ध्या कर्जाचे व्याजदर हळूहळू खाली येत आहेत. त्यामुळे दीर्घ मुदतीच्या गृहकर्जधारकांची चुळबुळ सुरू झाली आहे. त्यांच्या कर्जावरील व्याजदर कमी होताना दिसत नाहीत. पण नवीन गृहकर्ज घेताना मात्र व्याजदर फारच कमी आकारला जाताना दिसतो आहे. साहजिकच या मंडळींची आपले गृहकर्ज दुसऱ्या बँकेकडे घेऊन जायची इच्छा प्रबळ होते आहे. नवीन बँकेत कर्जासाठी अर्ज केला की सगळे कागदपत्र व उत्पन्नाचे पुरावे देऊनही कर्ज नाकारले जाण्याच्या घटना घडताना दिसतात. कारण एकच – ‘क्रेडिट स्कोअर’ (पत-गुणांक) चांगला नाही. अशा परिस्थितीत मला या मंडळींकडून विचारला जाणारा एकच प्रश्न असतो- ‘सिबिल पत-गुणांक कसा सुधारू? आता खरे सांगायचे तर पत-गुणांक एका दिवसात काही सुधारत नाही. त्याकरता थोडा वेळ हा द्यावा लागणारच. आज आपण पत-गुणांक कसा सुधारावा ते बघू या.
 
*  कर्जाची वेळेवर परतफेड
सध्या चालू असलेल्या कर्जाची वेळेवर परत फेड करावी. यात गृह कर्जाची परतफेड, कार लोनचे हप्ते आणि क्रेडिट कार्डावर खर्च केलेल्या रकमेची परतफेड याचा समावेश होतो. बँकेला देय असलेल्या सर्व पशाचा भरणा वेळेवर करा. कर्जाचा हप्ता वेळेवर भरल्यास स्कोअर उंचावतो आणि न भरल्यास घसरतो. क्रेडिट कार्डच्या पशाचा भरणा वेळेच्या आधी करा. काही वेळा तुम्ही जमा केलेले धनादेश सण-सुट्टयांमुळे उशीरा वटतात. त्यामुळे क्रेडिट स्कोअर खाली येऊ शकतो. काही मंडळी क्रेडिट कार्डावर खर्च केलेली संपूर्ण रक्कम न भरता केवळ ’किमान रक्कम’ भरून वेळ मारून नेतात. यामुळेही  सिबिल क्रेडिट स्कोअर खाली येतो. त्यामुळे सगळे पसे वेळेवर भरणे आवश्यक आहे. जेथे शक्य आहे तेथे बँकेतून ‘ईसीएस’च्या माध्यमातून पशाचा भरणा करावा. या करिता तुमच्या बँक खात्यात पुरेशी शिल्लक असणे आवश्यक आहे. वेळेवर आधीच्या कर्जाची परतफेड करणे हा सिबिल क्रेडिट स्कोअर सुधारणा मोहिमेतील पहिला आणि महत्वाचा टप्पा आहे.

* कर्ज, कर्ज आणि कर्ज
तुमच्या नावावर अनेक कर्जे घेतलेली असतील तर तुमचा क्रेडिट स्कोअर निश्चित घसरतो. गरजेपोटी अनेकदा कर्ज घेतले जाते. पण यात थोडा विवेक दाखवावा. उठ-सुठ कर्ज घेणे टाळावे. वारंवार कर्जाची मागणी करणे हे चांगले लक्षण नाही. तुमच्या नावावर एक-एक लाखाची चार पर्सनल लोन असतील तर आज त्यातील किती रक्कम फेडायची शिल्लक आहे ते बघा. त्यानंतर एकाच बँकेकडून एकच कर्ज घेऊन ही वेग वेगळी कर्ज खाती बंद करा आणि हे एक कर्ज हळूहळू फेडून टाका. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर सुधरेल.

