आज आपल्या कार्य-कर्तृत्वाने गगनाला गवसणी घालणाऱ्या आणि सर्व क्षेत्रांत ठसा उमटविणाऱ्या मुलींच्या संख्येत जशी प्रचंड वाढ झाल्येय, तशीच शाळकरी वयात प्रेमात पडणाऱ्या, अव्यवहारीपणे, बेजबाबदारपणे प्रेमप्रकरणे करून त्या प्रेमाच्या पूर्तीसाठी, लग्नासाठी  पालकांना वेठीस धरून इमोशनली ब्लॅकमेल करणाऱ्या मुलींच्या संख्येतही प्रचंड वाढ झाली आहे. एकमेकांत वैर निर्माण होईल इतक्या टोकांचे मतभेद वाढत चालले आहेत. तडजोड कुठपर्यंत आणि का हा प्रश्न पालकांना अस्वस्थ करतो आहे. कौटुंबिक अस्वास्थ्य निर्माण करणाऱ्या या संघर्षांला कसं तोंड द्यायचं हा आजच्या आई-बाबांसमोरचा मोठा प्रश्न आहे.
प्रेमविवाह! तरुणाईला शतकानुशतके भुरळ घालणारा शब्द! गेली दोन दशके तर  प्रेमविवाहाचा इतका उदोउदो होतोय की ‘तुम्ही काय करता?’ असा प्रश्न विचारल्यावर एखादी गृहिणी उगाचच कमीपणा वाटून ज्याप्रमाणे ‘काही नाही; मी घरीच असते.’ असं सांगते आणि त्यावेळी तिची जी गत होते, तीच आज ‘आमचं अ‍ॅरेंज्ड मॅरेज आहे’ हे सांगणाऱ्यांची होते.
 बहुतेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये विजोड प्रेमप्रकरणे दाखविलेली असतात. त्यातील नायक-नायिका सगळ्या अडथळ्यांच्या शर्यती पार करून एकमेकांना भेटतात; प्रेमाचा विजय होतो आणि चित्रपट संपतो. यातील विजोडपणा बऱ्याचवेळा धार्मिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक बाबतीतला असतो. प्रत्यक्षात अशी विजोड लग्ने अयशस्वी होण्याचे प्रमाण किती जास्त आहे, ते कुटुंब न्यायालयातील घटस्फोटांची संख्या बघितली की कळते. हे सर्व आठवलं याचं कारण नुकतीच भेटलेली माझी मत्रीण नीला. तिचा उतरलेला चेहरा आणि रोडावलेली तब्येत पाहून मी तिला काय होतंय याची सहज चौकशी केली आणि नीलाने तिच्या मनातली व्यथा सांगितली. नीला व तिचे पती उच्चशिक्षित, दोघेही वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये उच्चपदांवर काम करणारे, त्यांना दोन गोड मुली. नीलाच्या मोठय़ा मुलीने कॉलेजमध्ये शिकताना तिच्या एक वर्ष मागे शिकणाऱ्या मुलाशी प्रेमविवाह ठरवला. नीला म्हणाली, ‘तिने प्रेमविवाह, अगदी आंतरजातीयसुद्धा करायला आमची हरकत नव्हती; पण ती वयात आल्यापासून प्रेमात पडताना काय टाळायचं हे मी तिला उठताबसता सांगत होते; नेमक्या त्याच सगळ्या गोष्टी या मुलात होत्या. मुलगा किमान बुद्धिजीवी कुटुंबातला तरी असावा, ही साधी अपेक्षाही पूर्ण झाली नाही. तिच्याशी अगदी मत्रीचे संबंध असलेल्या आम्हा पालकांना या निर्णयात सहभागी करावे असे तिला कोठेही वाटले नाही. छोटय़ा बहिणीनेही तिला या प्रकरणाचा सुगावा असताना आम्हाला सावध केले नाही याचेही खूप वाईट वाटले.’  
