‘खूब लडी मर्दानी। वह तो झाँसीवाली रानी थी।’ सारख्या ओजस्वी कविता लिहिणाऱ्या सुभद्राकुमारी चौहान. १९२०च्या प्रखर राष्ट्रभक्तीच्या काळात सुभद्रादेवींनी आंदोलनात उडी घेतली आणि त्यांच्या व्यक्तित्वाचे अनेक पैलू उठून दिसू लागले. एक कर्तव्यदक्ष गृहिणी, देशसेविका आणि त्याबरोबरच प्रखर राष्ट्रभक्त कवयित्री म्हणून त्या पुढे आल्या. १९४२च्या ‘चले जाव’ आंदोलनात तर त्यांना नऊ महिने तुरुंगात काढावे लागले. पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर खूप काम करण्याचं ठरवलेल्या सुभद्राजींचं, एका मर्दानीचं लढता लढता वयाच्या केवळ ४४व्या वर्षी अपघातात निधन झालं आणि एक तेजस्वी ज्योत कायमची विझली. तिच्याविषयी..
सातवीतली एक मुलगी जरा जास्तच धीट आणि एक पाचवीतली, लाजरीबुजरी, आपल्यातच दंग असणारी! दोघी एकाच शाळेत. एक दिवस, मधल्या सुट्टीत सातवीतली मोठेपणाचा अधिकार दाखवत धमकावणीच्या सुरात विचारते, ‘कविता लिहितेस ना?’ पाचवीतली मुलगी काही न बोलता नुसतीच मान हलवते- होकारार्थी की नकारार्थी तिलाच माहीत! त्या काळी म्हणजे साधारण एका शतकापेक्षा अधिक वर्षांपूर्वीची गोष्ट ही! इतक्या लहान मुलींनी कविता -वेडीवाकडी का असेना- लिहिणं, एकूण स्त्रियांनी लिहिणं हा मोठाच अपराध समजण्याचे ते दिवस. पण मनात उसळणाऱ्या भावना कशा थोपवायच्या आणि का हे त्या मोठीला कळत नसे. तिने त्या दिवशी पाचवीतल्या त्या छोटीला वर्गात नेऊन तिची गणिताची वही उघडून दाखवली. गणितं करताना मध्ये-मध्ये कविता लिहिलेल्या होत्या. आपलं हे गुपित कसं फुटलं याचा ती विचार करत असताना मोठीनं प्रेमानं तिला मिठी मारत म्हटलं, ‘आपल्या दोघींचं गुपित एकच आहे ना म्हणून मला कळलं.’
सातवीतली ती मुलगी होती, आपल्या ओजस्वी कवितेने देशभर प्रसिद्ध झालेली सुभद्राकुमारी चौहान आणि छोटी होती, ज्ञानपीठ पुरस्कारविजेती, विख्यात कवयित्री महादेवी वर्मा. दोघीही तेव्हापासून घट्ट मैत्रिणी झाल्या त्या अगदी शेवटपर्यंत. मैत्रीत कशानेच अंतराय आला नाही. दोघींचं लेखन काहीसं वेगळ्या मार्गावरून जात राहिलं. महादेवी म्हणजे व्रतस्थ, सात्त्विक, निरांजनासारख्या तर सुभद्रा म्हणजे तळपती मशाल. सुभद्राच्या व्यक्तित्वातील विलक्षण ऊर्जा, तडफ तरीही साधेपणा यांचा मोठा प्रभाव इतरांवर पडे.
अलाहाबादजवळील निहालपूर हे सुभद्राचं गाव. जन्म १६ ऑगस्ट १९०४. ठाकूर रामनाथसिंह आणि धिराज कुँवर यांच्या नऊ अपत्यांपैकी सुभद्रा ही आठवी. कुटुंब कनिष्ठ मध्यमवर्गीय. थोडय़ाशा शेतजमिनीवरच गुजराण होत असे. सुखदु:खाच्या रहाटगाडग्याचा अनुभव येत असतानाही, कुणी हार मानली नाही. कष्टाळू वृत्ती, आत्मविश्वास आणि सचोटी यामुळे कुटुंबाला गावात मान होता. मुलींच्या शिक्षणाला समाजाचा विरोध असतानाही गावात मुलींची एक शाळा होती आणि त्यात आपल्या मुलींना पाठवण्याएवढे त्यांचे वडील सुधारक होते. तरी परंपरेनुसार त्या आठवीत असतानाच त्यांचा विवाह झाला. त्यांच्या कविवृत्तीची व तल्लख बुद्धीची जाणीव असल्यानं शाळेतील शिक्षिकेनं सुभद्राजींच्या भावाला विनवलं की, ‘हिचा विवाह इतक्या लौकर करून तिला संसारात अडकवून तुम्ही तिच्यावर अन्याय करताय आणि देशाचं नुकसान करताय, कारण ही मुलगी इतिहास घडवेल, याची मला खात्री आहे.’ पण लहानपणीच, कृष्णाला भेटण्याचा ध्यास घेऊन रानात भटकणाऱ्या, आपल्या या चुणचुणीत आणि सुरेख बहिणीच्या लग्नाची, रूढीग्रस्त वृत्तीच्या भावाला घाई होती.
