कॅम्पस रिक्रूटमेन्ट ही खरे तर करिअरच्या आभाळात प्रवेश करण्याची मिळालेली संधी असते. उमेदवार निवडीच्या वेळेस जोखले जाते ते विद्यार्थ्यांचे संबंधित विषयातील मूलभूत ज्ञान आणि या ज्ञानाचे उद्योगक्षेत्रात उपयोजन करण्याची विद्यार्थ्यांची क्षमता.
कॅम्पस रिक्रूटमेन्टचा मोसम सध्या टिपेला पोहोचला आहे. दर्जेदार अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ऑगस्टच्या सुमारास सुरू झालेला आणि व्यवस्थापन महाविद्यालयांमध्ये नोव्हें.-डिसेंबरमध्ये सुरू झालेला कॅम्पस प्लेसमेन्टचा ऋतू सध्या ऐन बहरात आला आहे. कंपनीच्या आणि शैक्षणिक संस्थेच्याही स्तरावर यासंबंधीच्या निवडीचे निकष अवलंबून असतात. प्लेसमेन्टसाठी घेण्यात येणारी मुलाखत हा जसा उमेदवारांसाठी निवडीचा क्षण असतो, तसाच खरे तर तो कॉर्पोरेट कंपन्यांसाठीही असतो. कदाचित संपूर्ण करिअरचाच टर्निग पॉइंट ठरणाऱ्या या प्लेसमेन्ट इंटरव्ह्य़ूसाठी विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे तयारी करायला हवी, हे या क्षेत्रातील मान्यवरांकडून जाणून घेऊयात.
टिअर वन, टू, थ्री कंपन्या हे शब्द कॅम्पसमध्ये तसे परिचयाचेच. कंपनीच्या आर्थिक स्तरावर आणि शैक्षणिक संस्थेच्या गुणवत्तेवर अवलंबून असलेल्या या संकल्पनेनुसार कॅम्पस रिक्रूटमेन्ट पार पडतात. कॅम्पसमध्ये रिक्रूटमेन्टसाठी येणाऱ्या कंपन्या दोन प्रकारच्या असतात- अत्यंत निवडक, वेचक, मोजक्याच उमेदवारांची निवड करणाऱ्या कंपन्या (उदा. कोअर इंजिनीअरिंग कंपन्या) आणि मोठय़ा संख्येने नेमणुका करणाऱ्या कंपन्या (उदा. आयटी, बीपीओ कंपन्या). या दोन्ही प्रकारच्या कंपन्यांचे उमेदवार निवडीचे निकषही वेगळे असतात.
मोठय़ा संख्येने उमेदवार निवडीसाठी आलेल्या कंपन्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमध्ये अभियांत्रिकीच्या बेसिक संकल्पना आणि संबंधित अभ्यासक्रमासंबंधीचे ज्ञान या गोष्टींची पारख करतात तर अत्यंत मोजक्या उमेदवारांची निवड करणाऱ्या कंपन्यांचे नेमणुका करतानाचे निकष याहून वेगळे असतात. विद्यार्थ्यांच्या क्षेत्रासंबंधातील मूलभूत ज्ञान, या ज्ञानाचे उपयोजन करण्याची विद्यार्थ्यांची क्षमता, त्याचा दृष्टिकोन, लवचिकपणा, संबंधित क्षेत्रातील उद्योगक्षेत्राबाबत त्याचे अद्ययावत ज्ञान याची चाचपणी करतात आणि अत्यंत चोखंदळपणे या कंपन्या विद्यार्थ्यांची निवड करतात. काही वेळा केवळ विद्यार्थ्यांची गुणवत्ता हा कंपन्यांच्या कॅम्पस प्लेसमेन्टचा एकमेव निकष नसतो तर ज्या प्रमाणात त्यांना नेमणुका करायच्या आहेत, त्यावरही कंपन्या ‘कट् ऑफ’ ठरवतात.
उमेदवारांची पारख करताना कंपन्या आपले निकषही अनेकदा लवचीक ठेवतात. उदा. जर एखादा उमेदवार त्यांना तांत्रिक ज्ञानाच्या पातळीवर उत्तम वाटला नाही, तर त्याच्या संवादकौशल्याच्या जोरावर तो मार्केटिंग टीममध्ये सामावू शकतो का, ही शक्यता कंपनी जरूर अजमावते.
एमबीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या कॅम्पस प्लेसमेन्टमध्ये विषयांच्या मूलभूत आणि इत्थंभूत ज्ञानासोबत विद्याशाखेशी संबंधित क्षेत्रातील कंपन्यांची स्थिती, आघाडीच्या कंपन्यांची स्ट्रेटेजी, आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा, त्यात तरण्यासाठीचे डावपेच आणि अर्थकारणाचा गाढा अभ्यास याविषयी विद्यार्थी कशा प्रकारे विश्लेषण करतो, हे अजमावले जाते, असे पुण्याच्या ‘इंडसर्च’चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नचिकेत वेचलेकर यांनी स्पष्ट केले.
