‘‘कुठल्याही सर्जनशील गोष्टींचा निर्मितीक्षण नेमकेपणाने सांगता येणं कठीण असतं. ‘जेजे’, ‘आराधना’, ‘परिचय’,‘ जब्बार पटेल युनिट’ ही माझी विद्यापीठं. मी मला घडताना इथे पाहिलं, तसं त्यांनीही पाहिलं. गंभीर चेहऱ्यानं किंवा ग्रंथालयात तासन्तास काढून नाही तर जेजेच्या लॉनवर, गरवारेचा पोर्च, रवींद्रचा कट्टा, पायऱ्या, खोल्या. दादरच्या रानडे रोडवरचा रात्रीचा कांचन, हेमंत, महेंद्र, अशोक, टी सुरेंद्र यांचा सिनेमा म्हणजे काय, अशा स्पष्ट आवाजात सुरू होऊन घरंगळत गेलेला उभा/बैठा परिसंवाद यातूनच हे सगळं आलंय माझ्यात.. मला ते माहितीय, हे इथून, हे इथून आणि हे तिथून आलंय.’’ सांगताहेत सुप्रसिद्ध लेखक, नाटककार, दिग्दर्शक संजय पवार…
माणसाच्या आयुष्यात ज्या क्रमाने चित्र आणि शब्द आले, त्याच क्रमाने ते माझ्या आयुष्यात आले! लहानपणापासूनच चित्रकला चांगली होती. म्हणजे, राजेश खन्नासारखा राजेश खन्ना काढणे, उत्तम ‘सीन’ काढणे वगैरे. खरं तर माझा मोठा भाऊ मोहन याची चित्रकला उत्तम होती. माझ्यापेक्षाही रांगोळी तर तो अशी काढतो की जमिनीवर छापील पान पडलंय असं वाटावं. तो लिहीत असेही चांगलं, पण यातलं त्याने काहीच केले नाही. मुलाने डॉक्टर व्हावं या इच्छेच्या दबावाखाली तो नंतर तेही झाला नाही. बीएस्सी, डीएमएलटी करून सरकारी नोकरीत लागून निवृत्तही झाला.
मी वाढलो तो भाग परळ भोईवाडा म्हणजे गिरणगाव. बहुजन श्रमिक आणि आता सर्वमान्य झालेल्या शब्दाप्रमाणे दलितांच्या वस्त्या. तिथली अनेक मुलं उत्तम लेखन, अभिनय, खेळ खेळत. त्यातली काही टक्केच पुढे गेली असतील. बाकीची परिस्थितीमुळे ती स्वप्नं मारून जगली. नरेपार्क, कामगार मैदान, भोईवाडा मैदान यांना शिवाजी पार्कचं ग्लॅमर आणि तिथल्या साध्याच ‘कोच’ना रमाकांत आचरेकरांसारखं नाव मिळालं नाही. एरव्ही या गिरणगावाने पन्नास गावस्कर, पन्नास तेंडुलकर आणि पन्नास सोलकर सहज दिले असते. असो. मागे वळून बघताना हा कॅनव्हास नजरेआड करता येत नाही.
चित्रकला चांगली असल्यामुळे मी आठवीत असल्यापासूनच जे. जे. स्कूल ऑफ आर्टला जायचं मनोमन ठरवलं होतं. मोठय़ा भावाने केलेली चूक न करता मी माझं ‘लक्ष्य’ ठरवलं होतं. शाळेत असतानाच मोठय़ा भावाचं वाचून मी निबंध लिहिला आणि तो वर्गात वाचला गेला. त्यानंतर मोठा भाऊच अभिनय करत असे.. चाळीच्या नाटकात.. तेही मी माझ्यात मुरवलं. एवढंच काय, सुंदर हस्ताक्षरही मी त्याच्याकडूनच घेतलं.. हे सगळं ठरवून काहीच झालं नाही, पण घरातल्या घरात ते मी असं आत्मसात करत गेलो. मोठय़ा भावापेक्षा माझा स्वत:चा असा वेगळा ठसा म्हणायचा, तर लहानपणापासून मला निरीक्षणाची सवय होती, विचार करायची सवय होती. विचार म्हणजे त्या अर्थाने विचार नाही; तर प्रश्न पडायचे. कामगार वस्ती, त्यामुळे नवऱ्यांनी बायका/मुलांना झोडपणे ही जगण्याची रीत होती. मला प्रश्न पडे एक माणूस नवरा/बाप झाला म्हणून (केवळ) त्याला हा रानटी अधिकार ?
