पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द झाल्याने एक हजाराची नोट इतिहासजमा झाल्याची चर्चा रंगली होती. पण एक हजाराची नोट पुन्हा एकदा बाजारपेठेत दाखल होणार आहे. आगामी काही महिन्यांमध्ये नवीन रुपात आणि नवीन रंगात एक हजाराची नोट पुन्हा एकदा चलनात येतील अशी माहिती केंद्रीय अर्थसचिव शशिकांत दास यांनी दिली आहे.

केंद्र सरकारने काळा पैशावर निर्बंध घालण्याच्या दृष्टीने बुधवारी मध्यरात्रीपासून पाचशे आणि एक हजाराची नोट रद्द करण्याची घोषणा केली होती. या नोटांऐवजी पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा चलनात येतील असे केंद्र सरकारने म्हटले होते. त्यामुळे एक हजार रुपयांची नोट इतिहास जमा झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र गुरुवारी केंद्रीय अर्थसचिव शशिकांत दास यांनी पत्रकार परिषदेत एक हजाराचीही नोट पुन्हा बाजारात येतील असे सांगितले. आगामी काही महिन्यांमध्ये एक हजाराची नोट पुन्हा एकदा चलनात आणली जाईल. नवीन रंग,नवीन डिझाईन आणि नवीन क्रमांकासह या नोटा बाजारात उपलब्ध होतील असे त्यांनी स्पष्ट केले. रिझर्व बँकेतील दोन ते तीन अधिकारी नवीन नोटांची डिझाईन करण्याची तयारी करत आहेत असे ते म्हणालेत. १००, ५० आणि अन्य नोटा अद्याप रद्द झालेल्या नाहीत असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे. यापत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलीही उपस्थित होते.

सुरुवातीच्या काही दिवसांत देशभरातील बाजारपेठांमधील व्यवहार मंदावतील. पण दुरगामी दृष्टीकोनातून हा निर्णय योग्य ठरेल असा विश्वास अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने रिझर्व बँक आणि अन्य बँकाही सज्ज आहेत. बँकांमधील कामाचा वेळ वाढवण्यात आला आहे. याशिवाय शनिवार आणि रविवारीही बँका सुरु राहतील असा पुनरुच्चारही त्यांनी केला. बेकायदेशीर मार्गाने पैसे कमावणा-या मंडळींना दंडात्मक कारवाईचा सामना करावाच लागेल असा इशाराही जेटली यांनी दिला आहे.

Story img Loader