संगणकासाठी लागणारे प्रोसेसर आणि चीपच्या निर्मितीतील जगातील बलाढय़ कंपनी ‘इंटेल’ने पुढील वर्षांच्या मध्यापर्यंत आपल्या १२ हजार कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचे निश्चित केले असल्याचे मंगळवारी स्पष्ट केले. जागतिक स्तरावर फैलावलेल्या विद्यमान मनुष्यबळात ११ टक्क्य़ांची कपात सुचविणारा व्यावसायिक पुनर्रचना आराखडा कंपनीने मंजूर केला आहे.
आजवर लाभदायी ठरलेल्या पीसी व्यवसायावरील मदार उत्तरोत्तर कमी करणाऱ्या १.२ अब्ज अमेरिकी डॉलरचा पुनर्रचना आराखडय़ात कंपनीच्या मनुष्यबळाची फेररचना करण्यात येणार असून, त्या अंतर्गत एवढय़ा मोठय़ा प्रमाणात कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कर्मचारी कपातीमुळे कंपनीला चालू वर्षांत ७५ कोटी डॉलरची तर पुढील वर्षांत १.४ अब्ज डॉलरची बचत करता येणे शक्य होणार आहे.
येत्या ६० दिवसांत संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाविषयक भवितव्याबद्दल सूचित केले जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. गेल्यावर्षांच्या अखेपर्यंत कंपनीकडे १,०७,३०० कर्मचारी होते. त्यापैकी सुमारे ११ टक्के कर्मचारी फेररचनेत अतिरिक्त ठरत असून, त्यांनाच सेवेतून काढण्यात येणार आहे. पुढील वर्षांच्या मध्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. संगणकाच्या प्रोसेसर निर्मितीमध्ये इंटेल हे अग्रगण्य मानले जाणारे नाव आहे. एकीकडे संगणकाच्या बाजारातील अनिश्चिततेच्या वातावरणाचा कंपनीच्या नफाक्षमतेवर विपरीत परिणाम झाला आहे, तर मोबाइल प्रोसेसर निर्मितीमध्ये कंपनी लक्षवेधक कामगिरी करू शकली नाही. या क्षेत्रातील साहस कंपनीसाठी आतबट्टय़ाचे आणि तोटय़ात भर टाकणारे ठरले आहे. तरी कंपनीचा ६० टक्के महसूल आणि ४० टक्के नफा हा सध्या तरी प्रोसेसर आणि चीप निर्मितीतूनच येतो आहे. नव्या व्यवसाय फेररचनेत हा मोबाइल व्यवसायातील तोटा खाली आणण्याची योजना आहे.

Story img Loader