शालेय वयात हुशार किंवा चुणचुणीत नसल्याने ‘आणखी एक’ एवढीच ओळख होती. चित्रकलेच्या तासाला होणारं कौतुक सोडता बाकी दखलपात्र व्यक्तिमत्त्व नव्हतं. त्यामुळे वक्तृत्व, नाटक, नाच यात कधीही बारावा/पंधरावा म्हणूनही निवड नाही झाली. मात्र जे सादर होत असे त्याची मनातल्या मनात मी समीक्षा करे! असंही वाटे, याच्यापेक्षा मी जास्त चांगलं केलं असतं, पण ते फक्त वाटे. त्यामुळे शालेय जीवनात चित्रं बरी काढणारा, अक्षर बरं असलेला आणि निबंध बरा लिहिणारा एवढीच ओळख मिळाली होती. सर ज.जी. उपयोजित कला महाविद्यालयात गेल्यावर मात्र मी ठरवून लिखाण, अभिनय या प्रांतांत बेधडक उडी घेतली, कारण इथे ‘पूर्वओळख’ काहीच नव्हती! पहिल्या वर्षांलाच एकांकिकेत अभिनय केला! त्या वेळी पुरुषोत्तम बेर्डे, नलेश पाटील, रघुवीर कुल हे फायनल इयरला होते. ‘टूरटूर’चं बीज इथलंच. मग शांताराम पवार, दामू केंकरे, रमाकांत देशपांडे यांच्यासारख्या प्राध्यापकांच्या संध्याकाळच्या वर्गात नाटय़वेड वाढत गेलं! नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये माझ्याच वर्गात. त्यानेही मी लिहिलेल्या ‘चाळ कमेटी’ एकांकिकेत अभिनय केला होता!
जेजेच्या माजी विद्यार्थ्यांत अमोल पालेकर, नाना पाटेकर, सतीश पुळेकर अशी बडी नावं. स्कूल ऑफ आर्टच्या कॅम्पसमध्ये ‘मौज’, ‘सत्यकथा’चे लेखक यायचे. संभाजी कदम, बाबूराव सडवेलकर, आडारकर, हणमंते असे दिग्गज लोक होते. त्यामुळे मी अनेकदा म्हणतो, मी जे जे वर्गापेक्षा जेजेची लॉन, पवार सरांची केबिन, कॅन्टीन इथे जास्त शिकलो!
शालेय जीवनात असेपर्यंत मी चक्क धार्मिक वगैरे होतो! घरात फुले-आंबेडकर होते तरी गणपती वज्र्य नव्हता. छोटी छोटी देवळे बांधणे हा छंद होता. आमच्या शेजारी एक गुजराती कुटुंब राहायचे, त्यातले कुटुंबप्रमुख माझ्या वडिलांना म्हणायचे, हा मुलगा मोठेपणी धर्मगुरू होईल! तर आमच्याकडे परळच्या बुद्ध विहारातले सिलोनी भिख्खू येत, ते वडिलांना म्हणत, तुमच्या चार मुलांपैकी हा मुलगा आम्हाला द्या! वडिलांना ‘बरं’ वाटे. त्यात वडिलांच्या आईच्या निधनानंतर मी झालो, त्यामुळे वडिलांना ‘आई’ जन्माला आली, असंही कुणी तरी सांगितलं होतं. त्याचा फायदा मारताना, ते इतर भावांपेक्षा मला कमी मारण्यात झाला!