* क्रेडिट कार्ड व पर्सनल लोन
तुमच्या नावावर गृहकर्ज असेल व तुम्ही ते वेळेवर फेडत असाल तर तुमचा क्रेडिट स्कोअर घसरत नाही. पण तुमच्या नावावर बरीचशी क्रेडिट कार्डे आणि पर्सनल लोन असतील तर मात्र स्कोअर निश्चितच घसरतो. क्रेडिट कार्डे आणि पर्सनल लोन ही तारण विरहित कर्जे आहेत. अशी कर्जे मोठ्या प्रमाणात तुमच्या नावावर दिसणे श्रेयस्कर नाही. काही वेळा सहज म्हणून चार-पाच बँकांची क्रेडिट कार्डे घेतली जातात. खरे तर एक-दोन कार्डे पुरेशी असतात. अशा अतिरिक्त कार्डामुळे क्रेडिट स्कोअर घसरतो. आवश्यकता नसल्यास अशी कार्डे रद्द करा. त्याचप्रमाणे क्रेडिट कार्डाचे पूर्ण लिमिट दर महिन्याला वापरणे देखील योग्य नाही. जवळ दोन क्रेडिट कार्डे असताना व प्रत्येकाचे क्रेडिट लिमिट एक लाख रुपये असताना काही वेळा काही मंडळी एकाच कार्डावर एक लाख रुपये खर्च करतात. यामुळे असे वाटण्याची शक्यता आहे की, तुम्ही शक्य तेवढे ओरबाडून तुमची क्रेडिट लिमिट वापरत आहात किंवा तुम्हाला जगण्यासाठी क्रेडिट कार्ड आवश्यक आहे. शक्य असेल तर दोन्ही कार्डावर पसे खर्च करा. पर्सनल लोन व क्रेडिट कार्डच्या कचाट्यात तुम्ही अडकले असाल तर तुमच्या घराच्या तारणावर ’लोन अगेन्स्ट प्रोपर्टी’ घेऊन दीर्घ मुदतीत या कर्जातून बाहेर पडा. गृहकर्ज देणारी बँक  ’टॉप अप’ लोन देऊन तुमची सहज मदत करू शकते.
 
*  भांडण-तंटे
तुमचे एखाद्या देण्यावरून बँकेशी भांडण झाले व तुम्ही पशाचा भरणा बँकेला केला नाहीत तर बँक कर्जबुडवेपणाचा शिक्का तुमच्या नावावर मारते. यात तुमचे नुकसान होते. क्रेडिट स्कोअर घसरतो. त्यामुळे बँकेबरोबर सामोपचाराने बोलणी करून अशी प्रकरणे मिटवावीत. बँकेची चूक असेल तर बँकेला तसे स्पष्ट कळवून बँकेकडून या प्रकरणाचा निपटारा करून घ्यावा. तुमच्या नावावरील असे ’तंट्याचे’ उल्लेख बँकांनी काढल्यास तुमचा क्रेडिट स्कोर सुधारतो.

*  नीरक्षीरविवेक
वारंवार कर्जाची मागणी करणे टाळावे. सतत अर्ज केल्याने तुमचे जीवनमान कर्जावरच चाललेले आहे अशी प्रतिमा निर्माण होऊ शकते. त्यामुळे आवश्यक तेव्हाच कर्ज घ्या. बँका कर्ज देताना जामीन मागतात. ’मित्र कर्ज घेत आहे  म्हणून मी सही केली’ एवढे हे प्रकरण सोपे नसते. मित्राने कर्जाची परतफेड केली नाही तर बँक तुमच्याकडून ते कर्ज वसूल करू शकते व या सगळ्या प्रकारात तुमचा क्रेडिट स्कोर खालावतो.
काळजी घेतल्यास क्रेडिट स्कोअर निश्चितच सुधारेल. अनेक अडचणी असल्या तरी व्यावसायिक सल्ला घेऊन त्या सोडविता येतील.

Story img Loader