गांधीजींच्या पट्टशिष्या असलेल्या अवंतिकाबाई गोखले. मराठीबरोबर इंग्रजी भाषेवरही प्रभुत्व असलेल्या अवंतिकाबाईंनी चंपारण्यातील सत्याग्रहापासून गांधीजींना साथ दिली. स्त्रियांच्या व्यक्तिविकास व सबलीकरणासाठी त्यांनी गिरगावात ‘हिंद महिला समाजा’ची स्थापना केली तसेच गिरणी कामगार स्त्रियांसाठी भारतात प्रथमच पाळणाघरे सुरू केली. याशिवाय अस्पृश्य समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्नही केले. १९३० व ३२ सालच्या मिठाच्या सत्याग्रहात मुंबईतून शेकडो स्त्रिया सामील झाल्या. त्याचे श्रेय बाईंनाच जाते. एक नि:स्पृह, स्पष्टवक्ती, अनुशासनप्रिय कार्यकर्ती म्हणून स्वातंत्र्यलढय़ाच्या इतिहासात त्यांना मानाचे पान आहे.
भा रताच्या स्वातंत्र्य आंदोलनाच्या इतिहासात गांधींची पहिली भारतीय शिष्या म्हणून अवंतिकाबाई गोखले ओळखल्या जातात. गांधीजींची व अवंतिकाबाईंची ओळख त्या वेळचे प्रसिद्ध तत्त्वज्ञ व विचारवंत श्रीनिवास शास्त्री यांनी करून दिली होती. ही बाई सामान्य नाही हे गांधीजींनी ओळखले. आपण हिंदुस्थानात दलित व स्त्रिया यांच्याकरिता जे काम करू इच्छितो त्यासाठी हीच कार्यकर्ती आपल्याबरोबर हवी, असे गांधीजींना वाटले.
अवंतिकाबाईंचे लग्न नवव्या वर्षी झाले होते. त्या वेळच्या पद्धतीप्रमाणे त्यांना लिहिता-वाचताही येत नव्हते. सासरी आल्यावर त्या लिहायला-वाचायला शिकल्या. विलायतेला शिकायला गेलेल्या नवऱ्याने अवंतिकाबाईला आपण परत येईपर्यंत इंग्रजीत लिहिणे, वाचणे व बोलणे न आल्यास आपण तुला नांदविणार नाही, अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरून अवंतिकाबाई आपल्या सासऱ्याजवळ इंग्रजी शिकल्या. १९१९ पर्यंतचे त्यांचे जीवन मध्यमवर्गीय ब्राह्मण स्त्रीचे होते. त्या वर्षी त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. इचलकरंजीच्या राणीला इंग्लंडला जायचे होते. तिच्यासोबत जाण्यासाठी समवयस्क, शिक्षित व इंग्रजी जाणणारी स्त्री म्हणून अवंतिकाबाईंची निवड झाली. विलायतेला गेल्यावर त्यांनी अनेक इस्पितळांना भेटी देऊन तिथल्या कार्यपद्धतीची माहिती करून घेतली. श्रीमंत घरातील स्त्रियांना त्यांनी स्वयंसेवी संस्थांतून काम करताना पाहिले. त्यांच्याशी त्यांचे काम व कामातील अडचणींबाबत चर्चा केली. त्यापासून स्फूर्ती घेऊन मायदेशी परतल्यावर गिरणगावात त्याच पद्धतीने त्यांनी काम सुरू केले. या भागात त्यांनी शिक्षणाचे व आरोग्याचे महत्त्व व मुलांचे योग्य पालनपोषण या बाबतीत जाणीवजागृती केली. या भागात गिरणी कामगार स्त्रियांसाठी भारतात प्रथमच पाळणाघरे सुरू केली. बाई स्वत: चित्पावन ब्राह्मण. घरात खूप सोवळेओवळे. पण हे सर्व बाजूला सारत त्या अस्पृश्य समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी धडपडू लागल्या.