आणखी एक गोष्ट. माझ्या मनावर काही तरी बनण्याची ईर्षां जागवून गेली ती म्हणजे विविध अंत्ययात्रा! आमच्या परिसरात केईएम, टाटा, वाडिया, टीबी हॉस्पिटल ही गिरणगावातली सरकारी, महापालिकेची इस्पितळं व पुढे शिवडी स्मशान. त्यामुळे शाळेचा रस्ता व अंत्ययात्रा यांचा रस्ता एकच. एखादी अंत्ययात्रा मोठी, तर एखादी चार खांदेकरी व एक मडकेधारी इतकेच! मला वाटायचं, असं इतकं नगण्य होऊन मरायचं? नाही. काही तरी केलं पाहिजे. कळत्या वयातली सगळ्यात पहिली मोठी अंत्ययात्रा पाहिली ती आचार्य अत्रेंची! भर पावसात वडिलांचा हात धरून ट्रकवरचं पाहिलेलं ते पहिलं अंत्यदर्शन. किती तरी वेळ ती चालू होती. म्हटलं जन्माला आलं तर एवढं तरी काम करायला हवं!
अर्थात जे.जे.मध्ये माझ्या व्यक्तिमत्त्वाला पैलू पडत गेले. ते सहकारी विद्यार्थी मित्रांनी लेखनाला प्रोत्साहन देऊन पाडले, तसेच प्रा. रंजन जोशींनी आयुष्य फोकस करायला शिकवलं. प्रा. अरुण काळेंनी लघु अनियतकालिके, दलित साहित्य अशी वेगळी साहित्य ओळख दिली. प्रा. मुकुंद गोखलेंनी कॅलिग्राफी आणि ते कसे कोवळ्या वयात घर सोडून बाहेर पडले हे सांगत व्यवस्थेविरुद्धच्या बंडाची ठिणगी पेरली. शांताराम पवारांनी तर न शिकवता खूप शिकवलं. खांबेकर नावाच्या सरांनी मला माझ्यात असलेल्या स्ट्रोक्सची आणि कॉपीरायटरची ओळख करून दिली.. खरं तर आज मी जो काही आहे त्याचा भक्कम पाया या सर्वानी घातला. नाटय़लेखनात माझे सुरुवातीचे आयकॉन पुरुषोत्तम बेर्डे, रघुवीर कुल हे होते. नाटय़लेखनाचं तंत्र या दोघांनी व ‘या मंडळी सादर करू या’ या संस्थेने शिकवलं.. पण माझ्या या कलावादी प्रवासाला सामाजिक, राजकीय जाणिवांचा स्पर्श दिला तो विश्वा यादव व दिलीप वारंग या मित्रांनी!
विश्वाने मला सर्वप्रथम माझ्या दलितत्वाची जाणीव करून दिली. आमच्या घरी माझे आई-वडील त्या ओळखीपासून दूर ठेवत असत. घरातलं वातावरण खूप ‘बौद्ध’ही नव्हतं की हिंदूही, पण तो गावकूस, ती भावकी, ते भाऊबंद यापासून ‘दूर’ होतो आम्ही.
विश्वाने महार असणे, पूर्वास्पृश्य बौद्ध होणे, डॉ. बाबासाहेबांचा विचार, दलित पँथर यांची ओळख करून दिली. मिलिंद पगारे माझा वर्गमित्र. त्याच्या वडिलांचा मोठा ग्रंथसंग्रह होता, बाबासाहेबांच्या लिखाणाचा. मराठी, इंग्रजी.. वाचा म्हणायचे.. मग पुढे वडील सांगू लागले- शाळेत बाहेर बसावं लागे वर्गाच्या. आई सांगे- पाण्याचं भांडं वेगळं असे. इथून मग सगळं बदलत गेलं.. सुर्वे, ढसाळ, दया पवार, चेंदवणकर, मेश्राम वाचनात आले. प्रदीप मुळ्येने नेमाडे, कोलटकर, चित्रे, गोपु, ‘सत्यकथा’ यांची ओळख दिली. सगळ्यात प्रमुख जाणीव दिलीप वारंगने दिली. आमचं कॉलेज सरकारी, त्यामुळे आणीबाणीच्या काळात आम्हाला वीस कलमी कार्यक्रमाची ‘जाहिरात’ असाइनमेंट म्हणून होत्या. त्याच वेळी वीस कलमी कार्यक्रमावर कविता स्पर्धाही होती. मी भाग घेतला. मला पहिलं बक्षीस मिळालं.. त्या दिवशी संध्याकाळी दिलीपने मला प्रेमाने सांगितलं, ‘तू यात भाग घ्यायला नको होतास! असाइनमेंट अभ्यासाचा भाग आहे, कविता नाही.’ मग त्याने आणीबाणीविषयी सांगितलं. तेव्हा मला फारसं कळत नव्हतं, तरी हा काही तरी वेगळं व महत्त्वाचं सांगतोय हे लक्षात आलं. हे सगळे ज्ञान, उपदेश, सल्ले माझ्यात नीट झिरपले.. आज लोक विचारतात, तुम्ही खूप वाचत असाल ना? तेव्हा मनात या सर्वानी ‘वाचायला’ शिकवलेलं आठवतं. पुस्तकाबाहेरचं!
