जर्मन फेडरल पर्यावरण फाउंडेशन (DBU) या संस्थेकडून पर्यावरण संरक्षण क्षेत्रात संशोधन करण्यासाठी बहुविद्याशाखीय पर्यावरण संशोधन कार्यक्रम राबवला आहे. पीएच.डीसाठी प्रवेश व एकूण तीन वर्षांच्या कालावधीकरता शिष्यवृत्ती असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे. या शिष्यवृत्तीसाठी विविध विद्याशाखांतील अर्जदारांकडून १५ जून २०१५ पूर्वी अर्ज मागवण्यात आले आहेत.
शिष्यवृत्तीबद्दल
ईशान्य जर्मनीमधील जर्मन फेडरल पर्यावरण फाउंडेशन (DBU) ही युरोप खंडातील पर्यावरण संरक्षण क्षेत्रात काम करणारी अग्रगण्य संशोधन संस्था आहे. १९९० साली स्थापन झालेल्या या संस्थेने ‘पर्यावरणाचे अभिनव प्रकल्प राबवणारी संस्था’ असा लौकिक प्राप्त केला आहे. स्थापनेपासून संस्थेने सुमारे ८,८०० पर्यावरण प्रकल्पांना साधारणत: दीड अब्ज युरोंचे आíथक सहकार्य केले आहे. सध्या संस्थेने पर्यावरण संरक्षण, पर्यावरण संशोधन आणि पर्यावरण संरक्षणाला पूरक तंत्रज्ञानाचा विकास या मुद्दय़ांवर आपले लक्ष केंद्रित केलेले आहे. संस्था संशोधनासाठी बहुविद्याशाखीय पर्यावरण संशोधन कार्यक्रम राबवत आहे.
या शिष्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत दरवर्षी ६० आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना पीएच.डीच्या संशोधन अभ्यासक्रमासाठी प्रवेशासहित शिष्यवृत्ती बहाल केली जाते. पीएच.डी कार्यक्रमासह शिष्यवृत्तीचा एकूण कालावधी तीन वर्षांचा आहे. शिष्यवृत्तीधारकाच्या पहिल्या वर्षांतील संशोधन गुणवत्तेवर दुसऱ्या वर्षांची शिष्यवृत्ती अवलंबून असेल आणि हाच निकष तिसऱ्या वर्षांसाठी लागू असेल. शिष्यवृत्तीअंतर्गत या तीन वर्षांदरम्यान जर्मन फेडरल पर्यावरण फाउंडेशनकडून संशोधनाच्या या कालावधीकरता शिष्यवृत्तीधारकाला साधारणत: ९४० युरो इतका मासिक भत्ता दिला जातो. त्या व्यतिरिक्त दर महिन्याला २१० युरो प्रवास भत्ता दिला जातो. याबरोबरच विवाहित शिष्यवृत्तीधारकाला त्याची पालकत्वाची जबाबदारी गृहीत धरून पाल्यासाठी २०० युरो एवढी अतिरिक्त आíथक मदत दिली जाते. याव्यतिरिक्त या शिष्यवृत्तीअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाला इतर सर्व सोयीसुविधाही दिल्या जातील.
आवश्यक अर्हता
संस्थेच्या या शिष्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत पीएच.डी.च्या प्रवेशासाठी आणि शिष्यवृत्तीसाठी सामान्यपणे पर्यावरण या विषयाशी संबंधित कोणत्याही शाखेतील अर्जदार अर्ज करू शकतो. अर्थात मूलभूत विज्ञान, अभियांत्रिकी, उद्योजकता, मानववंशशास्त्र व सामाजिक शास्त्रांमधील विविध विषयांचे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यासाठी अर्जदार संबंधित विषय शाखांमधील पदव्युत्तर पदवीधर असावा आणि त्याने पीएच.डीसाठी अर्ज केलेला नसावा. त्याला जर्मन भाषेचे उत्कृष्ट ज्ञान असणे अत्यावश्यक आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या स्तरावर अर्जदाराचे पर्यावरणाशी निगडित संशोधन असावे. अशा संशोधनाच्या अनुभवाचे एखाद्या संस्थेचे प्रशस्तिपत्र जोडल्यास उत्तम. तसेच त्या संशोधन प्रबंधामध्ये त्याने स्वत: पर्यावरण संरक्षणासाठी दिलेल्या योगदानाची माहिती असावी. अर्जदाराची पदवी व पदव्युत्तर पदवीच्या स्तरावर शैक्षणिक पाश्र्वभूमी उत्कृष्ट असणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया
या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण भरून या संदर्भात नमूद केलेल्या दिलेल्या वेबसाइटवर जमा करावा. अर्जाबरोबर त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीबद्दल सविस्तर माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी., सी.व्ही., त्याने पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमात केलेल्या संशोधनाचा लघु संशोधन प्रबंध किंवा त्याने शोधनिबंधात प्रकाशित केलेले त्याचे एखादे संशोधन, त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या दोन प्राध्यापकांची किंवा तज्ज्ञांची शिफारसपत्रे, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती, त्याचे जीआरई किंवा आयईएलटीएसचे गुणांकन, संशोधन अनुभवाचे प्रशस्तिपत्र इत्यादी गोष्टी जोडाव्यात.
निवड प्रक्रिया
अर्जदाराची किंवा पर्यावरण विषयातील गुणवत्ता व संशोधनाची आवड लक्षात घेऊन शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाईल.
अंतिम मुदत
पर्यावरण संशोधनातील पीएच.डीच्या प्रवेश व शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ जून २०१५ आहे.
संदर्भ-
http://www.dbu.de
itsprathamesh@gmail.com