नीला व तिच्या पतीने मुलीला अजिबात आरडाओरडा, मारझोड न करता या लग्नातले तोटे समजावून सांगितले. त्यांना कळले तेव्हा प्रेमप्रकरणाला सुरुवात होऊन जेमतेम एखादमहिना झाला होता; तसेच मुलगी आतापर्यंत तरी मोठय़ांचे ऐकणारी होती, त्यामुळे सामोपचाराने हे प्रकरण मिटेल असे वाटले होते. त्या मुलाला बोलावून त्यालाही समजावले. त्याला समजावताना  दोन्ही घरच्या परिस्थितीची तुलना करून त्याला अपमानास्पद वाटेल असे काहीही न बोलता फक्त तो अजून शिकत असल्याने लग्नासाठी आíथकदृष्टय़ा स्थिरावलेला तर नाहीच, पण त्याला साधी नोकरी लागायलासुद्धा किमान ६ महिने आहेत व आमच्या दृष्टीने आमच्या मुलीचे तर एखाददोन वर्षांत लग्नाचे वय होईल; शिवाय ती खूप वेगळ्या परिस्थितीत वाढलेली असल्याने त्यांच्या घरी तिला जुळवून घेणे कठीण जाईल असे सांगितले. पण काहीही उपयोग झाला नाही. तेव्हा त्याच्या वडिलांना बोलावून त्याला समजावले होते तसेच समजावून सांगितले. पण पालथ्या घडय़ावर पाणी! मुलीला या लग्नापासून परावृत्त करण्याचे सर्व सुसंस्कृत प्रयत्न हरले. यानंतर मात्र त्यांनी मुलीला समजावण्याचे प्रयत्न सोडून दिले.
   नीलाची व्यथा ऐकत असताना माझ्यासमोर अनेक मैत्रिणी उभ्या राहिल्या, ज्यांची थोडीबहुत परिस्थिती अशीच आहे. त्या सर्व ऐकताना वाटायला लागलं की ही जवळजवळ सार्वत्रिक किंवा प्रातिनिधिक समस्या झाली आहे. बहुतांश घरात घडणारी! अनेक मुलं-मुली शाळा-कॉलेजमध्ये असतानाच आपलं लग्न जमवतात आणि तशी सूचना दबकत का होईना पालकांना देतात. तेव्हा त्यांच्या भवितव्याविषयी खरं तर काहीच नक्की नसते. शिवाय तो अनेकदा अपरिपक्व वयात घेतलेला निर्णय असू शकतो, त्यामुळे फारच कमी घरात या वयातल्या मुला आणि मुलींच्या नात्याला पालकांकडून हिरवा सिग्नल दिला जातो. निदान पहिल्या भेटीत तरी!
विनया, जिच्या घरीही हेच ‘दळण’ सुरू आहे. ती सांगत होती, ‘‘मुलीने लग्नाचा निर्णय जाहीर केल्यावर ३-४ महिन्यात लग्न करून सासरी निघून गेली असती तरी आम्हाला कमी त्रास झाला असता. पण मुलगा वयाने बरोबरीचा असल्याने किमान ४-५ वष्रे थांबणे आले. आम्ही तडजोड करायला तयार आहोत, पण या घाईत घेतलेल्या निर्णयाचा तिला भविष्यकाळात त्रास होऊ नये, यासाठी आमची धडपड आहे. पण ते तिला कळत नाही. त्यामुळे हा सर्व काळ ती भांडत, वादावादी करत आमच्याच घरात राहते आहे. तिच्या डोक्यात आज प्रकाश पडेल, उद्या पडेल या विचाराच्या आशा-निराशेच्या झुल्यावर आम्हाला झुलवत राहिली, त्यामुळे जास्त त्रास होतोय; मुलीच्या आणि आमच्या संबंधात तर कटुता निर्माण झाली आहेच, पण आमच्या सगळ्यांच्याच तब्येतीवरही परिणाम झालाय.’’
हल्ली मुली लवकर वयात येतात. वयाच्या नऊ ते अकराव्या वर्षी वयात आलेल्या मुलींना वयाच्या साधारण पंधराव्या ते अठराव्या वर्षी बॉयफ्रेंडची गरज निर्माण होते. तेव्हा त्यांचे जग आजूबाजूच्या मित्रमत्रिणींपुरतेच मर्यादित असल्याने त्यांना प्रेमात पडायला बरोबरीचे किंवा वयाने थोडे लहान असलेलेच मुलगे उपलब्ध असतात. त्यामुळे आधी शिक्षण पूर्ण करणे, मग नोकरी शोधणे, राहायला घर घेणे, मग जोडीदाराचा शोध व नंतर लग्नाचा विचार करणे या क्रमवारीऐवजी आधी जोडीदार निवडणे, मग (जमल्यास) शिक्षण पूर्ण करणे, मग नोकरी आणि मग लग्न असा विपरीत क्रम हल्ली सगळीकडे दिसतोय. एकीकडे मुलींचे तारुण्यात येण्याचे वय कमी होतेय, तर लग्नाचे वय वाढतेय. त्यामुळे प्रेमात पडणे व विवाह यांच्यातील काळाचे अंतर प्रचंड वाढल्याने अनेक मानसिक, शारीरिक, भावनिक, कौटुंबिक तसेच सामाजिक समस्यांचा जन्म होतोय.  