काही आघाडीच्या आयटी कंपन्यांच्या कॅम्पस रिक्रुटमेन्ट प्रक्रियेत वेळोवेळी सहभागी होणारे
मिलिंद पळसुले यांनी कंपन्या विद्यार्थी-उमेदवार निवडताना नेमका कशावर भर देतात, हे विशद केले. त्यांनी सांगितले की, विषयासंबंधित मूलभूत ज्ञान, विद्यार्थ्यांचा आवाका, कल याचा अंदाज आल्यानंतर मुळात संबंधित क्षेत्राविषयीची त्या विद्यार्थ्यांची पॅशन जोखली जाते. त्या क्षेत्रात जीव ओतून काम करण्याची, नवनवे शिकत राहण्याची आणि संस्थेच्या उत्कर्षांसाठी काम करण्याची उमेदवाराची वृत्ती आहे का, हे ध्यानात घेतले जाते.
या कॅम्पस प्लेसमेन्टला सामोरे जाताना विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन कसा असावा, याविषयीही मिलिंद पळसुले यांनी महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले, ‘मुळात प्लेसमेन्टसाठीच्या मुलाखतीची तयारी ही एका रात्रीत वा दोन/ पाच आठवडय़ांत होईल, हे गृहीतक चुकीचे आहे. तर पदवी शिक्षण घेताना नुसतं झापडं लावून पुस्तकी शिक्षण घेण्यापेक्षा त्या ज्ञानाचे उपयोजन प्रत्यक्ष काम करताना कसे होते, हे विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला हवे. संबंधित क्षेत्रातील उद्योगजगतातील स्थिती, कल याचे सामान्य ज्ञान विद्यार्थ्यांना असायलाच हवे. आपल्या अभ्यासाच्या क्षेत्रासंबंधित घडामोडी जाणून घेण्याची भूक हवी. कॅम्पस इंटरव्ह्य़ूमध्ये विद्यार्थ्यांच्या याच गोष्टींचे परीक्षण केले जाते. मुलाखतीला सामोरे जाताना विद्यार्थ्यांमध्ये मुळात प्रामाणिकपणा हवा. आपल्याला जितकी माहिती आहे, ती नीटपणे विद्यार्थ्यांला देता यायला हवी. एखाद्या प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांला माहीत नसणे हा काही गुन्हा नाही, पण ते पॅनेलला प्रामाणिकपणे सांगून त्यासंबंधीचे उत्तर जाणून घेण्याची इच्छा विद्यार्थ्यांने व्यक्त करणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे अमुक एका पद्धतीचे काम करायला आवडेल, अशा प्रकारच्या अटी उमेदवार विद्यार्थ्यांनी बाजूला ठेवायला हव्या. त्यातून विद्यार्थ्यांचा दुराग्रहीपणा दिसून येतो. वेतनाच्या बाबत म्हणायचे झाले, तर मुळात कुठल्या स्तरातील कंपनीतील नोकरीसाठी आपण मुलाखत देत आहोत, हे उमेदवाराला ठाऊक असते. या कंपन्यांच्या प्रचलित अशी वेतनश्रेणी असते, त्याच्याशीही तो परिचित असतो. अशा वेळेस करिअरच्या उमेदवारीच्या काळात हटके वेतन मिळण्याची अपेक्षा उमेदवारांनीही तूर्तास दूर ठेवायला हवी.’
माटुंग्याच्या व्हीजेटीआय या अग्रगण्य अभियांत्रिकी महाविद्यालयातील ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेन्ट सेलची जबाबदारी सांभाळणारे डॉ. एस. एम. गावकर यांनी सांगितले की, कॅम्पस प्लेसमेन्टसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, कंपन्या त्यांची निवड करण्यासाठी आलेल्या असतात, त्यांना नाकारण्यासाठी नाही. कंपन्या विद्यार्थ्यांमधील काही कौशल्यांची पारख करतात. उमेदवारांमधील निर्णयक्षमता, निरीक्षणशक्ती, आत्मविश्वास, प्रसंगावधान, सर्जनशीलता, विश्लेषक वृत्ती, त्यांचे तांत्रिक ज्ञान, अॅप्टिटय़ूड, परीक्षेत उत्तरे दिलेल्या गोष्टींबद्दल तंतोतंत ज्ञान यांची पडताळणी मुलाखतीदरम्यान घेतली जाते.
