scorecardresearch

साप्ताहिक राशिभविष्य

aries
मेष( २१ ते २७ एप्रिल २०२४ )

मेष : सहनशील राहा

षष्ठस्थानातून अष्टमस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. सर्व दिवस जपून पाऊल टाकावे लागेल. सध्या आपली डाळ शिजणार नाही हे लक्षात ठेवा. आपण म्हणू ती पूर्व दिशा हे शक्य होणार नाही. काही गोष्टी तुमच्या मनाला पटणाऱ्या नसतील, पण त्या तुम्हाला पटवून घ्याव्या लागतील. कोणाच्या सांगण्या-बोलण्याकडे लक्ष देऊ नका. प्रत्येक गोष्टीत सहनशीलता ठेवा, त्यामुळे त्रास होणार नाही. तेव्हा  पौर्णिमा तुमच्या सप्तम स्थानातून होत आहे. ही पौर्णिमा ठीक राहील. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात नवीन काही करण्याचे नियोजन सध्या करू नका. नोकरदार वर्गाने कामात लक्ष द्यावे. आर्थिक बचत करणे योग्य राहील. समाजसेवा करताना भान ठेवा. कुटुंबाशी एकनिष्ठ राहा. आध्यात्मिक गोष्टींत गुंतून राहा. मानसिकदृष्टया समतोल राखा. प्रकृती जपा.

शुभ दिनांक : २४, २५

महिलांसाठी : स्वत:साठी वेळ द्या.

taurus
वृषभ( २१ ते २७ एप्रिल २०२४ )

वृषभ : खर्च जपून करा

दिनांक २३, २४, २५  असे तीन दिवस सतर्कता बाळगावी लागेल. या तीन दिवसांत जे काही करायचे आहे त्याचा आराखडा आधी तयार करा, त्यामुळे तुमची धावपळ होणार नाही. अचानक तांत्रिक अडचणी येऊ शकतात. प्रत्येक वेळी आपणच बरोबर असतो हे सूत्र सध्या तरी बाजूला ठेवा. समोरच्यांची एखादी गोष्ट नाही पटली तरी ती पटवून घ्यावी लागेल. प्रत्येक गोष्टीत घाई करून चालणार नाही. उशीर होणार आहे हे गृहीत धरा. पौर्णिमा कालावधीत शांत राहा. बाकी दिवस ठीक असतील. व्यवसायात धावपळ होईल, मात्र फायदा आहे तेवढाच होईल. नोकरदार वर्गाला कामात यश मिळेल. खर्च जपून करा. समाजमाध्यमांचा वापर करताना सावधानता बाळगा. स्वार्थी मैत्रीपासून लांब राहा. मुलांच्या वागण्या-बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका. जोडीदाराची साथ मिळेल. योगसाधनेला महत्त्व द्या. मन शांत ठेवा.

शुभ दिनांक : २१, २२

महिलांसाठी : कामाचे नियोजन करा.

gemini
मिथुन( २१ ते २७ एप्रिल २०२४ )

मिथुन : नियमांची चौकट पाळा

दिनांक २६, २७  हे दोन दिवस कोणतेही काम करताना दूरदृष्टी ठेवा. स्वत:ची जबाबदारी इतरांवर टाकू नका, त्यामुळे नुकसान होऊ शकते. वादविवाद टाळा. अनोळखी व्यक्तींपासून लांब राहा. बेकायदेशीर गोष्टी डोके वर काढू शकतात; तेव्हा नियमांच्या चौकटीत राहा. जिथे आपला काही संबंध नाही अशा गोष्टींत हस्तक्षेप करू नका. म्हणजे त्रास होणार नाही. पौर्णिमा चांगली जाईल. बाकी दिवसही चांगले असतील. व्यावसायिकदृष्टया गुंतवणूक करताना विचार करा. नोकरदार वर्गाला कामातील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न वाढवावे लागतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. राजकीय क्षेत्रात महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करताना भान ठेवा. घरगुती वातावरण चांगले कसे राहील ते पाहा. उपासना फलद्रूप होईल. आरोग्याची काळजी घ्या.

