संशोधन हे केवळ अत्याधुनिक प्रयोगशाळेमध्येच केलं जातं असं नाही. तुमच्या-आमच्यातसुद्धा एक संशोधक दडलेला असतो. अशाच काही संशोधकांचा आणि त्यांनी लावलेल्या शोधांचा परिचय करून देणारं मासिक सदर..
आंघोळ करताना बुळबुळीत झालेली साबणाची वडी हातातून सटकून बादलीतल्या पाण्यात पडल्याचं तुम्ही कधी अनुभवलं आहे का? जर अनुभवलं असेल तर हातातून सटकलेली साबणाची वडी बादलीतल्या पाण्यात पडल्यावर तरंगते का बुडते? आणि जर तुम्ही हे अनुभवलं नसेल तर मग एक प्रयोग करून बघा. आंघोळीसाठी वापरात असलेली साबणाची वडी बादलीभर पाण्यात टाका. तुम्हाला असं आढळेल की, साबणाची वडी थेट बादलीच्या तळाशी जाते.
नेमकी हीच गोष्ट केरळमधल्या थ्रिसुर जिल्ह्य़ातल्या कत्तुर या लहानशा गावात राहाणाऱ्या सी. ए. व्हिन्सेंट या व्यक्तीच्या लक्षात आली. कत्तुर गाव करूवन्नुर नदीच्या काठावर वसलेलं आहे. गावातले लोक अंघोळीला, कपडे धुवायला याच नदीवर जातात. नदीवर अंघोळ करताना बुळबुळीत झालेली साबणाची वडी हातातून सटकून तळाशी जाते आणि मग नवीन साबणाची वडी विकत आणेपर्यंत सगळ्या कुटुंबाला साबण न वापरताच अंघोळ करावी लागते. गावातल्या लोकांची आíथक परिस्थिती बेताची असल्याने ताबडतोब साबणाची वडी विकत घेणं ही त्यांच्या दृष्टीने न परवडणारी गोष्ट आहे. धडपडय़ा स्वभावाच्या व्हिन्सेंट यांनी आपल्या गावकऱ्यांची ही समस्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयोग करायला सुरुवात केली. मुळात व्हिन्सेंट हे कुणी शास्त्रज्ञ नव्हेत. ते साबण तयार करण्याचा लघुउद्योग करतात. पण त्यामुळे साबण तयार करण्याची प्रक्रिया आणि त्याला लागणाऱ्या कच्च्या मालाचं चांगलं ज्ञान व्हिन्सेंट यांना होतं. त्यांच्यापुढे आव्हान होतं, ते पाण्यावर तरंगू शकेल असा साबण तयार करण्याचं!
कोणतीही वस्तू द्रवात बुडेल किंवा नाही, हे त्या वस्तूची घनता आणि द्रवाची घनता यांवर अवलंबून असतं. जर वस्तूची घनता द्रवाच्या घनतेपेक्षा जास्त असेल तर ती वस्तू त्या द्रवामध्ये बुडते. याउलट जर द्रवाची घनता वस्तूच्या घनतेपेक्षा जास्त असेल तर मात्र ती वस्तू त्या द्रवामध्ये तरंगते. त्यामुळे व्हिन्सेंट यांना असा साबण हवा होता की, ज्याची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असेल आणि त्यामुळे तो पाण्यावर तरंगेल.
सतत १४ र्वष या दृष्टीने प्रयोग करत राहिल्यावर व्हिन्सेंट यांना अपेक्षित असलेला साबण तयार करण्यात यश आलं. व्हिन्सेंट यांनी तयार केलेल्या साबणाच्या वडीची घनता ०.८७८ ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर म्हणजे पाण्याच्या घनतेच्या ७३ टक्के इतकी आहे. पाण्याची घनता एक ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर असल्यामुळे ही साबणाची वडी पाण्यावर तरंगते.
पाण्यावर तरंगणाऱ्या या साबणाला फेस येतो का, ही साबणाची वडी किती दिवस पुरते असे प्रश्न स्वाभाविकच आपल्या मनात येतात. पाण्यावर तरंगण्याचा गुणधर्म सोडला तर आपल्या दृष्टीने हा इतर साबणासारखाच साबण आहे. हा साबण तयार करताना आपल्याला हवा तो रंग आणि सुवास त्यामध्ये मिसळता येतो. त्याचप्रमाणे या साबणाला फेसही चांगला येतो. पण घनता कमी असल्यामुळे इतर साबणांच्या तुलनेत या साबणाची वडी थोडी लवकर संपते. व्हिन्सेंट यांच्या मते, १०० ग्रॅम साबणाची वडी चार ते पाच व्यक्ती असलेल्या कुटुंबाला साधारणपणे सात-आठ दिवस पुरते. सध्या १०० ग्रॅम साबणाच्या वडीची किंमत १२ रुपये आहे.
विशेष म्हणजे या साबणाचं भारतीय एकस्व (पेटंट) व्हिन्सेंट यांना मिळालं आहे. त्याचप्रमाणे साबण तयार करण्याचं हे तंत्र आणि त्यासाठी वापरले जाणारे पदार्थ यांचं ज्ञान आपल्याला व्यापारीकरणासाठी मिळावं, यासाठी काही नामांकित कंपन्यांशी व्हिन्सेंट यांची बोलणी सुरू आहेत.
सध्या व्हिन्सेंट यांचा हा अनोखा साबण केरळ राज्यामध्ये विकला जातो आहे आणि या साबणाला चांगली मागणीही आहे. दररोज सुमारे पाचशे साबणाच्या वडय़ा आज विकल्या जात आहेत. पण इतर राज्यांमधून मोठय़ा प्रमाणात मागणी आली तर त्या ठिकाणीही हा साबण पोहोचविण्याची व्हिन्सेंट यांची तयारी आहे. कारण दररोज सुमारे दोन हजार साबणाच्या वडय़ा तयार करण्याची त्यांच्या कारखान्याची क्षमता आहे.
आपल्या गावकऱ्यांना भेडसावणारी समस्या दूर करण्यासाठी सातत्याने चौदा र्वष प्रयोग करणारा हा एक अत्यंत साधा माणूस. अहमदाबादच्या नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनने व्हिन्सेंट यांनी केलेल्या संशोधन कार्याचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव केला आहे. एवढंच नव्हे तर त्यांना या वैशिष्टय़पूर्ण साबणाच्या वडीचे भारतीय एकस्व मिळवून देण्यात मदत केली आहे.
hemantlagvankar@gmail.com