योगी अरविंदांच्या मते, आपला विचारांचा गलबला थांबविणारं मौन ही एक ध्यानप्रक्रिया आहे. मन शांत.. अधिक शांत करीत नेणारा योग आहे. त्यातूनच आपली स्वत:ची नव्याने ओळख होऊ लागते. आपण खरोखर कोण आहोत याची जाणीव हळूहळू होऊ लागते.
प्रत्येक मनुष्यमात्राचं अंतिम उद्दिष्ट असतं आनंद आणि शांती. चिरस्थायी अशी शांती! सत्ता, पैसा, भौतिक सुखं हव्यास वाढवतात. परिणामी दु:ख वाढवतात. त्यांच्या प्राप्तीने मन शांत होत नाही. बेचैनी कमी होत नाही. हवीशी वाटणारी सारी भौतिक सुखे मिळूनही आपण शांत नाही, आनंदी नाही. हे कुणाला लवकर कळतं. कुणाला उशिरा कळतं. ते कळलं की सत्याच्या शोधासाठी साधकाची यात्रा सुरू होते. योगी अरविंद घोष यांनी ही वस्तुस्थिती समजावून देताना या वाटेवरचा पहिला टप्पा सांगितला आहे तो मौनाचा! मौन म्हणजे केवळ न बोलणं नव्हे. किंवा मौन म्हणजे ध्वनीच्या साहाय्याने बोलल्या जाणाऱ्या भाषेचा प्रतिबंध एवढाच अर्थ नव्हे. आपल्या आत स्वत:शी सतत संवाद चालू असतो. विचारांच्या लाटा थडकत असतात. सततच्या या विचारांनी मेंदूही शिजत असतो. पण विचार थांबत नाहीत. निरंतरपणे बुरे-भले, राग-द्वेषाचे, हषरेल्हासाचे, आपल्या जुन्या साठलेल्या अनुभवांमधून कसल्या कसल्या भावना निर्माण करणारे विचार चालू राहतात. हे विचार पूर्णपणे थांबवणं, आलेल्या विचाराचं बळजबरीने दमन न करता तटस्थ राहून त्यांना वाहून जाऊ देणं.. हळूहळू स्तब्ध होत मन विचाररहित करणं, अतंर्बाह्य नीरव होणं म्हणजे मौन. एरवी जपमाळ हातात घेऊन बसलं. डोळे मिटले तरी मनात नाना विचार-विकारांचं थैमान सुरू असेल, कोण लागट बोललं, त्याचा बदला कसा घेता येईल वगैरे योजना मनात सुरू असतील तर जपाच्या माध्यमातून का होईना, एकाग्रता कशी साधली जाणार?
योगी अरविंद घोष यांच्या मते, आपल्या आतील नवीन विश्वाचा शोध घेण्याच्या वाटेवर आपण निघतो तेव्हा जुनं विश्व, जुने विचार, अनुभव, मनावर ठोकून-ठाकून पक्क्या केलेल्या धारणा अशांसारखी आत साठलेली सारी गाठोडी, विचार-विकारांचा कचरा आपल्याला झटकून टाकायला हवा. हे करण्यासाठी मनाची पुरेशी तयारी हवी. आपल्याला नव्या जगाकडे जाणारी पाऊलवाट निवडायची आहे असा मनाचा पक्का निश्चय हवा. कधी कधी मनाची अशी तयारी होत आलीच असते. मग अचानक एका क्षणी एखाद्या विजेसारखा प्रभावी विचार चमकून जातो, की आता बस्स झालं. मनाशी कवटाळून धरलेलं हे चिंध्याचांध्यांचं गाठोडं फेकून द्यायला हवं. हे ओझं घेऊन नाही जगायचं यापुढे! मग मात्र आपण सहजपणे ते सगळं मागे सोडून देऊन पुढे निघतो. या वेळी मनाची अखंड चाललेली यंत्रसामग्री थांबते. हा क्षण महत्त्वाचा असतो.
आपल्याला कदाचित असं वाटेल की विचार करण्याची शक्ती फार मोठी आहे. खरं तर विचार पूर्णपणे थांबवून नि:स्तब्ध अवस्था साधण्याची शक्ती त्याहून मोठी आहे. मौन साधण्याची तुमची प्रक्रिया सुरू झाली की केवळ पाच मिनिटे जरी विचार, भावनांचा गलबला थांबवला, पंचेंद्रियांकडून सतत येणाऱ्या संदेशांबद्दल निर्विकार राहिलं, मनात त्यानुसार प्रतिक्रिया उमटल्या नाहीत, मनाच्या विशाल सरोवरात कसलेही तरंग उमटले नाहीत तरी तेवढय़ा पाच मिनिटांच्या अल्पावधीत मौनाची अफाट ताकद आपल्याला समजते. लक्षात येतं की आपल्या गोंधळ, गडबड, कोलाहल आणि क्षोभ यांनी मनात प्रवेश केला होता. अस्वस्थपणा, बेचैनी, अशांतता यांनी आपल्याला घेरलं होतं या वादळवाऱ्यांनी कितीही घेरलं तरी मनाची यंत्रणा आपली चाललीच आहे. विचार, भावना, ऊर्मी, प्रतिक्रिया, सारं काही स्वत:शी जोडलेलं! फक्त आपण स्वत:! सदा सर्वकाळ स्वत:शी सारं निगडित. जणू एखाद्या बलवान पक्षाने घूसखोरी करून एक असा पडदा निर्माण करून ठेवलाय की आपण फक्त स्वत:ला बघतो. स्वत:च्या संदर्भात सारं काही बघतो. स्वत:च्या अनुभवांशी ताडून घेऊन स्वत:ला हवे ते निष्कर्ष त्यातून काढतो. स्वत:लाच ऐकतो.. जे ऐकलं त्यातून स्वत:ला हवे ते सोयीस्कर अर्थ काढतो. फक्त स्वत:लाच जाणतो. सगळे इंद्रियजन्य विषय मनात तरंग उमटवत राहतात किंवा भूतकालीन आठवणी पालापाचोळा उडवीत राहतात. या ना त्या रूपाने या साऱ्याची वेगवेगळय़ा आकृतिबंधांच्या स्वरूपात जाणीव होत असल्याने आपल्याला नावीन्याचा आभास तेवढा होतो. आपण काय आहोत? मानसिक, वैचारिक, शारीरिक सवयींना काही विचार संकल्पना, धारणा, इच्छा, संबंध यांनी बांधून ठेवलेलं गाठोडं आहोत आपण! या साऱ्या गोळाबेरजेत थोडीशीच महत्त्वाची स्पंदने असतात. त्याच्यावर या गाठोडय़ातील ऐवजाची पुटे चढत राहतात. हे सारं तोडून टाकून पहिला मोकळा श्वास घेता येतो तो मौनामुळे.