शुभ दिनांक : २३, २४

महिलांसाठी : अनावश्यक गोष्टी टाळा.

Cancer
कर्क( २१ ते २७ एप्रिल २०२४ )

कर्क : पोषक वातावरण राहील

सप्ताहात सर्व दिवस चांगले असल्यामुळे सप्ताहातील वातावरण पोषक राहील असे म्हणायला हरकत नाही. ज्या वेळी चांगले दिवस असतात त्या वेळी तुम्ही तुमचे वेळापत्रक करणे गरजेचे आहे, का तर चांगल्या दिवसांत वेळापत्रकाप्रमाणे कामे होत राहतात. कोणताही अडथळा येत नाही, त्यामुळे प्रयत्न वाढवायला शिका. पौर्णिमा कालावधी चांगला जाईल. व्यवसायातून जे उत्पन्न मिळणार आहे त्या उत्पन्नाची त्वरित गुंतवणूक करा. नोकरदार वर्गाला नवीन कामाची जबाबदारी पार पाडावी लागेल. आर्थिक प्रश्न मार्गी लागेल. राजकीय क्षेत्रात वर्चस्व वाढेल. मैत्रीचे नाते दृढ होईल. नातेवाईकांशी जेवढा असेल तेवढा संपर्क ठेवा. धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य साथ देईल.

शुभ दिनांक : २६, २७

महिलांसाठी : मोबदला चांगला मिळेल. मन प्रसन्न राहील.

leo
सिंह( २१ ते २७ एप्रिल २०२४ )

सिंह : महत्त्वाची कामे होतील

शुभ ग्रहांची साथ उत्तम राहील. प्रत्येक वेळी करावा लागणारा संघर्ष सध्या करावा लागणार नाही. स्वत:च्या कामासाठी वेळ देता येईल. ज्या कामांना हात घालाल ती कामे पूर्ण होतील. नवीन काही बदल करावयाचे असल्यास सध्या करायला हरकत नाही. महत्त्वाची कामे होतील. कामातील गती वाढेल. हक्काचे यश मिळेल. पौर्णिमा पराक्रम स्थानातून होत आहे. हा दिवस पराक्रमाचा असेल. व्यवसायातील नुकसान टळेल. नफा चांगला होईल. नोकरदार वर्गाला अधिकार प्राप्त होईल. आर्थिक बाबतीत बाकी राहिलेले व्यवहार जुळून येतील. राजकीय क्षेत्रात उलाढाली वाढतील. त्याचा व्याप तुम्हाला सांभाळावा लागेल. नातेवाईकांच्या सुखदु:खात सहभागी व्हाल. भावंडांना मदत कराल. घरगुती वातावरण चांगले राहील. धार्मिक गोष्टींची आवड राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. प्रकृतीच्या तक्रारी दूर होतील.

शुभ दिनांक : २४, २५

महिलांसाठी : दडपण दूर होईल.

gemini
कन्या( २१ ते २७ एप्रिल २०२४ )

कन्या : मानसिक समाधान लाभेल

या आठवडयात सर्व दिवस चांगले असतील. ग्रहांचे भ्रमण शुभदायक असेल. ज्या कामांचा श्री गणेशा आत्तापर्यंत होत नव्हता तो आता होणार आहे. तेव्हा पूर्वतयारी करायला उशीर करू नका. सध्या कोणाच्या मदतीची गरज भासणार नाही. तुम्हीच इतरांना मदत कराल. कोणतेही काम करताना अडथळा जाणवणार नाही.

पौर्णिमा धनस्थानातून होत आहे. पौर्णिमा कालावधीत लाभ होईल.