कॉलेज संपल्यावर दोन/तीन वर्षांनी मी पुण्याला आलो. अरुण नार्वेकर, सतीश कामत या मित्रांसोबत ‘आमची पंधरावी कला’ या नावाने अॅड एजन्सी सुरू केली. काही कालावधीतच इलस्ट्रेशन, जाहिराती यामुळे नाव झालं. मग एकदा ग्रंथाली यात्रेच्या निमित्ताने नितीन ठाकूर नामक पत्रकारितेतल्या मित्रांशी ओळख झाली आणि आयुष्याला वेगळं वळण लागलं. त्याने पुण्यातल्या ‘आराधना’ नाटय़ संघात नेलं. तिथे आनंद मासूर, नचिकेत पवार, केदार जोशी, प्रमोद देशपांडे भेटले. दरम्यान, मी चित्रकार म्हणून विविध सामाजिक संघटनांसाठी पोस्टर वगैरे तयार करून देत होतो, त्यांच्या सभा- समारंभांना जात होतो, त्याबद्दल लिहीत होतो. स्फुट लेखन सुरू केलं होतं. हळूहळू ‘माणूस’, ‘मनोहर’ या साप्ताहिकांत सदर लेखनही सुरू केलं होतं.
पुण्यात चित्रकार- लेखक म्हणून ओळख होत होती. वर्तमानपत्रात, नियतकालिकात चित्रं काढण्याच्या निमित्ताने श्री. ग. मुणगेकर, सदा डुंबरे, अरुण खोरे, श्री. भा. महाबळ, विद्या बाळ, ह.मो. मराठे, चंद्रकांत घोरपडे, एकनाथ बागुल अशा पत्रकार/संपादकांचा सहवास लाभला. विचारांचं आदान-प्रदान झालं. त्यातूनही मुणगेकर, श्री. ग. मा., विद्या बाळ, सदा डुंबरे यांच्यासोबतचा संवाद पुढे काही विचार पक्के करायला कामी आला.. याच काळात बाबा आढाव, अनिल अवचट, ना. ग. गोरे, एसेम, निळू फुले, भाई वैद्य, भालचंद्र फडके, राम ताकवले, ग. प्र. प्रधान अशी स्वच्छ, निरलस माणसं पाहिली, अनुभवली. ‘प्रधान मास्तर आणि एसेम’ आठवल्यावर वाटतं, ‘खरंच अशी माणसं’ होती. विचाराने पक्कं होत जाण्यात या सर्वाचा वाटा आहे. अजित, वसुधा सरदारांमुळे गं.बा. सरदारांशी खूप गप्पा मारता आल्या. माझ्या लिखाणातला थेटपणा, जहालपणा, बोचकारे हे सगळं असंच ठेवा, असं अण्णांनी (गंबा) सांगितलं. ते म्हणाले, ‘‘तुम्हाला थोडं कमी धारधार, ‘राखून’, थोडं सौम्य लिहायला सांगतील, सल्ला देतील, पण तुम्ही तुमची शैली बदलू नका! हा समाज बथ्थड आहे! तुमच्यासारखे पन्नास फटकारेवाले पचवतील. तुम्ही जसे लिहिता, तसेच लिहा. नामदेव ढसाळ त्यासाठीच आवडतो मला,’’ असं ते म्हणत.
