स्टेटस सिम्बॉल म्हणून बीफ खाणाऱ्या लोकांना फासावर लटकवलं पाहिजे, असं खळबळजनक वक्तव्य साध्वी सरस्वती यांनी केलं आहे. याबाबत मी केंद्र सरकारकडे विनंती करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी ‘लव्ह जिहाद’बाबतही मत मांडलं आहे. आपल्या महिलांचं ‘लव्ह जिहाद’पासून संरक्षण करण्यासाठी हिंदूंनी घरात शस्त्रांचा साठा करून ठेवावा, असंही साध्वी म्हणाल्या. हिंदू जनजागृती समितीतर्फे गोव्यात चार दिवसांच्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. या अधिवेशनाच्या उद्घाटनावेळी त्या बोलत होत्या.

हिंदू जनजागृती समितीतर्फे गोव्यातील फोंडामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या अधिवेशनापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप आणि विश्व हिंदू परिषदेच्या सदस्य दूरच राहिलेले दिसले. या संघटनांचे नेते या अधिवेशनाला उपस्थित राहिले नाहीत. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील साध्वी सरस्वती यांची अधिवेशनात विशेष उपस्थिती होती. आधी हिंदूंनाच हिंदू करायचे आहे. सध्या हे आपल्यासमोरील मोठे आव्हान आहे, असं त्या म्हणाल्या. बीफबंदीबाबतही त्यांनी आपले मत मांडले. ज्या व्यक्तींना गोमांस खाणं स्टेटस सिम्बॉल वाटतं, अशा व्यक्तींना सरकारनं फासावर लटकवलं पाहिजे. तशी विनंती मी सरकारकडे करेन, असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं. अशा व्यक्तींना खरं तर भरचौकात फाशी दिली पाहिजे. तेव्हा त्यांना गोमातेचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे, हे समजेल, असंही त्या म्हणाल्या.

लव्ह जिहादपासून हिंदूंनी आपल्या मुलींना वाचवायला हवं. महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी आपण आपल्या घरांमध्ये शस्त्रे ठेवायला हवीत. आपण घरात शस्त्रे ठेवली नाहीत, तर येणाऱ्या काळात आपला विनाश अटळ आहे, असंही त्या म्हणाल्या.

Story img Loader