लातूर शहर, अंबाजोगाई, धारूर, केजसह, ७२ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या धनेगाव धरणात रविवारी सायंकाळी ७ वाजता ७७ टक्के जलसाठा झाला असल्याची माहिती शाखा अभियंता अनिल मुळे यांनी दिली. १४ सप्टेंबर रोजी धनेगाव धरणात थेंबरही पाणी नव्हते. केवळ १० दिवसांत हे धरण ७७ टक्के भरले आहे. २००७ सालानंतर पहिल्यांच या धरणात एवढा मोठा पाणीसाठा झाला आहे. रविवारी सायंकाळी ७ वाजता धरणात १८३ दलघमी पाणीसाठा झाला होता. धनेगाव धरणात पाणी साठत असल्याचे वृत्त आजूबाजूच्या गावात पसरल्यामुळे शनिवारी व रविवारी, असे दोन दिवस धरणावर पाणी पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती. सकाळपासूनच सहकुटुंब लोक धरणावर येत होते. डॉक्टर, इंजिनिअर अशा उच्चभ्रूंसह अगदी गरीब घरातील लोकही पाणी पाहण्यास येत होते. तब्बल ९ वर्षांनंतर धरणात पाणीसाठा साचल्यामुळे पाणी पाहायला मिळत असल्याचा लोकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

लातूर जिल्ह्य़ात ११५ टक्के पाऊस

या वर्षी २५ सप्टेंबर रोजी जिल्ह्य़ातील वार्षिक सरासरीपेक्षा ११५ टक्के पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेती पिकांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्य़ाची वार्षिक सरासरी ८०२ मि.मी. आहे. रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्य़ात ९२२.७८ मि.मी. पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस निलंगा तालुक्यात १०३९.५१ मि.मी. तर सर्वात कमी पाऊस औसा तालुक्यात ८६५ मि.मी. झाला आहे.