व्यवसायात नवीन कामाची सुरुवात कराल. नोकरदार वर्गाला काम वेळेत पूर्ण करता येईल. आर्थिक सफलता मिळेल. राजकीय क्षेत्रात सध्या वेळ देता येणार नाही. नातेवाईकांच्या कार्यक्रमानिमित्त भेटीगाठी होतील. भावंडांशी संपर्क साधाल. धार्मिक कार्यासाठी खर्च कराल. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

शुभ दिनांक : २१, २२

महिलांसाठी : जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.

libra
तूळ( २१ ते २७ एप्रिल २०२४ )

तूळ : नियंत्रण ठेवा

दिनांक २१, २२  हे दोन दिवस तसे फारसे चांगले नाहीत असे म्हणायला हरकत नाही. कारण या दिवसात जे करायला जाणार त्याच्या उलट क्रिया होणार. एखाद्याला मदत करावी म्हणून सल्ला द्यायला जाल, पण त्याचा त्रास तुम्हालाच होईल. तेव्हा कोणाला सल्ला द्यायला जाऊ नका. हे दोन दिवस कोणतेही महत्त्वाचे काम करू नका. न जमणाऱ्या गोष्टींसाठी कोणाला शब्द देऊ नका. वादविवाद या गोष्टींपासून लांब राहा. स्वत:वर नियंत्रण ठेवा. पौर्णिमा दिवस चांगला जाईल. बाकी दिवसही चांगले असतील. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न चांगले असेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे मत जाणून घ्यावे लागेल अनावश्यक खर्च टाळा. सार्वजनिक ठिकाणी भावनिक गोष्टींच्या आहारी जाऊ नका. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करा. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. प्रकृतीची काळजी घ्या.

शुभ दिनांक : २४, २५

महिलांसाठी : स्वतंत्र विचार करायला शिका.

soc
वृश्‍चिक( २१ ते २७ एप्रिल २०२४ )

वृश्चिक : भटकंती टाळा

दिनांक २३, २४ , २५  हे तीन दिवस केव्हा संपून जातील असेच तुम्हाला वाटणार आहे. कारण या तीन दिवसांत तुम्ही जे काही ठरवणार आहे त्याच्या विरोधी होणार आहे. एखाद्याला सहज जरी चांगले बोलायला गेला तरी त्याच्याकडून उलट प्रतिक्रिया मिळणार आहेत. अशा कालावधीत आपले काम भले नि आपण भले  म्हणजे त्रास होणार नाही. महत्त्वाचे म्हणजे या तीन दिवसांत होणारा भटकंतीचा मोह टाळा. पौर्णिमा कालावधीत शांत राहा. बाकी दिवस ठीक राहतील. व्यवसायात गुंतवणूक टाळा. नोकरदार वर्गाने कामाचे नियोजन करा. राजकीय क्षेत्रात जपून पाऊल टाका.

आर्थिकदृष्टया बचत करणे योग्य राहील. मित्र-मैत्रिणींशी जेवढयास तेवढे राहा. जोडीदाराच्या सल्ल्याने पुढे जा. म्हणजे त्रास होणार नाही. शारीरिकदृष्टया योग साधनेला महत्त्व द्या.

शुभ दिनांक : २६, २७

महिलांसाठी : नियमांचे पालन करा.

Sagi
धनु( २१ ते २७ एप्रिल २०२४ )

धनू : मर्यादा ओलांडू नका

दिनांक २६, २७  या दोन दिवसांत अळीमिळी गुपचिळी म्हणजेच, काय बोलावेसे वाटले तरी बोलू नका. कारण राईचा पर्वत व्हायला वेळ लागणार नाही. दिवस चांगले जावे असे वाटते त्यावेळी तुम्ही स्वत:च शांत बसणे गरजेचे असते हे लक्षात ठेवा. होऊन गेलेल्या गोष्टींचा विचार करून त्यावर आपले मत तयार करणे म्हणजे अडचणी वाढवण्यासारखे आहे. तेव्हा कोणत्याही प्रकारच्या मर्यादा ओलांडू नका. पौर्णिमा कालावधी लाभदायक राहील. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात नवीन कामाची सुरुवात करायला वेळ लागेल. नोकरदार वर्गाच्या कामातील व्याप वाढता राहील. खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. समाजसेवेची आवड राहील. मित्र-मैत्रिणींशी करमणूक होईल. घरामध्ये नको त्या गोष्टींची चर्चा करू नका. ज्येष्ठांची काळजी घ्या. आरोग्याबाबत हलगर्जीपणा टाळा.