१९१६ साली लखनौ काँग्रेसमध्ये त्यांची गांधीजींशी गाठ पडली. गांधीजींनी जेव्हा बिहार चंपारण्यातील निळीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे दु:ख ऐकले तेव्हा त्यांच्याबरोबर अवंतिकाबाईंनीही सत्याग्रहासाठी यावे अशी विनंती केली. चंपारण्याच्या सत्याग्रहामध्ये भाग घेण्यासाठी महाराष्ट्राच्या सत्याग्रही तुकडीत आनंदी वैशंपायन व अवंतिकाबाई गोखले या दोन महिला होत्या. बिहारमध्ये फिरून त्यांनी महिलांना आरोग्याचे धडे दिले. मुलींच्या शिक्षणाकरिता प्रचार केला. बडहरवा गावी मुलींची शाळा काढली. मुलींच्या शाळेला पुरुषांबरोबर स्त्रियांचाही विरोध होता. लिहिणे, वाचणे व त्यांच्यामध्ये स्वदेशप्रेम निर्माण करण्याचे अवघड काम अवंतिकाबाईंनी केले. चंपारण्यात त्यांनी मराठी भाषेतले पहिले गांधींचे चरित्र लिहायला सुरुवात केली. १९१९ मध्ये नाशिकमधल्या एका सभेत अवंतिकाबाईंचे भाषण ऐकून लोकमान्य टिळक प्रभावित झाले आणि ते उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘‘महाराष्ट्राची सरोजिनी आता तयार झाली आहे.’’
स्त्रियांची सर्वागीण उन्नती होण्यासाठी त्यांना एकत्र आणून त्यांचा व्यक्तिविकास व सबलीकरण व्हावे यासाठी शिक्षण देणे बाईंना आवश्यक वाटले. त्यासाठी त्यांनी गिरगावात ‘हिंद महिला समाजा’ची स्थापना केली. या समाजाच्या त्या स्वत: ३१ वर्षे अध्यक्ष होत्या. अवंतिकाबाईंनी या समाजात सूतकताईचे वर्ग सुरू केले. यशोदाबाई भट यांच्यातील कीर्तनाचे अंग ओळखून त्यांच्याकडून चाळीचाळीत फिरून राष्ट्रीय कीर्तने घडवून आणली. ‘स्त्रिया व राष्ट्र’ या विषयावर बोलण्यासाठी अखिल भारतीय पातळीवरचे बरेच नेते त्यांनी समाजात बोलावले. १९३० व ३२ सालच्या मिठाच्या सत्याग्रहात मुंबईतून शेकडो स्त्रिया सामील झाल्या. त्याचे श्रेय बाईंनाच जाते. ‘हिंद महिला’ नावाचे एक साप्ताहिक सुरू केले. फैजपूरच्या काँग्रेसला हिंद महिला समाजाच्या महिलांचा मोठा गट बाईंच्या नेतृत्वाखाली गेला. या अधिवेशनात खादी विक्रीची जबाबदारी बाईंनी उचलली व अधिवेशन काळात हजारो रुपयांची खादी विक्री चार-पाच दिवसांत करण्याचा विक्रम त्यांनी केला. त्यांनी स्वत: आमरण खादीच वापरली. स्वत: सूत कातून व विणून दरवर्षी त्या गांधींना धोतरजोडीची भेट पाठवीत. गांधीजी त्याबाबत गमतीने म्हणत, की अविबेनने मला धोतरजोडी दिली नाही तर मला लंगोटीच नेसावी लागेल.
१९२२ मध्ये मुंबई महानगरपालिकेने स्त्रियांचा मताधिकार व निवडणुका लढविण्याचा अधिकार मान्य केला. त्या कायद्याप्रमाणे झालेल्या निवडणुकीत सरोजिनी नायडू, बच्चूबेन लोटवाला, हॅडगिव्हसन व अवंतिकाबाई अशा चार स्त्रिया निवडून आल्या. त्यात अवंतिकाबाईंना प्रचंड मते मिळाली. परंतु काही तांत्रिक कारणामुळे त्यांची निवड रद्द झाली. बाईंना असलेला प्रचंड पाठिंबा व त्यांचे सामाजिक कार्य लक्षात घेऊन त्यांना १ एप्रिल १९२३ रोजी महानगरपालिकेत स्वीकृत सदस्यत्व मिळाले. १९३१ पर्यंत त्या सातत्याने स्वीकृत सदस्य होत्या. आपल्या मतदारसंघातील प्रश्न व ठराव मांडून त्यांनी महापालिका दणाणून सोडली.
आरोग्य व शिक्षण ही दोन खाती बाईंच्या जिव्हाळय़ाची. शाळेच्या आसपास अनारोग्यकारक खाद्यपेये विकली जाऊ नयेत, चौपाटीवर बसून हवा खावी, पदार्थ खाऊन कागद, द्रोण वगैरे टाकून वाळू खराब करू नये, अशा प्रकारचे ठराव त्यांनी मांडले. त्या सभागृहात मराठीतूनच बोलत. त्यांची भाषणे व युक्तिवाद विचारप्रवृत्त करणारे असत म्हणून त्यांना अध्यक्षांनी इंग्रजीत बोलायची विनंती केली. मराठीइतकेच त्यांचे इंग्रजी भाषणही प्रभावी होई. इंग्रजीच काय, पण मराठीही घरातल्या वडीलधाऱ्यांकडेच बाई शिकल्या होत्या. आपल्या कुशाग्र बुद्धीच्या जोरावर त्यांनी दोन्ही भाषांवर प्रभुत्व मिळविले होते.
