पोलीस आणि सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी काही वेळातच या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी केली. सुरक्षा दलांचे जवान, तसेच पंजाब व जम्मू-काश्मीर पोलिसांचे ‘स्पेशल वेपन्स अॅण्ड टॅक्टिस्स टीम’ चे (स्व्ॉट) कमांडो दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठीच्या मोहिमेत सहभागी झाले होते. त्यांना मदत करण्यासाठी लष्कराचे कमांडोही पाठवण्यात आले. दहशतवाद्यांना पोलीस ठाण्याशेजारील एका रिकाम्या इमारतीत जाण्यास भाग पाडून जवानांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. लष्कराचे दोन हेलिकॉप्टर्सही मोहिमेत सहभागी झाले.
सुमारे १२ तास चाललेल्या घनघोर धुमश्चक्रीनंतर तिन्ही दहशतवादी मारले गेले असून ही मोहीम संपली असल्याचे पंजाब पोलिसांच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. दहशतवादी लपलेल्या इमारतीतून शस्त्रे आणि ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) हस्तगत करण्यात आले.
दहशतवाद्यांजवळ अत्याधुनिक शस्त्रे होती. आम्ही त्यांच्याकडून ‘मेड इन चायना’ ग्रेनेड्स जप्त केले आहेत. या तिघांनीही लष्करी पोशाख घातले होते, असे पंजाबचे पोलीस महासंचालक सुमेध सिंग सैनी यांनी पत्रकारांना सांगितले.
दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेले पोलीस अधीक्षक बलजीत सिंग हे इस्पितळात आणण्यापूर्वीच मरण पावले होते, असे गुरुदासपूरच्या सामान्य रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. ठार झालेल्या आणखी तिघांची ओळख पटली असून त्यांची नावे गुलाम रसूल, आशाराणी व अमरजित सिंग अशी आहेत.
दहशतवादी सैनिकांच्या गणवेषात होते आणि त्यांच्याजवळ शस्त्रांचा बराच मोठा साठा होता, असे त्यांनी ज्याच्यावर गोळीबार करून त्याची मोटार हिसकावून नेली, त्या कमलजित सिंग मथारू या स्थानिक रहिवाशाने सांगितले. गोळ्यांमुळे जखमी झालेल्या मथारू याला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
गोळीबारात जखमी झालेल्या ज्या लोकांना आधी गुरुदासपूरच्या सामान्य रुग्णालयात आणण्यात आले होते, त्यांच्यापैकी प्रकृती गंभीर असलेल्या सात जणांना नंतर उपचारासाठी अमृतसरला हलवण्यात आले. हे लोक १५ ते ५५ वर्षे वयोगटातील आहेत.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबाबत पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्याशी चर्चा केली. संसदेत खासदारांनी सरकारला या घटनेबद्दल माहिती विचारली असता, या मुद्दय़ावर आपण उद्या, मंगळवारी संसदेत निवेदन करू, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
हे दहशतवादी जेथून शिरल्याचा संशय आहे, त्या पंजाब व जम्मूवरील आंतरराष्ट्रीय सीमेवर अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले. स्वातंत्र्य दिनाच्या तीन आठवडय़ांपूर्वी झालेल्या या दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर सुरक्षा दलांनी पंजाब व लगतच्या राज्यांमध्ये आणि चंदीगड या केंद्रशासित प्रदेशात, तसेच देशभर सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे.
या घटनेच्या पाश्र्वभूमीवर सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सीमेवर गस्त वाढवली आहे. आम्ही सज्ज असून, पाकिस्तानलगतच्या संपूर्ण आंतरराष्ट्रीय सीमेवर गस्तीत वाढ करण्यात आली असल्याचे बीएसएफचे पंजाब फ्रंटियरचे पोलीस महानिरीक्षक अनिल पालीवाल यांनी सांगितले.
या हल्ल्याने सर्वत्र खळबळ माजली असतानाच, अमृतसर- पठाणकोट रेल्वेमार्गावर पाच जिवंत बॉम्ब आढळून आले. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक तूर्त स्थगित करण्यात आली आहे.