शुभ दिनांक : २१, २२

महिलांसाठी :  मनाची चलबिचल होईल.

capri
मकर( २१ ते २७ एप्रिल २०२४ )

मकर : भाग्योदय होईल

भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. भाग्यस्थान म्हटले की ऐकायलाही बरे वाटते, बरोबर ना. भाग्योदय होईल. हो, खरेच आहे. खूप प्रयत्न करूनही यश मिळत नव्हते किंवा त्या गोष्टी पुढे पुढे जातात. हातातोंडाशी आलेला घास निसटतो. या परिस्थितीत बदल होणार आहे. म्हणजेच हातातोंडाशी आलेला घास आता निसटणार नाही. तेव्हा अशा चांगल्या ग्रहमानाची संधी सोडू नका. प्रयत्नांना यश लवकरच मिळेल. पौर्णिमा कालावधीत ज्येष्ठांचा आदर करा. सर्व दिवस चांगले असतील. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात उत्पन्न मिळेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे प्रोत्साहन मिळेल. आर्थिक चिंता मिटेल. राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. मित्र-मैत्रिणींसोबत मनोरंजन होईल.    नातेवाईकांना वेळ देता येणार नाही. मानसिक समाधान लाभेल.

शुभ दिनांक : २१, २६

महिलांसाठी : आनंदवार्ता कळेल.

Aqua
कुंभ( २१ ते २७ एप्रिल २०२४ )

कुंभ : आर्थिक सफलता मिळेल

दिनांक २१, २२  या दोन दिवसांच्या कालावधीत संयम ठेवा. समोरच्याने एखादा सल्ला दिला तर तो ऐकून घ्या. त्यावर प्रतिक्रिया देऊ नका. कोणतेही निर्णय घेताना विचार करा. फसवणुकीपासून लांब राहा. कोणत्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय त्या गोष्टीवर आपले मत तयार करू नका. समोरच्याने तुमचे मत विचारले तरीही मत देऊ नका. दोन दिवस चांगले नसल्यामुळे त्रास होऊ शकतो. पौर्णिमा भाग्यस्थानातून होत आहे, बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायात फार कष्ट करावे लागणार नाही. नोकरदार वर्गाला कामातील काही गोष्टींचा अंदाज येणार नाही. आर्थिक सफलता मिळेल. राजकीय क्षेत्रातील जबाबदारी पार पाडाल. नातेवाईकांच्या कार्यक्रमानिमित्त भेटीगाठी होतील. शेजाऱ्यांना मदत कराल.धार्मिक कार्यात सहभाग राहील. आहारावर नियंत्रण ठेवा.

शुभ दिनांक : २४, २५

महिलांसाठी : गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या.

pices
मीन( २१ ते २७ एप्रिल २०२४ )

मीन : प्रकृती जपा

दिनांक २३, २४, २५ या तीन दिवसांच्या कालावधीत खूप काही शिकायला मिळणार आहे. म्हणजेच आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत, त्या मिळवण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो याचा अनुभव या तीन दिवसांत येईल. सहज मार्गी कोणतेही काम होणार नाही. त्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते. स्वत:हून स्वत:चा त्रास वाढवून घेऊ नका. पर्यायी मार्ग काढा. पौर्णिमा कालावधीत जपून पाऊल टाका. या तीन दिवसांच्या कालावधीनंतर हा त्रास होणार नाही. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायानिमित्त धावपळ होईल. नोकरदार वर्गाला स्वत:च्या मर्जीने काम करता येणार नाही.

आर्थिकदृष्टया व्यवहार फसणार नाहीत याची काळजी घ्या. घरगुती वातावरण चांगले कसे राहील ते पाहा. प्रकृती जपा.

शुभ दिनांक : २६, २७ 

महिलांसाठी : नवे प्रयोग टाळा.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या