हे बंध तोडणं खरोखर जिकिरीचं, त्रासदायक काम असतं. आपण जेव्हा जाणत्या वयात प्रवेश करतो तेव्हा ही काही थोडीच का होईनात पण महत्त्वाची स्पंदनं आपल्या आत स्थिरावली असतात. पण.. त्यांच्यावर घट्ट माती चिखलाचे थर चढत राहतात. त्यांचा घट्ट गिलावा अधिक घट्ट, अधिक सफाईदार अधिक गुळगुळीत होत जातो. हा गिलावा आपल्या गाभ्यातील त्या स्पंदनांची जाणीव, त्यांचं भान दडपून टाकतो. आपल्या सवयी, आचार विचार, बऱ्या-वाईटाचे नियम, विचारांची, जगण्याची पद्धत, नातेसंबंध, कपडेलत्ते, बोलणं-चालणं, प्रतिष्ठेच्या समजुती इतर मंडळींनी आपल्या आत रुजविलेल्या इच्छा-आकांक्षा, कर्तव्य-अधिकारविषयक सामाजिक संकेत या आणि अशा अनेक गोष्टींचा ऐवज असलेल्या संस्कृतीतून हे थर निर्माण होतात.
आपल्याला असं वाटू लागतं की, हे थर म्हणजेच आपण आहोत. तेच आपलं मूळ रूप आहे. पण खरं आत्मरूप या साऱ्या वेटोळ्यांच्या आत दडलेलं असतं. मोठय़ा बांधीव भिंतींच्या आत बंदिस्त झालेलं आपल्या मूळ रूपावर हे जे बांधकाम होतं ते काळय़ा काळोख्या तळघराचं असेल किंवा डौलाने उंच आभाळात जाणाऱ्या, प्रकाशात नहाणाऱ्या प्रासादाचं असेल. पोलादासारखं असेल किंवा मजबूत काचेसारखं असेल. पण त्या तुरुंगाच्या भिंतीच म्हणायला हव्यात.
योगी अरविंदांनी असं सांगितलं, समजावलं की या भिंती तोडून मोकळा श्वास घेण्यासाठी ध्यानाची मदत होते. आपला विचारांचा गलबला थांबविणारी मौन ही एक ध्यानप्रक्रिया आहे. मन शांत.. अधिक शांत करीत नेणारा योग आहे. वर चढलेल्या या भिंतीमुळे आपण एकारलेले होतो. एखादं विशिष्ट स्पंदनच कदाचित आतपर्यंत पोहोचू शकतं. एका विशिष्ट रंगाचं जग आपल्याला दिसतं. अगणित रंगांची अनेक स्पंदनं अनुभवण्यासाठी, अस्तित्वाचं सत्य स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी मोकळा श्वास घेण्यासाठी या भिंती तोडणं ही योगाची पहिली पायरी असते. आपलं मूळ स्वरूप काय? आपण कोण? या प्रश्नाच्या शोधात निघण्यासाठी आपण आता मोकळे होतो. आपली स्वत:ची नव्याने ओळख होऊ लागते. आपण खरोखर कोण आहोत याची जाणीव हळूहळू होऊ लागते. आपण समजतो तेवढे हे आत्मस्वरूप संकुचित नसून त्यापेक्षा किती तरी विशाल आहे याचं चमकदार विजेसारखं क्षणभर दिसून लुप्त होणारं दर्शन आपल्याला घडतं त्याचा परिणाम अत्यंत उत्साहवर्धक होतो.
विचारांचा गलबला, गोंगाट, कोलाहल थांबविण्यासाठी आपण शांत बसतो. सगळीकडून आदळणाऱ्या संवदेना त्यांच्यामुळे मनात उमटणाऱ्या प्रतिक्रिया, घेतले जाणारे निर्णय, त्यानुसार कृतीची प्रेरणा हे सारं थांबविण्यासाठी अंतर्यामी जागृत झालेल्या उत्कट इच्छेने डोळे मिटून स्वस्थ बसतो तेव्हा या मौनासाठी, ध्यानासाठी आपण पहिलं पाऊल उचललेलं असतं.
मौन
योगी अरविंदांच्या मते, आपला विचारांचा गलबला थांबविणारं मौन ही एक ध्यानप्रक्रिया आहे. मन शांत.. अधिक शांत करीत नेणारा योग आहे.
आणखी वाचा
First published on: 11-01-2014 at 07:31 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Silence