नॉर्वेमधील बी आय नॉर्वेजियन बिझनेस स्कूल या प्रख्यात व्यवस्थापन विद्यापीठाकडून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती कार्यक्रम राबवला जातो. अर्थशास्त्र व व्यवस्थापनातील विविध विषयांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे उच्चशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येतो. या अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्तीधारकाला नि:शुल्क प्रवेश व इतर सर्व सोयीसुविधा विद्यापीठाकडून दिल्या जातात. कोणत्याही विषयामध्ये पदवी घेतलेल्या पात्र आंतरराष्ट्रीय अर्जदारांकडून या संस्थेने दि.१ मार्च २०१७ पूर्वी अर्ज मागवले आहेत.
* शिष्यवृत्तीबद्दल –
बी आय नॉर्वेजियन बिझनेस स्कूल हे नॉर्वेतील अग्रगण्य तर युरोपातील द्वितीय क्रमांकाचे विद्यापीठ आहे. जगातील महत्त्वाच्या प्रभावी पस्तीस बिझनेस स्कूल्सपैकी एक असा पुरस्कार बी आयला मिळालेला आहे. राजधानी ओस्लो इथे असलेल्या कॅम्पससहित विद्यापीठाचे एकूण चार कॅम्पस आहेत. विद्यापीठ अर्थशास्त्र व व्यवस्थापनाशी संबंधित विषयांतील पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी. अभ्यासक्रम बहाल करते. संस्थेच्या पदवी अभ्यासक्रमांपैकी जवळपास सर्व अभ्यासक्रम हे नॉर्वेजियन भाषेमध्ये चालतात तर सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रम हे इंग्रजीमध्ये शिकवले जातात. ‘बी आय प्रेसिडेन्शियल स्कॉलरशिप’ या नावाने ओळखला जाणारा हा शिष्यवृत्ती कार्यक्रम युरोपमधील प्रतिष्ठित शिष्यवृत्ती कार्यक्रमांपैकी एक आहे. अर्थशास्त्र व्यवस्थापन व संबंधित विषयांतील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील गुणवत्ता आकर्षित करण्याच्या हेतूने हा शिष्यवृत्ती कार्यक्रम चालू करण्यात आलेला आहे. या शिष्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र व व्यवस्थापनातील विविध विषयांमध्ये उदाहरणार्थ, फायनान्शियल इकॉनॉमिक्स, बिझनेस अँड इकॉनॉमिक्स, प्रोफेशनल अकाउंटन्सी इत्यादीमधील एमएससी हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती बहाल केली जाते. पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध असलेले हे विविध विषय विद्यापीठाने त्यांच्या संकेतस्थळावर नमूद केलेले आहेत. या शिष्यवृत्ती कार्यक्रमाअंतर्गत शिष्यवृत्तीधारकाचे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क माफ केले जाईल. शिष्यवृत्तीचा एकूण कालावधी हा एक वर्षांचा तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा असेल. शिष्यवृत्तीधारकाला फक्त शिष्यवृत्तीच्या कालावधीदरम्यान विद्यापीठाकडून त्याच्या खर्चासाठी आवश्यक मासिक वेतन देण्यात येईल. पदवीच्या द्वितीय वर्षांमध्ये शिष्यवृत्ती टिकवण्यासाठी अर्जदाराला विद्यापीठाने निश्चित केलेला किमान जीपीए मिळवणे क्रमप्राप्त आहे. याव्यतिरिक्त शिष्यवृत्तीधारकाला येण्याजाण्याचा विमानप्रवास भत्ता, प्रकल्प निधी, आंतरराष्ट्रीय आरोग्य विमा व अपघातापासून सुरक्षिततेसाठी विमा यासारख्या इतर सर्व सोयीसुविधाही दिल्या जातील. विद्यापीठाकडून दिल्या जाणाऱ्या एकूण शिष्यवृत्तींची संख्या २० एवढी आहे.
* आवश्यक अर्हता –
ही शिष्यवृत्ती सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांना खुली आहे. या शिष्यवृत्तीला अर्ज करण्यासाठी अर्जदार पदवीधर असावा. अर्जदाराची पदवीच्या स्तरावर शैक्षणिक पाश्र्वभूमी अतिशय उत्कृष्ट असणे आवश्यक आहे. अर्जदाराचा हा जीपीए त्याच्या विद्यापीठाचा असल्यामुळे त्या जीपीएचे समकक्ष नॉर्वेजियन गुणांकन केले जाईल. निवड प्रक्रियेतील गुणवत्ता यादीसाठी हेच गुणांकन गृहीत धरले जाईल. अर्जदाराचे बोली व लेखी इंग्रजीवर प्रभुत्व असावे. अर्जदारांनी परदेशी उच्चशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या जीआरई व जीमॅट या परीक्षांपैकी कोणतीही एक परीक्षा दिलेली असावी व त्यामध्ये उत्तम गुण मिळवलेले असावेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय अर्जदारांनी टोफेल किंवा आयईएलटीएस यांपैकी कोणत्याही एका इंग्रजी भाषेच्या परीक्षेत अतिशय उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. याशिवाय अर्जदाराचा अभ्यासेतर उपक्रमांमध्ये चांगला सहभाग असावा.
* अर्ज प्रक्रिया –
या शिष्यवृत्तीसाठी अर्जदाराने त्याचा अर्ज विद्यापीठाच्या ऑनलाइन अर्जप्रणालीद्वारे पूर्ण करून संकेतस्थळावर जमा करावा. अर्जासहित अर्जदाराने त्याच्या वैयक्तिक व शैक्षणिक पाश्र्वभूमीबद्दल विस्तृतपणे माहिती देणारे त्याचे एस.ओ.पी., त्याचा सी.व्ही., तसेच त्याच्या शैक्षणिक पाश्र्वभूमीशी संबंधित असलेल्या तीन प्राध्यापकांची शिफारसपत्रे, आतापर्यंतच्या सर्व शैक्षणिक ट्रान्सक्रिप्ट्सच्या अधिकृत प्रती, सहभागी होऊन विशेष श्रेणी मिळवलेल्या अभ्यासेतर उपक्रमांची प्रशस्तीपत्रांच्या साक्षांकित प्रती, त्याचे जीआरई /जीमॅट, टोफेल किंवा आयईएलटीएसचे गुणांकन, कार्य अनुभवाचे प्रशस्तीपत्र, पारपत्राची प्रत इत्यादी सर्व गोष्टी जमा कराव्यात. अर्जदारांचे अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
* निवड प्रक्रिया –
अर्जदाराची नॉर्वेजियन गुणांकन पद्धतीनुसार शैक्षणिक गुणवत्ता लक्षात घेऊन त्याची अंतिम निवड केली जाईल. निवड झालेल्या अर्जदारांना त्यांच्या निवडीविषयी त्वरित कळवले जाईल.
* अंतिम मुदत –
या शिष्यवृत्तीला अर्ज करण्याची अंतिम मुदत
दि.१ मार्च २०१७ ही आहे. महत्त्वाचा दुवा – http://www.bi.edu
itsprathamesh@gmail.com