या समस्येचा एक साइड इफेक्ट असाही आहे की बहुतेक मुलींचे शाळा-कॉलेजातच ‘अ‍ॅडव्हान्स बुकिंग’ होत असल्याने जी सरळमार्गी, अभ्यासाच्या वेळेला फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करणारी अशी हुशार मुले उच्चशिक्षित झाल्यावर करियरमध्ये स्थिरस्थावर होऊन लग्नाला उभी राहतात, तेव्हा त्यांना योग्य आणि ‘फर्स्ट हँड’ जोडीदार मिळणे हल्ली कठीण झाले आहे!
पाश्चात्त्य देशात लहान वयात मुले जोडीदार शोधतात. पण तिथे ती खूप लहान वयात स्वतच्या पायावर उभी राहतात. तिथली कुटुंबसंस्था डळमळीत आहे. त्यामुळे मुलांना भावनिक सुरक्षिततेसाठी कदाचित लहान वयात जोडीदाराची आवश्यकता जाणवत असेल. इथे तसे नाही; मुलांचे शिक्षण, पिकनिक्स, ट्रेक्स, सिनेमे बघणे, प्रेमात पडल्यावरचे खर्च वगरे सर्व चनसुद्धा आईवडिलांच्या पशावर यथास्थित चालू असते. कित्येक पालक लग्नानंतर मुलांना राहण्यासाठी स्वतंत्र घरही आधीच घेऊन ठेवतात. भलत्या वयात स्वतचे लग्न स्वत ठरविणे तेवढे पाश्चात्यांकडून घेणाऱ्या तरुण पिढीला लग्नाचा खर्च भारतीय रिवाजाप्रमाणे पालकांनी करण्यातही काही वावगे वाटत नाही.
 शहरी, मध्यम-उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात असलेल्या, लाडात वाढलेल्या एक किंवा दोन मुलांना, ती अगदी कायद्याच्या दृष्टीने सज्ञान झालेली असली तरीही; जगण्याच्या व्यवहाराची, जगताना काय तडजोडी कराव्या लागतात याची फारशी कल्पना नसते. घरात पसा कुठून येतो, कसा येतो, किती येतो, आपल्या सध्याच्या राहणीमानाला दर महिना किती आवक आवश्यक आहे याची त्यांना काहीही माहिती नसते. प्रापंचिक जबाबदाऱ्यांशी त्यांची तोंडओळखही नसते; आणि अशी ही मुले ‘अडाणी’ वयात स्वतचा जोडीदार स्वत ठरवतात; अशा वयात, जेव्हा त्यांनी स्वतसाठी कधी हातरुमालसुद्धा खरेदी केलेला नसतो. व्यवहाराशी फारकत घेऊन ठरवलेला विवाह टिकण्याची शक्यता कमी असते. जेव्हा कल्पना आणि वास्तव यातला फरक लक्षात येतो तेव्हा फार उशीर झालेला असतो.
पालक जेव्हा व्यावहारिक कारणांमुळे प्रेमविवाहाला विरोध करतात, तेव्हा ‘तुम्ही फक्त पसा तेवढा बघता, प्रेमाला तुमच्या लेखी काहीच किंमत नाही’ म्हणून पालकांची संभावना करणाऱ्या मुलींना लग्नानंतर व्यवहाराचे चटके बसायला लागल्यावर त्याच पालकांकडून सर्व प्रकारची मदत घेण्यात मुळीच कमीपणा वाटत नाही. शिवाय फक्त तरुणतरुणींमध्ये असते तीच प्रेमभावना तेवढी महत्त्वाची. बाकीच्या नातेसंबंधातल्या प्रेमभावनेला यांच्या लेखी फारसं महत्त्व नसतं.