त्यानंतर मात्र मी अधिक निर्धास्त झालो. मला माझी भाषा सापडली. रंजनापेक्षा प्रबोधनाचे महत्त्व कळू लागले, चित्रांच्या निमित्ताने स्त्रिया, भटके यांचे आयुष्य कळू लागले. पुण्यातल्या सामाजिक संघटनांनी माझ्या लेखनाला विचारबळ आणि दिशा दिली. नारी समता मंचसाठी केलेल्या ‘मी मंजुश्री’ या पोस्टर प्रदर्शनाने महाराष्ट्रभर या केसच्या निमित्ताने जागृती करता आली. विलास वाघ, प्रदीप गोखले, तेज निवळीकर, पंडित विद्यासागर, उषा वाघ यांनी आंतरजातीय विवाहासाठी एक पुस्तिका, एक प्रदर्शन करून घेतलं. हे सगळं ‘डाटा’ स्वरूपात साचत होतं. ते मांडण्याचा प्रयत्न करत होतो. माहिती, विचार, दिशा सापडत होती, सापडत गेली आणि काय करायचं व काय नाही करायचं हे स्पष्ट झालं.
‘आराधना’त असताना पहिलं दोन अंकी नाटक ‘दोन अंकी नाटक’ या नावानेच लिहिलं. ते संवाद नाटय़ होतं. ‘सकाळ’चे सुरेश्चंद्र पाध्ये सोडले, तर कुणीच त्याची फारशी दखल घेतली नाही. काही प्रयोगांत ते संपलं. तरी मला ‘नाटक’ सापडलं होतं. ‘आराधना’मध्येच सुबोध पंडे भेटला, त्याच्यामुळे पुढे अभय गोडसे नि उपेंद्र लिमये भेटला आणि एकांकिकांचं सत्रं सुरू झालं. आली स्पर्धा, लिही एकांकिका, मिळव बक्षिसं! हे दोन/तीन र्वष चाललं आणि मग लिहिलं, ‘कोण म्हणतं टक्का दिला!’
मी, सुबोध, उपेन्द्र, अभय; आमच्या ‘परिचय’ संस्थेला दोन अंकी नाटक घेऊन राज्य नाटय़ स्पर्धेत उतरायचं होतं. ८९/९० चा काळ. देशात मंडल आयोग/ राम मंदिर हे दोन इश्यू गाजत होते. मंडल आयोगावर भाजपसारखा पक्ष महाराष्ट्रात एक भूमिका, तर दिल्लीत वेगळी भूमिका घेत होता. आरक्षणावर नेहमीच्या बाजू मांडल्या जात होत्या. मला ‘जात’ छळत होती. जातीचा छुपा वावर डसत होता. ‘जाता नाही जात’ या नावाने विचार करायला सुरुवात केली.. आणि मग ती प्रत्येक सवर्ण घरात एक दलित ठेवायचा हा अध्यादेश डोक्यात आला. सुर/असुर, देव/ दानव, ब्राह्मण/दलित अशा जोडय़ा लावता लावता कच, देवयानी, शुक्राचार्य सापडले.. भराभर लिहून झालं, पण नंतर सुबोधने दिग्दर्शन करताना दुसरा अंक पूर्ण रीराइट करून घेतला. आमच्या चौघांतलं हे अंडरस्टँडिंग खूप प्रबळ होतं. त्यामुळे वयातला फरक बाजूला ठेवून प्रसंगी ‘भ’च्या बाराखडीत विचारमंथन व्हायचे. नाटय़लेखक म्हणून घडवण्यात ‘आराधना’ व ‘परिचय’ या दोन संस्थांचा मोठा वाटा आहे.
