एकदा पैसा गुंतवायचे ठरलेच, तर तो कुठे हेही ठरविता आले पाहिजे. याच संबंधाने मार्गदर्शक असे गुंतवणुकीच्या उपलब्ध पर्यायांचे अंतरंग उलगडणारे पाक्षिक सदर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या सोमवारी..
मागे याच सदरात ‘बँकेत एफडी नकोच रे बाबा..’ अशा सूचक शीर्षकाचा लेख आला होता. अनेकांना लेखातील सल्ला रुचला, काहींना तो पुरेपूर पटला नाही. तसे त्यांना कळविलेही. वस्तुत: सरलेल्या २०१५ सालात बँकांच्या मुदत ठेवीतील गुंतवणूकच सर्वाधिक ‘लाभकारक’ ठरल्याचे आढळून आले. हे अपवादात्मक वळण की आगामी कल असाच असेल.. असा खोचक सवाल मग आपोआपच विचारला गेला. विशेषत: शेअर बाजारात पहिल्या आठवडय़ातील दारुण पडझड, सोन्याने अकस्मात घेतलेली उसळी यातून गुंतवणुकीच्या असल्या पर्यायांतील सुरक्षितता आणि लाभ मात्रा याबाबत सामान्य गुंतवणूकदारांच्या मनात चलबिचल होणे स्वाभाविकच आहे.
पण गुंतवणुकीच्या पर्यायांचा वेध घेताना, त्याबाबत एक भरती-ओहोटीचा एक ठोस प्रवाह आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल. हा प्रवाह नीट अभ्यासला तर आपल्याला कोणत्या पर्यायांतून कोणत्या समयी काय प्रकारचा लाभ होईल याचा ताळेबंद मांडता येईल. कसे ते आपण पाहू या.
* रोखे तसेच सोने गुंतवणूक
रोखे अर्थात डेट योजनांतील गुंतवणुकीतून आपण त्या त्या वेळच्या महागाई दराच्या आसपास परतावा आपल्याला मिळविता येतो. कधी कधी एक ते तीन वर्षांच्या अवधीत परतावा महागाई दराच्या २ टक्के जास्त, तर काही प्रसंगी कमीही होऊ शकतो. परंतु आपल्या गुंतवणुकीचा संपूर्ण कालावधीत म्हणजे ३०-३५ वर्षांत, परताव्याचा सरासरी स्तर एक सारखाच राहील, हे निश्चित.
सोन्यांतील गुंतवणूकही अशीच, म्हणजे मोठय़ा अवधीत महागाई दराच्या किंचित वर-खाली परतावा देणारी आहे. दोन्ही गुंतवणुकीतील हे साम्यस्थळ जरूर आहे. पण एक मोठा फरकही आहे. तो हा की, रोख्यांतील गुंतवणुकीवरील परतावा हा महागाई दराच्या तुलनेत खूप वेगळा असण्याचा संभव खूप कमी आहे. ५ ते १० वर्षांचा अवधी घ्या किंवा ३ ते ५ इतक्या कमी कालावधीतही महागाई दराइतकाच जवळपास परतावा राहील. त्या उलट या कालावधीत सोन्यातील परतावा महागाई दराच्या तुलनेत खूप वेगळा असू शकतो. तो त्या त्या समयीच्या महागाई दरापेक्षा १० टक्क्यांनी जास्त अथवा १० टक्क्यांनी कमीही असू शकतो.
जसे २००३ ते २०१० या दरम्यान सोन्याने वार्षकि १५ ते २० टक्के दराने परतावा दिला, तर त्या समयी महागाई दर ५ ते १० टक्क्यांदरम्यान होता. तर २०११ ते २०१५ दरम्यान नेमके उलट घडले. या काळात महागाई दर ५ ते ७ टक्क्यांदरम्यान राहिला आहे, तर सोन्याचे मूल्य वार्षकि ५ ते ७ टक्क्यांनी घटत आले आहे. पण हेच परिमाण २० वर्षांच्या कालावधीला लावले, तर या काळात सोन्यातील परतावा वार्षकि ८ ते १० टक्के राहिला आहे आणि हाच या कालावधीतील महागाईचा सरासरी दरही होता.
दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे सोन्यांतील परतावा बेभरवशाचा आणि अनुमान न लावता येणारा असतो, त्या उलट रोख्यातील गुंतवणुकीच्या अपेक्षित परताव्याबाबत अनुमान करणे शक्य आहे.
* स्थावर मालमत्ता आणि समभाग गुंतवणूक
या अगदी भिन्न गुंतवणूक पर्यायांची जोड करण्याचे कारण एकच की, त्यांचा परतावा हा देशाच्या अर्थव्यवस्थेच्या तब्येतीशी थेट जुळलेला आहे. अगर अर्थव्यवस्था प्रगतिपथावर असेल तर स्थावर मालमत्ता आणि शेअर बाजार दोन्हींत तेजीचे वातावरण असेल. पण या समानतेपल्याड दोन्ही गुंतवणुकीत फारकतीचे मुद्दे खूप लक्षणीय आहेत.
१. समभागांतील परतावा हा दीर्घावधीत स्थावर मालमत्ता गुंतवणुकीतील परताव्यापेक्षा जास्त असतो. ही कदाचित विश्वास ठेवता येणारी गोष्ट कदाचित वाटणार नाही. पण गत ५० वर्षांत स्थावर मालमत्ता किमती वार्षकि १५ टक्के दराने वाढल्या त्या उलट समभागांचा परतावा दर वार्षकि १७ ते २० टक्के इतका आहे.
२. समभागांचा परतावा देशाच्या अर्थव्यवस्थेशी संलग्न आहे, तर घर-जमिनीचे मूल्य हे त्या त्या शहर-क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेशी संलग्न आहे. शिवाय तरलतेच्या अभावी घर-जमिनीच्या किमतीत लवकर घट होत नाही आणि वाढही होत नसते. पण याचा अर्थ या गुंतवणुकीत जोखीम कमी आहे, असा काढला जाऊ नये. तरलता नसणे याचा सरळ अर्थ गरज पडेल तेव्हा इच्छा असतानाही या गुंतवणुकीतून बाहेर पडता येत नाही. सध्या अनेक गुंतवणूकदारांची हीच अवस्था आहे.
* निष्कर्ष :
१. जर तुम्हाला येथून पुढे तीन वर्षांसाठी गुंतवणूक करायची झाली, तर जास्तीत जास्त रक्कम रोख्यांत गुंतवा. शक्य झाल्यास म्युच्युअल फंडाच्या योग्य त्या डेट योजनेची निवड करा.
२. तीन वर्षांपेक्षा जास्त काळासाठी गुंतवणूक करू इच्छित असाल, तर म्युच्युअल फंडाची इक्विटी योजना निवडा. पण ही गुंतवणूकही टप्प्याटप्याने शक्य तो एसआयपी पद्धतीने नियमितपणे करीत राहा. अत्यंत तरल, पारदर्शक आणि कमी खर्चीक गुंतवणूक असून सद्य काळात सर्वाधिक लाभ देणारी ही गुंतवणूक ठरेल.
३. स्थावर मालमत्ता गुंतवणुकीसाठी नाहीच हे लक्षात घ्या. घर ही निवाऱ्याची जागा आहे, त्याला गुंतवणुकीचे माध्यम बनवू नका.
४. सोन्यातील गुंतवणुकीपासून जितके दूर राहाल, तितके उत्तम. याची अनेकांगी कारणे आहेत. शुद्धतेबाबत फसवणूक, घडणावळ शुल्क, चोरी, लूटमारीचा धोका अधिक जीवितास जोखीम हे सोने गुंतवणुकीचे अवगुण आहेतच, शिवाय येथून पुढे चांगल्या परताव्याचीही अपेक्षा नको.
– विजय मंत्री
(लेखक निर्मल बंग सिक्युरिटीजमध्ये सल्लागार आहेत.)