कॉलेजात शेक्सपिअरची नाटकं अभ्यासताना ‘ट्रॅजिक फ्लॉ’ हा शब्द पहिल्यांदा कानावरून गेला होता. शेक्सपिअरच्या कुठल्याही नायकाच्या अंगी असा एखादा मूलभूत गुणविशेष असतो जो त्याचा स्वत:चाच घात व्हायला कारणीभूत ठरतो. बाहेरून बघणाऱ्याला ते सहज दिसतं, पण त्याला दिसत नसतं की, त्याचा तोच स्वत:ला गोत्यात आणतो आहे. ..अनेक क्षणांना मीच माझ्या वाटेत येणं आयुष्यात क्षणोक्षणी घडत असतं..
माझ्या एका चित्रपटाचं चित्रीकरण चालू होतं. मी त्वेषानं माझ्या वडिलांना ताडताड बोलते, असा प्रसंग चित्रित व्हायचा होता. कॅमेरा, प्रकाश यांची तयारी चालू होती. तोवर मी माझे संवाद वाचून बघत होते. एरवीच्या माझ्या आयुष्यात मी फार कमी वेळ कुणाला रागाने ताडताड बोलू शकलेली आहे. काही झालं, कितीही राग आला तरी, शक्यतो संयम सोडायचा नाही अशी माझी धडपड असते. अर्थात, ‘मी जे स्वभावत: नाही’ असे अनेक प्रसंग मी एरवी अनेक चित्रपटांतून कितीतरी वेळा केलेत. खरं तर ‘मी जे नाही’ ‘ते’ व्हायला मिळतं म्हणूनच तर मला अभिनय आवडतो! पण त्या दिवशी काही तरी बिनसलं होतं. त्या दिवशी माझ्यातली कुणी ‘मी’, ‘काय गं, तू तर मुळात अशी नाहीस, मग जमेल का हा प्रसंग तुला?’ म्हणत माझ्या आणि त्या प्रसंगाच्यामध्ये उभी राहिली होती. कितीदा संवाद वाचले, पण त्या संवादांना माझ्यासाठी खरं बनवणारं माझ्या आतलं ‘काहीसं’ जे एरवी मला सहज सापडतं, ते आज सापडेचना. शॉटची तयारी पूर्ण होत आली तशी धडकीच भरायला लागली. मला त्या चित्रपटात ज्यांच्यावर चिडायचं होतं त्या माझ्या वडिलांची भूमिका उदय टिकेकर करत होते. ते माझं स्वत:शीच पुन्हा पुन्हा संवाद बोलणं दुरून पाहात होते. काहीसं जाणवून माझ्याकडे येऊन म्हणाले, ‘मला उद्देशून म्हणून बघतेस का संवाद..’ मी ‘हो’ म्हणून त्यांच्याकडे पाहून पहिलं वाक्य म्हटलं आणि एरवी एकपाठी असणारी मी पूर्ण ब्लँक झाले. काहीही आठवेना, डोकंच चालेना. उदयदादा अजिबात हसले वगैरे नाहीत. इतर कुणाला ऐकू येणार नाही, अशा हळू आवाजात मला म्हणाले, ‘एक सांगू का?’ मी म्हटलं, ‘प्लीज सांगा!’ ते म्हणाले, ‘प्रत्येक माणसाच्या आयुष्यात निदान एक तरी प्रसंग असा येतो जेव्हा तो स्वत:च्या स्वभावाच्या पूर्ण विपरीत वागून बसतो. नंतर त्या माणसाला वाटतं, असं कसं बोललो, किंवा वागलो मी! आता तू जो प्रसंग करणार आहेस ना, तो तू करत असलेल्या भूमिकेच्या आयुष्यातला तसाच प्रसंग आहे. या प्रसंगात तुझं पात्र तिनं चित्रपटभर दाखवलेला संयम सोडणारं आणि संतापणारं; म्हणजे कधीकधी इतका राग येतो बघ, की आपण समोरच्याला काय बोलतो आहोत याचं ताळतंत्रच सुटतं. श्वास फुलतो, शब्द फुटत नाहीत.. तसं झालंय या प्रसंगातील तुझ्या पात्राचं. ती लिहिलेली वाक्य आहेतच. ती तुझ्या मनात आहेत. त्यांना आता सोडून दे. या प्रसंगापुरता ‘अमृता’ म्हणून तुझ्यात जो संयम आहे, तो पण सोडून दे. रागाने आत जाऊ नकोस, बाहेर ये. काही प्रसंग संयमानं करायचे असतात, पण काही बाहेर येऊन खुल्यानं करायचे असतात. हा प्रसंग तसा आहे, म्हणून सांगतो, संयमित अमृताला बाजूला काढ!’ मी त्यांच्याकडे भारल्यासारखी पाहात राहिले. आतल्या कितीतरी गाठी सुटत होत्या. मला अचानक प्रतिमा बेदींच्या ‘टाईमपास’ नावाच्या आत्मचरित्रातलं एक वाक्य आठवलं, ‘आय वाँट टू गेट आऊट ऑफ माय ओन वे’ – ‘मला, मला स्वत:लाच माझ्या मार्गातून बाजूला काढायचं आहे!’ तेच तर उदयदादा मला करायला सांगत होते. बऱ्याचदा आयुष्यात आपल्याला वाटत असतं, आपण दुसऱ्या कुणाच्या कचाटय़ात सापडलो आहोत. पण प्रतिमाच्या म्हणण्यानुसार कित्येकदा आपण स्वत:च्याच कचाटय़ात सापडलेलो असतो. जशी मी सापडले होते. त्याचं काय?