छोटी, नटखट सुभद्रा मुलींना एकत्र करून महिला समिती तयार करे, सभापती, मंत्री निवडे, त्यांच्या समोर भाषण देई. भावाने चिंतित व्हावं असेच तिच्या भाषणाचे विषय असत- ‘स्त्रीने पडदा पाळू नये’, ‘अस्पृश्यता नष्ट करावी’ इत्यादी! सुभद्राजींनी आपल्या आठवणींमध्ये लिहिलंय की, ‘खरं म्हणजे, लग्न न करता देशसेवा करण्याचा, देशासाठी तन, मन वेचण्याचा माझा निश्चय होता, पण त्या वेळी माझं वय लहान. मी परावलंबी होते. त्यामुळे घरातल्यांचं ऐकावं लागलं.’
नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. वयाच्या १५व्या वर्षी ठाकूर लक्ष्मणसिंह चौहान यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. लग्न लौकर झालं तरी त्या ‘विवाहबंधनात अडकल्या’, असं म्हणणं अयोग्य ठरेल. कारण याबाबतीत त्या नशीबवान ठरल्या. त्यांचे पती अतिशय उदारमतवादी, देशप्रेमी व महात्माजींचे शिष्य होते. त्यामुळे सुभद्राजींच्या स्वातंत्र्यप्रेमाला चांगलाच पाठिंबा व आधार मिळाला. त्यांचं शिक्षणही लग्नानंतर चालू राहिलं. मुद्दाम नमूद करण्यासारखी बाब म्हणजे शतकापूर्वीच्या त्या समाजातलं हे लग्न मुलाच्या आग्रहावरून कोणताही हुंडा न घेता, नववधूने पडदा न पाळता आणि स्पृश्यास्पृश्य विचार बाजूस ठेवून पार पडला. पुढेही अशा प्रकारच्या गोष्टीत सुभद्राजींना पतीचा पाठिंबा कायमच असे. दोघेजण तनमनाने देशकार्यात सामील झाले.
१९२०चा तो काळ गांधीजींच्या प्रभावाचा, सत्याग्रह, आंदोलनं यांचा होता. महात्माजींची तरुणांवर जबरदस्त मोहिनी होती. सुभद्रा त्यात मागे कशी राहणार? शिक्षण सोडून असहकाराच्या आंदोलनात सुभद्राजींनी उडी घेतली. आता त्यांच्या व्यक्तित्वाचे अनेक पैलू उठून दिसू लागले. एक कर्तव्यदक्ष गृहिणी, देशसेविका आणि त्याबरोबरच प्रखर राष्ट्रभक्त कवयित्री म्हणून त्या पुढे आल्या.
वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षांपासूनच त्या यमक जुळवण्याची खटपट करत कविता करीत होत्या. निसर्गवर्णनपर कविता (पहिली कविता कडुनिंबाच्या झाडावर केली होती) कर, तर कधी मैत्रिणींशी संवादही कवितेतून कर असा त्यांना कवितेचा नाद होता. लग्नानंतर ‘कर्मवीर’ या साप्ताहिकाशी कामाच्या निमित्ताने संबंध आला. राष्ट्रभक्तीपर कविता लिहिणारे नामवंत हिंदी कवी पंडित माखनलाल चतुर्वेदी यांनी सुभद्राजींना त्यात कविता लिहिण्याचा आग्रह केला आणि त्यांच्या काव्यलेखनाला व्यासपीठ मिळालं, तसंच मार्गदर्शनही मिळालं. त्यांची कविता प्रणयभावना, जीवनदर्शन आणि राष्ट्रीय भावना आविष्कृत करत असली तरी मुख्य भाव राष्ट्रभक्तीचा. त्याकाळी सुभद्राकुमारींप्रमाणेच राजराणी देवी, महादेवी वर्मा, तोरण देवी (लाली), गोपालदेवी अशा इतर हिंदी भाषिक कवयित्री देशभक्तीपर रचना करत होत्या, पण सुभद्राकुमारी चौहान म्हणजे ओज आणि वीररस यांनी पूर्ण अशी कविता. ‘झाँसी की रानी’ ही त्यांची अजरामर, कालातीत कविता.
बुंदेले हरबोलोंके मुँह। हमने सुनी कहानी थी।।
खूब लडी मर्दानी। वह तो झाँसीवाली रानी थी।।
(बुंदेले हरबोले म्हणजे बुंदेलखंडातले शाहीर.)