 नीलम (आणखी एक त्रस्त मैत्रीण) सांगत होती, ‘मुलीच्या लग्नाला आम्ही विरोध करत होतो, त्या काळात आमच्या घरातल्या तणावाच्या वातावरणामुळे माझा रक्तदाब वाढला. त्यामुळे मी घरातली कामे कशीबशी, उठतबसत, मधेच आडवी  पडून करत असे, पण मुलीने कधीही एकाही कामाला हातभार लावला नाही. ती निर्वकिार, अलिप्त असे. आई ‘नाटकं’ करत्येय असेच तिला वाटे.’ माझी आणखी एक मत्रीण गीता हिची मुलगी तिच्याबरोबर शिकणाऱ्या परप्रांतीय मुलाच्या प्रेमात पडली. त्याचं प्रेमप्रकरण वर्षभराचं. वर्षांनंतर मुलगा त्याच्या गावी परत गेला. भिन्न संस्कृतीत वाढलेल्या व लहानपणीच आईवडिलांच्या छत्राला पारखे झालेल्या या मुलाशी लग्न करण्यास मुलीच्या पालकांनी प्रखर विरोध केल्यावरही प्रचंड भौगोलिक अंतर पार करूनही हे प्रेमप्रकरण सुरूच राहिले. तीन वर्षांच्या विरोधानंतर आपल्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्याची जबर किंमत दिल्यावर शेवटी पालक नमले. एवढय़ा दूर राहणाऱ्या  मुलाची माहिती कशी काढायची हा प्रश्न पडला. (अशी काही माहिती काढण्याची गरज असते हे या मुलींच्या गावीही नसते. ‘मला तोच जोडीदार हवा’ म्हणून बोट दाखवले की त्यांचे काम झाले. पुढचे सगळे पालकांनी बघून घ्यावे!) तेव्हा मत्रिणीने चक्क एका डिटेक्टिव्ह एजन्सीची मदत घेतली. मुलीच्या सुदैवाने त्यांनी मुलाच्या चांगुलपणाचा दाखला दिल्यावर मुलीचे लग्न करून दिले.  मुलाचे चारित्र्य चांगले असूनही दुर्दैवाने मुलाला काही मानसिक विकृती (behavioural disorder)असल्याचे लग्नानंतर आढळले. त्याला आईवडील असते तर कदाचित ही विकृती त्याच्यात आली नसती किंवा ती वेळीच लक्षात येऊन तिच्यावर उपचार झाले असते. आता हा दोष ४ वर्षांच्या प्रियराधनाच्या काळात मुलीच्या लक्षात आला नाही; तो डिटेक्टिव्ह एजन्सीला तरी कसा कळावा? या विकृतीमुळे दोघांची सतत भांडणे होऊ लागली. एक मूल झाल्यावर मुलीच्या हालाला पारावार उरला नाही. तेव्हा गीता व तिचा नवरा मुंबईतले घर बंद करून मुलीला आधार देण्यासाठी ती राहत असलेल्या गावी तिच्या घराजवळ भाडय़ाचे घर घेऊन राहू लागले.
माझी दुसरी मत्रीण- चित्रा, तिच्या मुलीने असेच पालकांच्या विरोधाला न जुमानता एका सांस्कृतिक, आíथक, भाषिक फरक असलेल्या मुलाशी तब्बल ७ वष्रे प्रेमप्रकरण सुरू ठेवले. शेवटी पालकांनी लग्न करून दिले आणि अक्षरश दुसऱ्या महिन्यानंतर त्यांचे पटेनासे झाले. एक मूल झाल्यावर मुलगी नवऱ्यापासून वेगळी झाली. तिची स्वतच्या पायावर उभे राहण्याची धडपड सुरू झाली. त्यामुळे तिचे व मुलाचे होणारे हाल न बघवल्यामुळे मत्रीण परप्रांतातील मुलीच्या नोकरीच्या गावी मुलीजवळ राहायला गेली तर तिचा नवरा अजून व्यवसायात असल्याने एकटा मुंबईत राहातोय. चित्रा सांगत होती, ‘आधी मुलगी प्रेमात बुडाली होती आणि आम्ही विरोध करत होतो म्हणून ती आमचा रागराग करीत होती; आता ती तिच्या आयुष्यातल्या विवंचनेत गळ्यापर्यंत बुडाली आहे, म्हणून आपल्या घोडचुकीमुळे उतारवयात आपल्या आईवडिलांना एकमेकांपसून दूर राहावे लागतेय, याची खंत वाटण्याएवढीही तिला उसंत नाहीये. एकूण आमच्याशी असलेली तिची भावनिक नाळ पूर्णपणे तुटली आहे. तरी आम्हाला तिच्याबाबतीतले कर्तव्य केल्याशिवाय राहावत नाही.’  