कॉलेजात इंग्रजी वाङ्मय शिकत असताना शेक्सपिअरची काही नाटकं अभ्यासाला होती. ती शिकताना शेक्सपिअरच्या नायकांचे गुणदोष अभ्यासायचे होते. त्या वेळी ‘ट्रॅजिक फ्लॉ’ हा शब्द पहिल्यांदा कानावरून गेला होता. शेक्सपिअरच्या कुठल्याही नायकाच्या अंगी असा एखादा मूलभूत गुणविशेष असतो जो त्याचा स्वत:चाच घात व्हायला कारणीभूत ठरतो. पण त्याचं त्याला ते कळत नसतं. बाहेरून बघणाऱ्याला ते सहज दिसतं, पण त्याला दिसत नसतं, की त्याचा तोच स्वत:ला गोत्यात आणतो आहे. म्हणजे ऑथेल्लोचं संशयी असणं, त्याचा डेस्डीमोनावरचा अवास्तव संशयच एका अर्थी त्याच्या शोकांतिकेचं मूळ कारण ठरतं. या ‘संशयी ऑथेल्लो’ शिवायचा उर्वरित ऑथेल्लो ट्रॅजिक नसता ठरला. तर मग स्वत:च्या सुखान्त आयुष्यासाठी ऑथेल्लोने हा ‘संशयी ऑथेल्लो’ स्वत:च्याच मार्गातून बाजूला काढला असता तर..
माझ्यापुरतं बोलायचं झालं तर कुठल्याशा गाण्याची अगदी पूर्ण, जय्यत तयारी झालेली असताना अचानक ‘बेसूर होईल का’ असं वाटणं, कुठल्याशा नृत्यासाठी रंगमंचाकडे जात असताना त्या तमूक स्टेपला घसरून पडले तर असं वाटणं, कुठल्याशा निवेदनासाठी रंगमंचावर पाऊल ठेवतानाच ‘आज बोलताना फाफलले तर’ असं वाटणं आणि त्या दिवशीसारखं कुठलासा प्रसंग चित्रित करायच्या मोक्याच्या क्षणी ‘जमेल तुला?’ असं वाटणं, हे सगळे ट्रॅजिक फ्लॉच नव्हेत काय? त्या दिवशी उदयदादांनी मलाच माझ्या वाटेतून अक्षरश: ओढून बाजूला काढलं आणि त्या प्रसंगापुरती माझ्या आयुष्याची शोकांतिका होता होता वाचवली!
या आणि अशा अनेक क्षणांना मीच माझ्या वाटेत येणं आयुष्यात क्षणोक्षणी घडत असताना उदयदादांसारख्या कुण्या अनुभवी माणसानं ते दुरून पाहात असणं आणि माझी ती बुडतानाची धडपड त्यांची मानून मला शांतपणे, कुणालाही न दाखवता हळूच वाचवणं.. यात किती किती मोठा दिलासा आहे. उदयदादांसारखी माणसं तो दिलासा देऊन आसपासच्यांना निर्भय बनवतात. मग आसपासच्यांना कसलीच भीती वाटत नाही, आपल्यालाच वाटेत आलेल्या स्वत:ची सुद्धा!
शेक्सपिअरचे नायक असोत, नाहीतर माझ्यासारखी सामान्य माणूस, ट्रॅजिक फ्लॉज कुणात नाहीत? सगळ्यांच्यात आहेत. उदयदादांनी ज्या प्रेमानं मला माझ्या ‘ट्रॅजिक फ्लॉ’च्या पार जाण्यासाठी हात दिला तसाच हात पुढल्या आयुष्यातल्या अशा ‘अडेल’ क्षणांना माझा मला द्यायचा आहे, कारण मी जर तसं करू शकले तर माणूस म्हणून माझ्यात ‘फ्लॉज’ नक्कीच असतील पण ते शेक्सपिअरच्या नायकासारखे ‘ट्रॅजिक’ उरणार नाहीत!
amr.subhash@gmail.com
ट्रॅजिक फ्लॉ
कॉलेजात शेक्सपिअरची नाटकं अभ्यासताना ‘ट्रॅजिक फ्लॉ’ हा शब्द पहिल्यांदा कानावरून गेला होता.
First published on: 27-07-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व एक उलट...एक सुलट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tragic flow