ही घटना घडल्यामुळे दीनानगरमधील शाळा, महाविद्यालये तसेच इतर संस्था सोमवारी बंद ठेवण्यात आल्या. या हल्ल्यामुळे भयभीत झालेले शहरातील बहुतांश लोक घराबाहेर पडलेच नाहीत.
गावातील लोकांना या घटनेबाबत माहिती मिळाल्यानंतर जबरदस्त धक्का बसला, तसेच ते भयग्रस्त झाले, असे दीनानगर पोलीस ठाण्यापासून जेमतेम ५०० मीटर अंतरावर घर असलेल्या जतिंदर कुमार याने सांगितले. सुरक्षा दलाचे जवान आणि संशयित दहशतवादी यांच्यात पोलीस ठाण्यात सुरू असलेल्या गोळीबाराचे आवाज आम्हाला स्पष्टपणे ऐकू येत होते, असे राज्य आरोग्य विभागाचा कर्मचारी जतिंदर म्हणाला.
राजकीय पक्षांकडून हल्ल्याचा निषेध
दहशतवाद ही राज्याची समस्या नसून संपूर्ण देशाची समस्या आहे, असे सांगून पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल या हल्ल्याचा तीव्र निषेध केला, तसेच आंतरराष्ट्रीय सीमा सील करण्याची मागणी केली.
या ‘असुरक्षित’ क्षेत्रात पाकिस्तानच्या सीमेपलीकडून घुसखोरी आणि खोडसाळपणाच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत, असे पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंग म्हणाले.
सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी या भ्याड’ दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाई करून त्यांना जशास तसे उत्तर द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी केली. ही घटना ‘धक्कादायक’ असून, दहशतवाद्यांनी सीमा पार करण्यात यश मिळवले असेल तर सुरक्षा व्यवस्थेत ढिलाई झाली काय आणि गुप्तचर संस्था अपयशी ठरल्यात काय, यासारखे प्रश्न उद्भवतात असे ते म्हणाले.
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही या हल्ल्याचा निषेध केला. जम्मू-काश्मीरलगत नवी आघाडी उघडण्याचा प्रयत्न होत असून, त्याला तोंड देण्यासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी विशेषत: गुप्त माहितीच्या देवाणघेवाणीच्या क्षेत्रात समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या हल्ल्यानंतर राज्यात कायदा व सुव्यवस्था स्थिती राखण्यासाठी आणि राज्यातील लोकांची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी सर्व उपाय केले जातील, असे सांगून पंजाबचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री सुखबीर सिंग बादल यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. राज्यातील लोकांनी शांतता आणि सद्भाव कायम राखण्याचे आवाहनही त्यांनी केले.
ही घटना केंद्र व राज्य या दोन्ही सरकारांसाठी धोक्याची घंटी असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रतापसिंग बाजवा यांनी केला. दहशतवादाचा इतिहास असलेल्या राज्यात घडलेली आजची घटना अतिशय गंभीर आहे. पंजाबला पुन्हा एकदा दहशतवादाचा धोका निर्माण झाला असल्याचा दावा त्यांनी केला.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळला
गुरुदासपूर जिल्ह्य़ातील दीनानगर येथे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी शिवसेनेच्या हजारो कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळला.
पक्षाचे राज्य उपाध्यक्ष इंदरजित करवाल यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानदरम्यान चालविण्यात येणाऱ्या सदा-ए-सरहद या बसचा मार्ग अधिकाऱ्यांना बदलावा लागला. दिल्लीहून लाहोरला जाणारी बस राष्ट्रीय महामार्ग एकवरून नेहमीप्रमाणे रवाना झाली. मात्र त्यानंतर लाहोरहून दिल्लीकडे येणाऱ्या बसचा मार्ग बदलावा लागला.