या ओळींची ध्रुपदासारखी पुनरावृत्ती करत त्यांनी पोवाडय़ासारखी रचना केली आहे, ती म्हणजे वीररसाचा मूर्तिमंत आविष्कार! साध्याशा वाटणाऱ्या शब्दांमधून त्यांनी राणी लक्ष्मीबाईच्या शौर्याचा, तडफदारपणाचा, स्वाभिमानाचा जो परिचय घडवला आहे, तो अविस्मरणीयच. तेव्हा स्वातंत्र्यचळवळीतल्या सैनिकांना या कवितेने जो आवेश चढत असेल त्याची आज कल्पना करतानाही आपण रोमांचित होतो. मग पुढे स्वातंत्र्यप्राप्तीचा सुवर्णमहोत्सव साजरा करताना, आजच्या पिढीतील शुभा मुद्गलांनी लोकसभेत हीच कविता गावी किंवा स्वानंद किरकिरे यांना तिचं रसग्रहण करत, तिचं भावपूर्ण आविष्करण करावंसं वाटलं याचं आश्चर्य वाटू नये. राणी लक्ष्मीबाईचं व्यक्तित्व आणि स्वत: सुभद्राजी यांच्यात जणू एक अद्वैत दिसतं. नेहमीचे वीर नायक न निवडता, त्यांनी एका स्त्रीला असणारा गुलामगिरीचा तिटकारा आणि स्वातंत्र्याची पराकोटीची आस त्यात व्यक्त केली आहे. ती केवळ झांशीच्या राणीची कहाणी नाही, तर ती अशा स्त्रीची कहाणी आहे, जी आई, राणी, पत्नी, प्रशासक, शूर, पराक्रमी आणि हुतात्मा आहे. सुभद्राजींना अभिप्रेत असणारं स्त्रीचं सक्षम, स्वतंत्र, प्रगल्भ रूप त्यांनी या निमित्ताने दाखवलंय. ओजस्वी, लयबद्ध, प्रेरणादायी अशी ती कविता अनेकदा अभ्यासक्रमात समाविष्ट झाली व विद्यार्थ्यांच्या कितीतरी पिढय़ांनी ओठावर खेळवली आणि मनात रुजवली.
अशी ओजस्वी गीतं लिहिणाऱ्या सुभद्राजींनी तितक्याच संवेदनशीलतेनं करुण रसाचा केलेला आविष्कार त्यांच्या ‘जलियाँवाला बागमें बसंत’ या कवितेत पाहता येतो. १९१९ मधील जालियनवाला बागेत ब्रिटिशांनी केलेलं नृशंस हत्याकांड म्हणजे मानवतेवरचा फार मोठा आघात होता. काळ कशासाठीच थांबत नाही. निसर्गाचं ऋतुचR चालूच असतं. सुभद्राजींना १६-१७ वर्षांच्या वयातही ही जाणीव होती. त्या भीषण घटनेला वर्ष झालं. तेव्हा लिहिलेल्या या कवितेत त्या ऋतुराज वसंताला उद्देशून म्हणतात,
यहाँ कोकिला नहीं,
काग है शोर मचाते।
काले काले कीट,
भ्रमरका भ्रम उपजाते।।
परिमलहीन पराग दाग सा
बना पडा है।
हा! यह प्यारा बाग
खूनसे सना पडा है।।
ओ प्रिय ऋतुराज किन्तु धीरेसे आना।
यह है शोकस्थान यहाँ मत शोर मचाना।।
संपूर्ण कवितेतून एक अटळ, अपरिहार्य शोकभावना व्यक्त होऊन मन हेलावतंच, पण त्याबरोबर मानवतेला लाज आणणारं कृत्य करणाऱ्यांबद्दल मनात तीव्र चीड निर्माण होते. ‘वीरोंका कैसा हो बसंत’, ‘राखी की चुनौती’, यांसारख्या अनेक कविता आजही अस्वस्थ करतात.
देशाचं स्वातंत्र्य, चळवळीतील वीर कार्यकर्ते, महिलांचा स्वातंत्र्यचळवळीतील सहभाग अशा साऱ्या गोष्टींनी सुभद्राजींचं मन व्यापलेलं होतं. त्यामुळे त्यांच्या कथादेखील देशप्रेमी, सर्व प्रकारचे कष्ट सहन करणाऱ्या लोकांभोवती फिरतात. त्याग, समर्पण यांचा सन्मानच त्या आपल्या कथांमधून करतात. शिवाय सामान्य जनजीवन, समाजसुधारणांचा आग्रह धरणारे नायक त्या चितारतात.