१९२६मध्ये बाई महापालिकेच्या स्थायी समितीवर नियुक्त झाल्या. ही समिती अत्यंत महत्त्वाची असते. त्या वेळी बैठकीला हजर राहिल्यावर ३० रुपये भत्ता मिळे. ३० रुपयांचा चेक त्यांनी विठ्ठलभाई पटेलांकडे परत पाठविला. त्यांचे म्हणणे असे की निवडून आल्यावर बैठकीला हजर राहणे हे समिती सदस्याचे कर्तव्य आहे. त्यामुळे आपण बैठकीला हजर राहिल्याचा भत्ता घेणार नाही असे बजावले. यातील काही तांत्रिक गोष्टी विठ्ठलभाई पटेलांनी दाखवून देऊन हा भत्ता त्यांच्या आवडीच्या कार्यासाठी दान करण्याचा मार्ग दाखवला होता.
महानगरपालिकेच्या दवाखान्यात स्त्रियांची वैद्यकीय तपासणी व उपचाराची सोय त्यांनी करून घेतली. आठवडय़ात संपूर्ण एक दिवस स्त्रियांसाठी राखून ठेवला. स्त्रीरोगतज्ज्ञांची नेमणूक करून आयाबायांचा दुवा घेतला. आरोग्यासाठी असलेल्या सर्व सेवासंस्थामधून त्यातील अंदाधुंदी कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी या सर्व सेवासंस्थांवर महानगरपालिकेचा प्रतिनिधी असल्याशिवाय व त्यांनी मान्यता दिल्याशिवाय त्या संस्थांना आर्थिक साहाय्य देऊ नये, असा ठराव पास करून घेतला. हे बाईंचे महत्त्वाचे कार्य.
१९२८मध्ये महापौरपदासाठी त्यांचे नाव सुचविले गेले. दुसरे नाव होते मुंबईतील प्रसिद्ध डॉ. गोपाळराव देशमुख यांचे. बाईंच्या मते डॉक्टर सर्वतोपरी योग्य उमेदवार होते. त्यामुळे त्यांनी आपण या पदासाठी इच्छुक नसल्याचे सांगितले. नाहीतर १९२८ सालीच मुंबईला पहिली महिला महापौर मिळाली असती. महानगरपालिकेत कर्मचारी व सदस्य यांना खादी घालणे काही कारणाने शक्य नसेल तर त्यांनी स्वदेशी कपडे वापरावे हा ठराव त्यांनी पास करून घेतला. हे त्यांचे महापालिकेचे शेवटचे योगदान. २६ ऑक्टोबर १९३० ला पोलीस कमिशनरचा हुकूम मोडून बाईंनी मुंबईच्या आझाद मैदानावर झेंडावंदन केले. या झेंडावंदनापूर्वी अवंतिकाबाई महिलांचा मोर्चा घेऊन मिरवणुकीने गेल्या. कृष्णाकुमारी सरदेसाई नावाच्या १३-१४ वर्षांच्या परकरी मुलीच्या हातात झेंडा होता. पोलिसांनी तिच्या हातावर लाठय़ा मारल्यामुळे ती खाली पडली. पण तिने झेंडा सोडला नाही. या महिलांवर घोडेस्वार सोडल्यामुळे महिला पांगल्या. अवंतिकाबाईंना दुसऱ्या दिवशी पालिका सदनात अटक होऊन सहा महिन्यांची शिक्षा झाली व त्यांचे नगरसेविकापद रद्द झाले. क्लेटन म्युनिसिपल कमिशनर असताना आपल्या भाषणात एकदा म्हणाले, की या सभागृहातील अवंतिकाबाईंचा अपवाद सोडता प्रत्येक जण माझ्याकडे शिफारशीसाठी आला आहे. अवंतिकाबाईंमुळे सभागृहातील चर्चेचे वातावरण व पातळी उंच राहते. त्यांची कामावरील निष्ठा, प्रामाणिकपणा व विचारांची स्पष्टता वाखाणण्यासारखी आहे. त्या निरनिराळय़ा कामात व्यग्र असूनही कधी सभागृहात गैरहजर नाहीत. निरनिराळय़ा वॉर्डात फिरून जनतेच्या सोयी, गैरसोयीची त्या दखल घेऊन सभागृहात वाचा फोडत. बाईंचे महानगरपालिकेतील काम उत्तुंग होते. नंतरच्या नगरसेविकांत हे स्थान फक्त मृणाल गोरे मिळवू शकल्या. बाईंचे हे काम लक्षात घेऊनच त्यांच्या घरावरून जाणाऱ्या रस्त्याला ‘अवंतिकाबाई गोखले रोड’ हे नाव महानगरपालिकेने दिले.
