इजिप्तच्या गिझा शहरात दहशतवाद्यांशी झालेल्या संघर्षांत २० पोलीस अधिकाऱ्यांसह किमान ५५ पोलीस ठार, तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
गिझाच्या अल-वहात वाळवंटातील अल-बहरिया भागात अनेक दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती पोलीस दलाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तेथे पोहचून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला असता दहशतवाद्यांनी त्यांच्यावर केलेल्या गोळीबारात २० अधिकारी व सक्तीने भरती करण्यात आलेल्या ३४ जणांसह पोलीस ठार झाले, असे अंतर्गत मंत्रालयाने शुक्रवारी उशिरा जारी केलेल्या निवेदनात सांगितले. तथापि, दोन्ही बाजूंच्या मृतांचा नेमका आकडा त्यांनी दिला नाही.
या गोळीबारात १४ पोलीस अधिकारी ठार, तर आठ जण जखमी झाल्याचे पूर्वीच्या वृत्तात म्हटले होते. या हल्ल्यांची तीव्रता मोठी असल्याने मृतांची संख्या वाढू शकते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
इजिप्तचे माजी अध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांच्या राजवटीविरुद्ध व्यापक निदर्शने झाल्यानंतर २०१३ साली लष्कराने त्यांना पदच्युत केल्यानंतर प्रामुख्याने पोलीस व लष्कराला लक्ष्य करून दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. यात हजारो पोलीस व लष्करी जवान ठार झाले आहेत.