आर्थिक मंदीमुळे देशभरातच कॅम्पस प्लेसमेन्टची यंदाच्या प्रक्रियेने फारसा वेग घेतलेला नाही, हे नोंदवतानाच अलीकडे विद्यार्थीही कॅम्पस प्लेसमेन्टबाबत जीव तोडून प्रयत्न करण्यात कुठेतरी कमी पडतात, हे निरीक्षण डॉ. गावकर यांनी नोंदवले. ‘एका रात्रीत श्रीमंत होण्याची मुलांची इच्छा ही वेतनाबाबतच्या त्यांच्या अवास्तव अपेक्षा वाढवत असते. मात्र, पदवीनंतर पूरक ठरणाऱ्या अतिरिक्त अभ्यासक्रमापेक्षा केव्हाही मिळणारी प्लेसमेन्ट वा प्रशिक्षण संधी उत्तम असते. कारण त्यात ज्या क्षेत्रात पुस्तकी शिक्षण घेतलेले असते, त्या क्षेत्रातील उद्योगजगताचे रूप लक्षात घेत प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव या नोकरीतून मिळत असतो आणि करिअर बांधणीसाठी हा लाखमोलाचा ठरतो,’ असेही
गावकर म्हणाले.
जर कॅम्पस रिक्रूटमेन्टदरम्यान विद्यार्थ्यांना एकाहून अधिक अशा नोकरीच्या ऑफर्स आल्या तर कुठली नोकरी निवडावी, याविषयी विद्यार्थ्यांची अवस्था द्विधा होते. याबाबत मोलाचा सल्ला देताना मिलिंद पळसुले म्हणाले की, नोकरीच्या दोन ऑफर समोर असताना विद्यार्थ्यांने आपला ‘आतला आवाज’ ऐकायला हवा. मुळात विद्यार्थ्यांची त्या क्षेत्राविषयीची पॅशन किती आहे आणि त्याचे प्राधान्यक्रम काय आहेत, यावर त्याचा निर्णय अवलंबून असतो. मात्र जर एखादा विद्यार्थी तांत्रिक ज्ञानादृष्टय़ा अत्यंत कुशल असेल तर त्याने अभियांत्रिकी क्षेत्रापेक्षा आयटी क्षेत्रात दीडपट अधिक वेतन मिळते, म्हणून जाणे त्याच्या भावी करिअरला मारक ठरेल. यामुळे कॅम्पस प्लेसमेन्टमध्ये एकाहून अधिक नोक ऱ्या चालून आल्या तर अल्प कालावधीचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांनी बाळगू नये. आज आपल्याकडील कंपन्यांमधील कामाचे स्वरूप, वेतन, कामानिमित्त परदेशी जाण्याची संधी हे सारे काही उमेदवारांना उपलब्ध होत असते. अशा वेळी नोकरीनिमित्त परदेशात पोस्टिंग मिळते, हाही निकष गैरलागू ठरतो. मुळात कंपनीची निवड करताना तुम्ही कामासंदर्भात जितके लवचीक राहाल, तितकी त्या कंपनीत तुमची प्रगती अधिक होते, हे उमेदवार विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला हवे.
व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रासंबंधी जितका परिचय असतो, तितका अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना नसतो. याचे मुख्य कारण उद्योग क्षेत्रातील अनेक व्यक्ती व्यवस्थापन महाविद्यालयांमध्ये व्याख्यान अथवा कार्यशाळेसाठी येत असतात. अशाच पद्धतीने अभियांत्रिकीच्या विविध विद्याशाखांशी संबंधित उद्योग क्षेत्रांतील मान्यवरांकरवी प्रशिक्षण मिळाले, तर ही स्थिती सुधारण्यास मदत होईल. तसेच अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षांत विद्यार्थ्यांनी आपला प्रोजेक्ट संबंधित विषयाच्या उद्योग क्षेत्राची गरज लक्षात घेऊन केल्यास कॅम्पस रिक्रूटमेन्टला त्याचा उपयोग होऊ शकतो.
कॅम्पस रिक्रूटमेन्ट ही खरे तर करिअरच्या आभाळात प्रवेश करण्याची मिळालेली संधी असते. अशा वेळी आपल्याला नेमके काय येतेय आणि नेमके काय हवेय, हे लक्षात घेत आवडत्या क्षेत्रात आत्मविश्वासाने पाऊल टाकायला हवे. कॅम्पस प्लेसमेन्ट तुम्हाला हीच संधी देऊ करतं.
suchita.deshpande@expressindia.com
कॅम्पस रिक्रुटमेन्टच्या निमित्ताने..
कॅम्पस रिक्रूटमेन्ट ही खरे तर करिअरच्या आभाळात प्रवेश करण्याची मिळालेली संधी असते.
![कॅम्पस रिक्रुटमेन्टच्या निमित्ताने..](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2014/01/cv-0111.jpg?w=1024)
आणखी वाचा
First published on: 13-01-2014 at 01:15 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Campus recruitment