निदर्शक मोठय़ा प्रमाणावर प्रथम हनुमानगढी मंदिराजवळ जमले आणि तेथून ते राष्ट्रीय महामार्गाकडे गेले. तेथे त्यांनी पाकिस्तान आणि दहशतवाद्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या आणि त्यानंतर पाकिस्तानचा झेंडा जाळला.
..तर केंद्राने सीमा बंद का केली नाही – बादल
चंडीगड: दिनानगर शहरात करण्यात आलेल्या अतिरेकी हल्ल्याचा मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी निषेध केला असून दहशतवाद हा राष्ट्रीय प्रश्न असून तो राष्ट्रीय धोरणांनीच हाताळला गेला पाहिजे असे सांगून केंद्र सरकारवर खापर फोडले आहे.बादल म्हणाले की, दहशतवाद हा राष्ट्रीय प्रश्न आहे, राज्याचा नाही त्यामुळे तो राष्ट्रीय धोरणांनी हाताळायला पाहिजे. चार सशस्त्र अतिरेक्यांनी लष्कराच्या गणवेशात येऊन बस स्थानक व पोलीस स्टेशनवर हल्ला केला त्यात पोलीस अधीक्षकांसह ११ जण ठार तर अनेकजण जखमी झाले त्या प्रकरणावर बादल बोलत होते.या हल्ल्याचा ठपका केंद्रावर ठेवताना त्यांनी सांगितले की, पंजाबमध्ये अतिरेकी हल्ला होणार आहे हे जर केंद्र सरकारला माहिती होते तर त्यांनी सीमा बंद का केली नाही. अतिरेकी पंजाबमधून आले नाहीत तर सीमेपलीकडून आले, त्यामुळे सीमा बंद करणे हे केंद्र सरकारचे काम आहे, राज्याचे नाही.ते म्हणाले की, आपली प्रकृती बरी नाही तरी आपण या घटनेची माहिती कळताच पोलीस महासंचालक एस. एस. सैनी यांना घटनास्थळी जाऊन मोहिमेचे समन्वयन करण्यास सांगितले. राज्यात धोक्याचा इशारा देण्यात आला असून आपण अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. राज्याचे मुख्य सचिव, गृह सचिव व गुप्तचर विभागाचे अधिकारी यांच्याबरोबर बैठका घेत आहोत. बादल यांनी नंतर गुरू नानक रुग्णालयात भेट देऊन जखमींना दिलासा दिला. जखमींना सर्व उपचार मोफत दिले जावेत असे आदेशही त्यांनी दिले आहेत. केंद्र सरकारने दहशतवादावर धोरण जाहीर केले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच त्यांनी असे भ्याड हल्ले देशाला धोकादायक आहेत असे सांगितले.दरम्यान गुरुदासपूरचे भाजप खासदार विनोद खन्ना यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून हा हल्ला धक्कादायक व दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. यात जबाबदार असणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.
पंजाबमधील अतिरेकी हल्ले
पंजाबमध्ये २००१ ते २०१५ या काळात दहशतवादी हल्ल्याच्या काही घटना घडल्या आहेत. एकूण सात जणांना या प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली होती.
१ मार्च २००१- पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गुरुदासपूर जिल्ह्य़ात पोहोचणारा १३५ यार्डाचा बोगदा खणून नंतर पाकिस्तानी बाजूनेच तो बंद केला.
१ जानेवारी २००२- हिमाचल-पंजाब सीमेवर अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात लष्कराचे तीन जवान दमताल येथे मृत्युमुखी तर इतर पाच जण जखमी.
३१ जानेवारी २००२- होशियारपूर जिल्ह्य़ात पंजाब रस्ते वाहतूक मंडळाच्या बसमध्ये पत्राणा येथे स्फोट दोन ठार तर १२ जखमी
३१ मार्च २००२- लुधियानापासून जवळच दरोहा येथे फिरोझपूर-धनबाद एक्सप्रेस गाडीत बॉम्बस्फोट दोन ठार व २८ जखमी.
२८ एप्रिल २००६- जालंधर बस स्थानकात बसमध्ये बॉम्बस्फोट आठ जखमी.