माझ्या मुलीची मत्रीण- मीनलचे तिच्या ऑफिसातल्या सहकाऱ्यावर एकतर्फी प्रेम होते. एक दिवस त्याने त्याचे लग्न ठरल्याचे पेढे वाटले. ही बातमी कळल्यावर मीनल ऑफिसातच ओक्साबोक्शी रडू लागली. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे हे तुला कळले कसे नाही? आता मी माझ्या आयुष्याचं काय करू? आता मला जीव देण्याखेरीज पर्याय नाही’ म्हणून तिने रडारड करून ऑफिसमध्ये तमाशा केला. नंतरचा एक आठवडा ती आयुष्यातला रस गेल्यासारखी केविलवाणा चेहरा करून वावरत राहिली. शेवटी त्या सहकाऱ्याचे मन विरघळले. त्याने ठरलेले लग्न मोडून मीनलशी लग्न केले आणि १५ दिवसांतच मीनल सासू छळ करते आणि नवरा पुरुषच नाही हे आरोप करीत माहेरी परतली ती कायमचीच. त्याच्याशिवाय लग्न झालं नसतं तर जीव देण्याखेरीज पर्याय नाही म्हणणारी ही मुलगी गेली पाच वष्रे त्यांच्याशिवाय मजेत जगत्येय!
माझ्या एका अगदी सख्ख्या मत्रिणीच्या, लालनच्या घरी मी एकदा गेले असताना तिच्या लेकीचा नुकताच पंचविसावा वाढदिवस झाल्याचे कळले. म्हणून मी सहज विचारले की काय मग तिच्या लग्नाचं बघताय की नाही आता; की तिने स्वतच कुठे जमवलंय? यावर कावरीबावरी होत आतल्या खोलीचा कानोसा घेत मत्रीण म्हणाली, ‘ती आत असताना बोललीस म्हणून बरं झालं. बाई गं, तिला आम्हीसुद्धा तिच्या लग्नाबद्दल विचारलेलं चालत नाही, मग इतरांची काय कथा!’ मला आश्चर्यच वाटलं. माझ्यासारख्या तिला लहानपणी अगदी अंगाखांद्यावर खेळवलेल्या सुहृदांनी तर नाहीच, पण जन्मदात्या पालकांनी पण यांना लग्नाबद्दल विचारायचं नाही. ही कसली यांची ‘स्पेस’ची कल्पना? खरं तर मुलीची ‘आवड’ आणि घरातल्या मोठय़ा मंडळींनी त्यांच्या अनुभवाच्या सारातून मिळालेले व्यावहारिक शहाणपण वापरून केलेली ‘निवड’ यांची सांगड घालून वर शोधणे योग्य नाही का? शिवाय यांच्या लग्नाबद्दल यांना विचारायचेही नाही, इतकी सगळी माणसे यांना परकी कशासाठी?
  आमच्या एका परिचितांनी आपल्या मुलीच्या ‘अव्यवहारी’ प्रेमाला अनेक वष्रे विरोध केला. तिला समजावायला गेले की तिची रडारड, आरडाओरडा सुरू होई. ते सांगत होते; ‘एक दिवस अशीच वादावादी झाल्यावर एका अत्यंत निराश, दुख, उद्वेग, वैफल्य, असहायतेची भावना या सगळ्यांचा कडेलोट झाल्याक्षणी डोक्यात एक वीज कडाडली! मला वाटले, मी एवढा उच्चशिक्षित, सुसंस्कृत, शहरात वाढलेला, आतापर्यंत सगळी परिस्थिती समजूतदारपणे हाताळणारा तरीही एवढा हताश होतो;  मग बिचारी अडाणी, अशिक्षित, खेडूत माणसे काय करत असतील? त्यातून टोकाचं काही निष्पन्न होत असेल का?