१९३० साली सविनय कायदेभंगाच्या वेळी ७ एप्रिल रोजी झालेल्या प्रचंड सभेत बाईंचे भाषण फारच प्रभावी झाले. त्यांनी महाराष्ट्रातील वीरवृत्तीला आवाहन करून सांगितले, की या आंदोलनात भाग घेऊन महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले पाहिजे. आपण गांधीजींच्या मागे उभे राहिले पाहिजे. विलायती वस्तूंवर बहिष्कार, दारूबंदी व आगामी कायदेमंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार घातला पाहिजे.
युद्ध समिती नावाची एक समिती सत्याग्रहाची योजना व अंमलबजावणी करण्यासाठी नेमली होती. या समितीच्या तेराव्या तुकडीच्या प्रमुख अवंतिकाबाई होत्या. पहिल्या बारा तुकडय़ा गजाआड गेल्या. बाईंचे पती बबनराव यांचे दोन्ही हात निकामी होते. त्यांचे सर्व काम करावे लागे. म्हणून बाईंना गांधीजींनी सत्याग्रह करण्याऐवजी बाहेर राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे, असे सुचविले. पण युद्ध समितीच्या प्रमुखाने सत्याग्रह न करणे हे नैतिकतेला धरून होणार नाही, असे सांगून त्यांनी सत्याग्रह करायचे ठरविले. त्यापूर्वी जमलेल्या स्त्रियांनी आपल्या हातात झेंडे घेऊन उंच फडकावले म्हणून पोलिसांनी त्यांना पकडून भांडुपच्या जंगलात सोडले व अपमानास्पद वागणूक दिली. त्याचा निषेध करणारे एक पत्रक २७ ऑक्टोबरला काढले. त्यांच्यावर या कृत्याबद्दल खटला होऊन सहा महिने कैद व ४०० रुपये दंड झाला. १९३२ साली त्यांना पुन्हा दोन महिने तुरुंगवास झाला.
पती बबनराव यांना १९३३ साली हृदयविकाराचा झटका आला. गांधीजींनी बाईंना आपल्या अपंग व नाजूक हृदय झालेल्या पतीकडे संपूर्ण लक्ष देण्यास सांगितले. १९३७ च्या प्रांतिक स्वायत्ततेच्या कायद्यानुसार होणाऱ्या निवडणुकीला उभे राहण्यासाठी सरोजिनीदेवींनी खूप पाठपुरावा केला. पण अपंग पतीसाठी त्यांनी घरी राहायचे ठरविले. १९४० किंवा १९४२च्या आंदोलनातही त्या भाग घेऊ शकल्या नाहीत. १९३३ पासून स्वत:च्या मृत्यूपर्यंत त्यांचे विधायक कार्य चालूच राहिले. १९४७च्या आसपास त्यांना कर्करोग झाल्याचे कळले. त्याच वेळी स्वातंत्र्य मिळाले. गांधीजींना पट्टशिष्येच्या या आजाराचे अतीव दु:ख झाले. त्यांनी बाईंना उल्हसित करणारे एक पत्र लिहिले. हे पत्र गांधीजींनी अवंतिकाबाईंना लिहिलेले शेवटचे पत्र.
३० जानेवारी १९४८ ला गांधीजींची नथुराम गोडसेने हत्या केली. त्याचा धक्का अवंतिकाबाईंना बसला. त्यांना भास होऊ लागले. बापू मला बोलवीत आहेत, तुम्हीही चला, असे त्या बबनरावांना सांगू लागल्या. गांधीजींपाठोपाठ सव्वा वर्षांनी त्यांच्या या पहिल्या भारतीय शिष्येने २६ मार्च १९४९ ला मुंबईत राहत्या घरी देह ठेवला. एक नि:स्पृह, स्पष्टवक्ती, अनुशासनप्रिय कार्यकर्ती म्हणून स्वातंत्र्यलढय़ाच्या इतिहासात त्यांना मानाचे पान आहे.
chaturang@expressindia.com
गांधीजींची पट्टशिष्या
गांधीजींच्या पट्टशिष्या असलेल्या अवंतिकाबाई गोखले.
आणखी वाचा
First published on: 03-08-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Avantika bai gokhale