१४ ऑक्टोबर २००७- लुधियाना येथे चित्रपटगृहात बॉम्बस्फोट दहा वर्षांच्या मुलासह सात ठार तर ४० जखमी.
२७ जुलै २०१५- दिनापूर येथे पाकिस्तानी अतिरेक्यांच्या हल्ल्यात ११ मृत्युमुखी. मृतांत तीन अतिरेकी
दिनानगरला गोळीबाराच्या आवाजातच पहाट उजाडली..
दिनानगर येथे सोमवारी सकाळी पहाट उजाडली तीच गोळीबाराच्या आवाजाने. लष्कराच्या वेशातील अतिरेक्यांनी बसस्थानक व पोलीस स्टेशन संकुलात पाच जणांना ठार केले होते व त्याआधी त्यांनी एक मोटारही पळवली होती. हल्ल्याची बातमी पसरताच दिनानगर पोलीस स्टेशनच्या आसपास राहणारे लोक दारे बंद करून दूरचित्रवाणीवर बातम्या पाहात होते व परिस्थितीची माहिती करून घेत होते. कमलजित सिंग माथरू यांनी सांगितले की, सशस्त्र अतिरेक्यांनी गोळीबार करून आपली मारूती ८०० मोटार हिसकावून घेतली, ते लष्कराच्या पोशाखात होते. आपण गोळीबारात जखमी झालो त्यानंतर रूग्णालयात दाखल करण्यात आले. पंजाबच्या आरोग्य खात्याचे कर्मचारी जतिंदर कुमार यांनी सांगितले की, सकाळी सव्वासहा वाजता मित्राचा दूरध्वनी आला व त्यामुळे आपल्याला ही घटना समजली व नंतर आपण घराच्या वरच्या मजल्यावर गेलो असता गोळीबाराचे आवाज येत होते. सुरूवातीला पोलीस व नंतर लष्करी अधिकारी घटनास्थळी आले, गोळीबारामुळे लोक घाबरलेले होते. कुमार यांचे घर दिनानगर पोलिस स्टेशनपासून ५०० मीटर अंतरावर आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, शाळा व महाविद्यालये व इतर संस्था बंद करण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या मते हल्लेखोर अतिरेक्यांनी प्रथम पंजाबचा नोंदणी क्रमांक असलेली मारूती मोटार पळवली, नंतर एका ढाब्यावर हल्ला केला. दिनानगर बाह्य़वळणावर एका दुकानदारास ठार केले; नंतर ते पहाटे पाच वाजता एका प्रवासी गाडीत घुसले व अंदाधुंद गोळीबार केला. नंतर आरोग्य केंद्राच्या इमारतीवर हल्ला केला. पोलीस स्टेशनमध्ये घुसण्यापूर्वी बॉम्बफेक केली.
राज्यातही अतिदक्षतेचा इशारा, पोलिसांच्या सुट्टय़ा रद्द
मुंबई : पंजाबमधील दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर राज्यातही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह, नागपूर पुणे, औरंगाबाद, ठाणे, नाशिक अशा मोठय़ा शहरांमधील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली असून संवेदनशील ठिकाणच्या बंदोबस्तात वाढ करण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत. त्याचप्रमाणे सुट्टीवर असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ कामावर रूजू होण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पोलिसांच्या सुट्टयाही रद्द करण्यात आल्याचे गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांनी सांगितले.
पंजाबमधील दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील सर्वच महत्वाच्या ठिकाणची विशेषत: रेल्वे स्थानक, मॉल्स, सिमेमागृह आदी ठिकाणची सुरक्षा व्यवस्था वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी साधू आले आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून सर्वत्र गस्त वाढविण्याच्याही सूचना गृह विभागाने दिल्या आहेत. दहशतवाद विरोधी पथक, तसेच सशस्त्र दलांनाही दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सुट्टीवरील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना कामावर बोलाविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनाही अत्यावश्यक बाब वगळता कामावर बोलाविण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही बक्षी यांनी सांगितले.