  एकूण सरसकट प्रेमविवाह करणे चुकीचे असे मला म्हणायचे नाही. आज लग्नाच्या वयात असलेल्या मुलामुलींचे पालक जेव्हा ती तरुण होते तेव्हाच ती कदाचित प्रेमविवाह करेल याची खूणगाठ बांधत असतात. पण मुलगी म्हणून त्यांची काही अपेक्षा असतेच. ती अनेकदा पूर्ण होत नाही. काही मुली नक्कीच परिपक्वतेने निर्णय घेतातही. बहुतेक मुलींना आपल्या पालकांच्या जावयाबद्दलच्या अपेक्षा, आपण निवडलेला जोडीदार ते स्वीकारू शकतील की नाही याचे व एकूणच लग्नाच्या व्यावहारिक बाबींचे भान असतेही. कित्येक वेळेला तर मुलीने प्रेमविवाह करून शोधलेल्या जोडीदाराबद्दल ‘आम्ही शोधला असता तरी यापेक्षा काय जास्त बघितलं असतं?’ अशी पालकांची भावना असे; तर कित्येक सुजाण मुली एखाद्या मुलाने प्रपोज केल्यावर, ‘तू माझ्या पालकांना येऊन विचार; त्यांची हरकत नसल्यास माझा होकार आहे’ असे सांगतात.
    त्याच्या उलट ठरवून केलेल्या विवाहाच्या बाबतीतही सारे काही आलबेल आहे असे नाही. आमच्या शेजारच्या सुबोधचे लग्न मुलगी बघून ठरले. साखरपुडा झाल्यावर त्यांच्या घरी तिचे येणेजाणे सुरू झाले. आली की प्रत्येक वेळी ती मुलगी, ‘मी लग्नानंतर हे डायिनग टेबल भंगारात देणार आहे; किती जुनाट दिसतं हे! नवीन काचेचं घेऊ या!’, ‘ हा टीव्ही आता फेकून द्या; हल्ली एलसीडी टीव्ही आल्येत, ते किती एलिगंट दिसतात!’; ‘ही स्टीलची ताटं-वाटय़ा आता माळ्यावर टाकून द्या! मी आईला रुखवतात काचेचा डिनरसेट द्यायला सांगते; तो वापरू या.’ अशी मुक्ताफळे उधळायला लागली. ज्या मुलीला आधी आपण या घरात येऊन त्या घराला, तिथल्या माणसांना आपलेसे करावे; त्यांच्या पोटात आणि मनात शिरावे आणि मग वेळप्रसंग पाहून आपल्याला हवे ते बदल करून घ्यावेत एवढा संयम नाही, ती मुलगी उद्या तुझ्या आईवडिलांना पण वृद्धाश्रमात टाकून देऊ या म्हणेल, अशी भीती सुबोधच्या आईवडिलांना वाटायला लागली. त्यांनी सुबोधला लग्नानंतर वेगळे राहाण्याचा सल्ला दिला. पण त्याला नकार देऊन सुबोधने ते लग्नच मोडले.
आमच्या ओळखीच्या संध्याताईंच्या कुटुंबाची सांपत्तिक स्थिती उत्तम आहे. त्यांची होणारी सूनही तोडीस तोड घरातली. लग्न ठरल्यावर दागिन्यांच्या खरेदीसाठी गेल्यावर सुनेने काही लाखांचे हिऱ्यांचे पेण्डन्ट असलेले मंगळसूत्र पसंत केले. संध्याताई म्हणाल्या, ‘हल्ली तुम्ही मुली ड्रेस घालता; त्यावर मंगळसूत्र घालता येतच नाही. मग एवढे महागडे मंगळसूत्र कशाला घ्यायचे? उगाच डेड इन्व्हेस्ट्मेंट होईल.’ झाले, त्या मुलीने ज्वेलरच्या दुकानातच थमान घातले, अद्वातद्वा बोलली व एकटीच तरातरा निघून गेली. तिची आईही स्तब्ध होऊन बघतच राहिली. दोन दिवसांनी मुलगी माफी मागायला आली, पण संध्याताईंच्या कुटुंबीयांच्या मनातून ती उतरलीच. त्यांनी तिला नकार कळवला.
   साधारण १९८० पर्यंत मुलगे असणाऱ्यांना भाव होता. मुलगे लग्नानंतर आपल्याच घरात राहून परके होतात, सुनांशी पटवून घेणे कठीण जाते हे लक्षात आल्यावर पुढची दोन दशके मुलीवाल्यांचा भाव वधारला. इतका की ‘एक मुलगा व एक मुलगीवाली राणी;  दोन मुलीवाली महाराणी तर दोन मुलगेवाली नोकराणी’ असे म्हटले जाऊ लगले. कदाचित त्यावेळी मनासारखा जावई बघून दिल्यावर मुलींच्या बाबतीतली जबाबदारी संपल्यात जमा असे; म्हणून असे म्हटले जात असेल. आज मात्र मुली लग्नाआधी व नंतरही पालकांसमोर अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे या राणी, महाराणी आणि नोकराणीच्या संकल्पनांचा पुनर्वचिार करण्याची वेळ आली आहे. यात अतिशयोक्ती ती काही नाही.
