‍‌र्ह बँकेच्या प्रमुखाचे काम नसते. चलन व्यवहारावर नियंत्रण ठेवणे आणि रुपया स्थिर राहील हे पाहणे हे त्यांचे काम. ते राजन यांनी चोख बजावले. किती ते तीन वर्षांपूर्वी ते बँकेच्या प्रमुख पदावर आले तेव्हाची रुपयाची अवस्था आठवल्यास कळेल. तेव्हा गटांगळ्या खाणाऱ्या रुपयाने पाण्याच्या वर डोके काढले ते केवळ राजन यांच्यामुळे. परकीय चलनाची गंगाजळी सुधारली ती राजन यांच्यामुळे. राजन आल्यानंतर एका वर्षांत सत्ताबदल झाला आणि अच्छे दिन येणार असल्याचे ढोल बडवत मोदी सरकार सत्तेवर आले. त्या वेळचा पहिला अर्थसंकल्प हा जेटली यांच्या कल्पनाशून्यतेचे दर्शन घडवणारा होता. वास्तविक पहिल्या अर्थसंकल्पात मोदी यांच्या निवडणूकपूर्व ढणढणाटाचे प्रतिबिंब पडावयास हवे होते. ते पाडायचे तर जेटली यांना काही ठोस पावले उचलावी लागली असती. ते झाले नाही. परिणामी अत्यंत सपक असा अर्थसंकल्प जेटली यांनी सादर केला. तेव्हापासून राजन यांच्यावरचा दबाव वाढू लागला. राजन यांनी व्याजदर कमी करावेत. त्यामुळे तरी उद्योगांच्या विस्तारादी गुंतवणुकीस सुरुवात होईल आणि अर्थव्यवस्थेचा गाडा हलू लागेल, अशी सरकारची अपेक्षा. राजन यांनी उलट त्या वेळी व्याजदर वाढवले. तेव्हा पहिल्यांदा सरकारशी त्यांची ठिणगी उडाली. त्यानंतर वेळोवेळी सरकारने त्यांचे पंख कापण्याचाच प्रयत्न केला. पतधोरणात रिझव्‍‌र्ह बँकेच्या प्रमुखाच्या अधिकाराच्या विभागणीचे सूतोवाच सरकारने केले आणि त्याच वेळी या बँकेच्या उपप्रमुखाच्या नियुक्तीचे अधिकारही प्रमुखाकडून काढून घेण्याचा प्रयत्न करून पाहिला. राजन बधले नाहीत आणि चलन नियंत्रणाच्या ध्येयापासून कधीही ढळले नाहीत. त्या दिशेने वाटचाल करीत असताना त्यांनी आणखी एक आघाडी उघडली. ती म्हणजे सरकारी बँकांच्या खतावण्या साफसूफ करण्याची. जवळपास साडेतीन लाख कोट रुपयांची कर्जे या बँकांच्या कर्मामुळे आणि त्या कर्मास पाठिंबा देण्याच्या आतापर्यंतच्या धोरणांमुळे बुडीत खात्यात निघालेली आहेत. तेव्हा या बँकांनी ३१ मार्च २०१७ पर्यंत आपल्या खतावण्या स्वच्छ कराव्यात आणि कर्जाची वसुली सुरू करावी असा दट्टय़ा राजन यांनीच दिला. त्यामुळेच विजय मल्यासारख्या निर्ढावलेल्या उद्योगपतीविरोधात उभे राहणे स्टेट बँक आदींना भाग पडले आणि अन्य बँकांनाही आपापल्या अकार्यक्षमतेची कबुली द्यावी लागली. कोणताही पक्ष सत्तेवर आला तरी त्या वर्गाशी संधान बांधण्यात यशस्वी होणारा उद्योगपतींचा एक वर्ग असतो. तो वर्ग राजन यांच्या या धोरणांमुळे नाराज झाला. कारण जनतेच्या पशाने त्यांच्या सर्वच उद्योगांसाठी होणारा स्वस्त पतपुरवठा बंद झाला. त्यामुळे तो वर्गही सरकारातील काही हस्तकांच्या मार्फत राजन यांच्याविरोधात वातावरणनिर्मिती करीत होता. आधीच्या काँग्रेस सरकारने ज्याप्रमाणे कुडमुडय़ा भांडवलशाहीस उत्तेजन दिले त्याचीच काही अंशी पुनरुक्ती मोदी सरकारकडून सुरू असून राजन यांच्या कडक धोरणांमुळे अस्वस्थ झालेल्या अशा कुडमुडय़ा उद्योगपतींना पाठीशी घातले जात आहे. राजन यांच्यामुळे त्यास खीळ बसत होती.

आता हा वर्ग खूश होईल. त्याचे समर्थन करणारा, सरकारी धोरणांची री ओढण्यात धन्यता मानणारा पोपटांचा एक वर्ग त्यावर देशाची प्रगती एका व्यक्तीवर अवलंबून असते की काय, अशा स्वरूपाचा प्रश्न विचारेल. त्याचे उत्तर अर्थातच नाही असेच आहे. परंतु व्यक्ती ही व्यवस्थेचे प्रतीक असते हे लक्षात घ्यावयास हवे. व्यवस्थेच्या सुदृढतेवर तिचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीचेही आरोग्य अवलंबून असते. याचाच अर्थ असा की व्यक्ती जर अस्वस्थ असेल तर त्यातून व्यवस्थेतील स्थिरतेचा अभाव दिसून येतो. राजन यांच्याबाबत हेच घडले. आणि दुसरे असे की, व्यक्ती मोठी की व्यवस्था, हा प्रश्न विचारण्याचा अधिकारच मुळात मोदी सरकार आणि त्याच्या राघुभक्तांना नाही. कारण या सरकारचा पाया एका व्यक्तीपुरताच आहे. सर्व प्रयत्न आहे तो ही केंद्रीय व्यक्ती तेवढी मजबूत राहावी आणि आधारासाठी स्तंभांच्या ऐवजी केवळ पोकळ बांबूंची परांचीच उभी राहावी, हा.

दु:ख आणि त्याहूनही काळजी वाटावी अशी बाब आहे ती ही. फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटच्या प्रमुखपदी कोणा भुक्कड गजेंद्र चौहानाची नियुक्ती करावी, चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे प्रमुखपद त्याहीपेक्षा टुकार अशा कोणा पेहलाज निहलानीनामक वेडपटाकडे द्यावे आणि हे कमी म्हणून की काय नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचे मुख्य म्हणून चेतन चौहान या दुय्यम क्रिकेटपटूस आणावे हे असले उद्योग करण्यात हे सरकार मग्न आहे. चेतन चौहान आणि फॅशन यांचा संबंध काय असा प्रश्न विचारण्यात काहीही अर्थ नाही. तो विचारावयाचा तर विदूषी स्मृती इराणी आणि उच्चशिक्षणाचा संबंध काय हा प्रश्न विचारणेदेखील आवश्यक ठरते. या सुमार सद्दीच्या पाश्र्वभूमीवर आता रिझव्‍‌र्ह बँकेच्या प्रमुखपदासाठी कोणा दुय्यमाची निवड होते ते पाहावयाचे. जागतिक अर्थसंकट, ब्रेग्झिट, चलनवाढ आदी धोके गंभीरपणे डोक्यावर घोंघावत असताना राजन यांना जाऊ देणे हे त्यामुळेच एका व्यक्तीचे जाणे नाही. ते सरकारला अवदसा आठवल्याचे निदर्शक आहे.

 

Story img Loader