जीएसटी म्हणजेच वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर हॉटेल, रेस्तराँ आणि भोजनालयांमधील मेन्यूकार्डातील खाद्यपदार्थांचे दर कमी करायला हवेत, असे महसूल सचिव हसमुख अधिया यांनी सांगितले. जीएसटीमुळे करांमध्ये कपात झाली आहे. त्याचा फायदा हॉटेलांनी ग्राहकांपर्यंत पोहोचवला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
देशभरात जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आला आहे. मात्र या नव्या करप्रणालीबाबत सर्वसामान्यांमध्ये अद्यापही संभ्रम आहे. तो दूर करण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरु आहे. हॉटेल, रेस्तराँमध्ये ग्राहकांना बिल दिले जाते. पदार्थांचे दर आणि त्यातही सेवा शुल्कही आकारले जाते. तसेच त्यात जीएसटी स्वरुपातही पैसे घेतले जातात. त्या बिलात अतिरिक्त स्वरुपात जीएसटीही आकारला जातो. अनेक शहरांमधील ग्राहकांच्या अशा तक्रारी आहेत. मग जीएसटी लागू होऊन त्याचा ग्राहकांना फायदा काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पण आता महसूल सचिव हसमुख अधिया यांनी जीएसटीचा लाभ ग्राहकांना द्यावा, असे सांगितले आहे. हॉटेल, रेस्तराँ आणि खाद्यगृह मालकांनी मेन्यूकार्डमधील पदार्थांचे दर कमी करावेत, असे त्यांनी म्हटले आहे. जेवणाच्या पूर्ण बिलावर जीएसटी आकारला जातो. त्यात सेवा शुल्काचाही समावेश असतो. केवळ मद्याचा त्यात समावेश नाही. कारण त्यावर अजूनही मूल्यवर्धित कर (व्हॅट) आकारला जातो, असेही त्यांनी स्पष्ट केले. रेस्तराँ, हॉटेलसाठी इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) असल्याने मालकांनी मेन्यूकार्डमधील पदार्थांचे दर घटवावेत, असेही त्यांनी सांगितले.
जीएसटीनुसार, नॉन-एसी रेस्तराँचा १२ टक्क्यांच्या कर टप्प्यात समावेश आहे. तर एसी रेस्तराँ आणि जिथे मद्यही मिळते, असे रेस्तराँचा १८ टक्के कर टप्प्यात समावेश आहे. मद्य वगळता हॉटेलात उपलब्ध असलेल्या पदार्थांवर जीएसटी आकारला जाणार आहे. त्यामुळे एकूण बिलावरच जीएसटी आकारण्यात येईल, असेही अधिया यांनी स्पष्ट केले.