हे सर्व लिहीत असताना नुकत्याच पेपरमध्ये वाचलेल्या काही बातम्यांनी लक्ष वेधून घेतले. जिच्यावर कायद्याच्या रक्षणाची जबाबदारी होती, त्या रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल वैशाली िपगटने खुशाल आपल्या विवाहित सहकाऱ्याच्या प्रेमात पडून बेकायदेशीर विवाह केला आणि तो निभावता न आल्यावर स्वतवर गोळ्या झाडून घेतल्या; भाईंदरच्या कोणी अनामिक षोडशेने पालकांनी तिचे प्रेम गंभीरपणे न घेता ‘अजून तू लहान आहेस; १८ वर्षांची झाल्यावर बघू’ असा योग्य, व्यावहारिक सल्ला दिल्यावर आततायीपणाने जीव देण्याचा प्रयत्न केला, तर अंधेरीच्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकवणाऱ्या २३ वर्षीय शिक्षिकेने १६ वर्षांच्या नववीत शिकणाऱ्या आपल्या विद्यार्थ्यांवर ‘प्रेम’ केले आणि त्याला ‘पळवून’ नेले.
आज आपल्या कार्य-कर्तृत्वाने गगनाला गवसणी घालणाऱ्या आणि सर्व क्षेत्रांत ठसा उमटविणाऱ्या मुलींच्या संख्येत जशी प्रचंड वाढ झाल्येय तशीच, शाळकरी वयात प्रेमात पडणाऱ्या, अव्यवहारीपणे, बेजबाबदारपणे प्रेमप्रकरणे करून त्या प्रेमाच्या पूर्तीसाठी पालकांना वेठीस धरून इमोशनली ब्लॅकमेल करणाऱ्या मुलींच्या संख्येतही प्रचंड वाढ झाली आहे.  मुलगे बायकोच्या नादाने विचारत नाहीत म्हणून मुलींचा उदो उदो झाला; आता मूल्यविरहित शिक्षणाचा रुबाब आणि मिळवत असलेल्या पशाचा तोरा मिरवणाऱ्या मुलींनीही पालकांचा भ्रमनिरास करायला सुरुवात केली आहे. बेजबाबदारपणे, आततायीपणे वागून मुली स्वतच्या आयुष्यातला संघर्ष तर विनाकारण वाढवून घेताहेत आणि पालकांचं जगणंही मुश्कील करतायत. त्यांना अगतिक, हतबल करतायत. अशा आई-बाबांनी करायचं तरी काय?

Mother Always Protect Her Child
आई आहे ना…! वेगात येणारी राईड पाहून चिमुकलीने काढला पळ अन् पाहा VIDEO चा जबरदस्त शेवट
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
maharashtra government defends ladki bahin yojana in bombay high court
महिला सशक्तीकरणासाठी ‘लाडकी बहीण’; राज्य शासनाचे उच्च न्यायालयात उत्तर; अतिरिक्त भार पडत नसल्याचे स्पष्टीकरण
PM Modi to dedicate 3 frontline naval combatants to nation
आत्मनिर्भरतेतील आव्हाने!
Man arrested for attempting to rob minor girl Mumbai news
मुंबईः अल्पवयीन मुलीवर हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न करणारा अटकेत
psychiatrist sexually abused nearly hundred women in Hudakeshwar area
नागपूर : खळबळजनक! मानसोपचार तज्ज्ञाकडून शंभरावर मुली-महिलांचे लैंगिक शोषण…
Viral Video Shows Father And Daughter love
‘काय ते छोटे छोटे घास, काय ते तोंड पुसणे…’ एकाच ताटात बाबांबरोबर जेवणारी लेक; पहिला घास लेकीला, तर दुसरा… VIDEO व्हायरल
Babasaheb Ambedkar Marathwada University ,
नामविस्तारानंतर आंबेडकरी चळवळीची वाढ खुंटलेली कशी?
Story img Loader