असाच वाटा सिनेमा लेखनात जब्बार पटेल, कांचन नायक, हेमंत देवधर, टी. सुरेंद्र, महेंद्र तेरेदेसाई, अशोक राणे यांचा. जब्बार पटेलांनी सिनेमाव्यतिरिक्त लेखक म्हणून अधिक ठोस अभिव्यक्त व्हायला उत्तेजन दिलं, मदत केली, खूप गोष्टी सांगितल्या.. जेजे, आराधना, परिचय, जब्बार पटेल युनिट ही माझी विद्यापीठं. मी मला घडताना इथे पाहिलं, तसं त्यांनीही पाहिलं. गंभीर चेहऱ्यानं किंवा ग्रंथालयात तासन्तास काढून नाही तर जेजेच्या लॉनवर, आदमबाग, गरवारेचा पोर्च, रवींद्रचा कट्टा, पायऱ्या, खोल्या, कांचन नायकची रूम, दादरच्या रानडे रोडवरचा रात्रीचा कांचन, हेमंत, महेंद्र, अशोक, टी सुरेंद्र यांचा सिनेमा म्हणजे काय, अशा स्पष्ट आवाजात सुरू होऊन घरंगळत गेलेला उभा/बैठा परिसंवाद यातूनच हे सगळं आलंय माझ्यात. तेंडुलकरांचा एक संग्रह आहे, ‘हे सगळे येते कुठून?’ मला ते माहितीय. हे इथून, हे इथून आणि हे तिथून आलंय.
या शिकवणीतला सगळ्यात अलीकडचा समकालीन मास्तर म्हणजे निखिल वागळे! त्याच्या ‘अक्षर’साठी चित्रं काढता काढता ‘महानगर’ला लिहू लागलो. ‘महानगर’ आणि वागळे यांनी माझा आसूड मला हवा तसा वापरू दिला. सेनेच्या भरात ‘बाळ ठाकरे’ असं लिहिणारे आम्ही दोघेच असू! निखिलने आणि महानगरने ९० च्या दशकात बडय़ा वृत्तसमूहासमोर छोटय़ा पत्राद्वारे लेखकांची/पत्रकारांची एक निर्भय पिढी निर्माण केली. मुलींना हे क्षेत्र मुक्त केलं. नाटक, चित्रपट या माध्यमांबाहेर थेटपणे विचार मांडण्याचं स्वातंत्र्य, पाठिंबा ‘महानगर’ने दिला..
त्यामुळे ‘कोण म्हणतं टक्का दिला’मधला कचऱ्या धिवार असो, ‘डोंबिवली फास्ट’मधला माधव असो, ‘गाईच्या शापाने’मधली कुमारी, ‘मुक्ता’मधला मिलिंद, की ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’मधला भोसले; या सगळ्यांना व्यक्तिमत्त्व, विचार देताना हा प्रवास उपयोगी पडला. अगदी अलीकडे आलेल्या माझ्या ‘ठष्ट’ या नाटकामधल्या मुली जे बोलतात, सांगतात, वागतात ते सगळं इथूनच जमवलंय आणि इथेच मांडलंय..
खरं तर कुठल्याही सर्जनशील गोष्टींचा निर्मितीक्षण नेमकेपणाने सांगता येणं कठीण असतं. जसं प्रणयाच्या उत्कटक्षणी जे स्खलन होतं, त्यातला नेमका तो वाकडा शुक्रजंतू कसा, कुठे संयोग पावतो नि जीव जन्माला घालतो ते एका काळात, वाक्यात पकडणं कठीण, तसंच हे. कळतं ते एवढंच, आपलंच आहे, आपल्यातच होतं. भवताल अनुकूल होत गेलं आणि निर्मिती झाली!
हे सर्व ‘इथूनच’ येते!
‘‘कुठल्याही सर्जनशील गोष्टींचा निर्मितीक्षण नेमकेपणाने सांगता येणं कठीण असतं. ‘जेजे’, ‘आराधना’, ‘परिचय’,‘ जब्बार पटेल युनिट’ ही माझी विद्यापीठं. मी मला घडताना इथे पाहिलं, तसं त्यांनीही पाहिलं.
आणखी वाचा
First published on: 31-08-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay pawar in chaturang maifal