एकीकडे सांसारिक कर्तव्यं पार पाडत असताना व लेखनही चालू असताना, सुभद्राजींनी या काळात अनेकदा तुरुंगवास भोगला. तेथे कष्ट तर होतेच, पण आपल्यापेक्षा इतरांना होणाऱ्या हालांचं, दु:खाचं वर्णन त्यांनी केलं आहे. तेथील स्त्री मेट्रनचा उद्धटपणा, राजबंदींपेक्षा इतर स्त्री कैद्यांना होणारा त्रास यालाही त्यांनी कथेच्या माध्यमातून वाचा फोडली. सुभद्राजींना सहा मुलं झाली. मात्र त्यामुळे त्यांच्या देशकार्यात खंड पडला नाही. आंदोलनात, सत्याग्रहात भाग घेतला, सरकारच्या दृष्टीने प्रक्षोभक भाषण केलं, कविता लिहिल्या की त्यांना अटक होई. त्या वेळी जे मूल लहान असेल त्याला त्या बरोबर घेऊन जात. त्यांची ज्येष्ठ कन्या सुधा आईबद्दल लिहिते, ‘मला वाटतं आमच्या आईची मातृत्त्वाची कल्पना इतरांपेक्षा अधिक विकसित, अधिक उदार होती.’ कधी कधी ‘मुलांचे हाल होतात, त्यांचे वडीलही तुरुंगात आहेत, तेव्हा तुम्ही सरकारची माफी मागा आणि सुटका करून घ्या,’ असा दबाव सुभद्राजींवर टाकला जाई. पण त्यांनी कशालाच दाद दिली नाही. १९४२च्या ‘चलेजाव’ आंदोलनात तर त्यांना नऊ महिने तुरुंगात काढावे लागले.
उत्तरेत असणारं राखीबंधनाचं महत्त्व जाणून सुभद्राजींनी कितीतरी तरुणांना आपला राखी-भाई करून घेतलं आणि आपलं म्हणजे देशाचं रक्षण करण्याची शपथ घालून त्यांना आंदोलनात सामील करून घेतलं. जातिभेद, रूढींची कर्मकांडं कधी मानली नाहीत. आपल्या मुलीचं जातीबाहेर लग्न करून दिलं आणि तिचं कन्यादानही केलं नाही. मुन्शी प्रेमचंद यांचा मुलगा त्यांचा जावई होता. त्याला लग्नाआधी घरी बोलावून ८-१० दिवस राहायला लावलं आणि म्हटलं, ‘नुसतं एकमेकांना पाहून तुमचं लग्न होणं योग्य नाही. परस्परांना समजून घ्या तरच सुखी व्हाल.’ स्त्री-पुरुष नात्याची अत्यंत प्रगल्भ समज असणाऱ्या सुभद्रा यांनी आपल्या कवितेतून स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचाराचा परवाना नव्हे, पती-पत्नी यांच्या भूमिका परस्परांना पूरक असतील तर किती आयुष्यं सुखी होतात, अशा विचारांवर भर दिला.
सुभद्रा स्त्रियांच्या परिषदेची अध्यक्षा झाल्या. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपलं कर्तव्य संपलं नाही, केवढं तरी काम अजून करायचं आहे हीच भावना मनात ठेवून त्या विधानसभेवर निवडून गेल्या. पण नियतीला ते मान्य नव्हतं. नागपूरला भरलेलं काँग्रेसचं अधिवेशन संपवून जबलपूरला परतत असताना, वयाच्या केवळ ४४व्या वर्षी गाडीच्या अपघातात त्यांचं निधन झालं. एक तेजस्वी शलाका, एक झुंजार व्यक्तित्व, संवेदनशील कविप्रतिभा हरपली. १८ जून हा झांशीच्या राणीचा स्मृतिदिन. त्यानिमित्ताने त्या दोघींना आठवताना सुभद्राकुमारींच्याच शब्दात त्यांना म्हणावंसं वाटतं –
तेरा स्मारक तू ही होगी। तू खुद अमिट निशानी थी।
बुंदेले हरबोलों के मुँह। हमने सुनी कहानी थी।।
खूब लडी मर्दानी। वह तो हमारी सुभद्रा थी।।
सुभद्राकुमारी चौहान (१९०४-१९४८)
- त्रिधारा, कविताकौमुदी यात कविता संग्रहित. मुकुल व अन्य कविताएँ हा स्वतंत्र कविता संग्रह.
- ‘समग्र सुभद्रा’ यात कथा, कविता, बालसाहित्य संग्रहित.
- पत्रे, भाषणे, आठवणी यांचा एकत्रित संग्रह
- औपचारिक सन्मान – सुभद्राकुमारीचे टपाल तिकीट,
- इंडियन कोस्टल गार्डस्तर्फे एका जहाजाला त्यांचे नाव दिले गेले.
- जबलपूरच्या नगरपालिकेच्या बाहेर अर्धपुतळा.
डॉ. मीना वैशंपायन
meenaulhas@gmail.com