बर्लिनमधील ख्रिसमस मार्केट हल्ल्यातील संशयित अनिस आमरीचा इटलीतील मिलानमधील चकमकीत खात्मा झाला आहे.  इटलीच्या गृहमंत्र्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  जर्मनीत हल्ला करणा-या ट्रकमध्ये आमरीच्या बोटांचे ठसे आढळले होते.

बर्लिनच्या एका लोकप्रिय बाजारपेठेत सोमवारी सायंकाळी एक ट्रक घुसल्यामुळे १२ लोक ठार, तर ४८ लोक जखमी झाले होते. आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे. जखमींपैकी १२ जणांवर अद्याप अतिशय गंभीर स्वरूपांच्या जखमांसाठी उपचार सुरू असून त्यापैकी काहीजण अत्यवस्थ आहेत. ट्युनिशियन अनिस आमरी हा या ट्रक हल्ल्यातील संशयित आहे. हल्ल्याच्या कित्येक महिने आधीच जर्मन अधिकाऱ्यांनी त्याला संभाव्य दहशतवादी हल्लेखोर मानले होते. यावर्षी सहा महिने त्याच्यावर गुप्तपणे पाळत ठेवली होती. आमरी याच्या अटकेचे आवाहन करणारी नोटीस जर्मन अधिकाऱ्यांनी इतर युरोपीय देशांनाही पाठवली होती. त्यानंतर संपूर्ण युरोपमध्ये आमरीचा शोध सुरु होता.

मिलानहमधील उपनगरात शुक्रवारी एक व्यक्ती संशयास्पद स्थितीत फिरत होता. पोलिसांनी त्याच्याकडे कागदपत्रांची विचारणा केली असता त्याने बंदूक काढून गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलीस तपासणीत हा व्यक्ती आमरी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आमरी हा फ्रान्समधून ट्रेनद्वारे इटलीतील मिहानमध्ये आल्याचे सांगितले जाते. मात्र इटली पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. आमरी हा फेब्रुवारी २०११ मध्येही कोणत्याही ओळखपत्राशिवाय इटलीत आला होता. अल्पवयीन असल्याचे सांगत त्याने इटलीत प्रवेश केला होता. एका शाळेवरील हल्ल्याप्रकरणी त्याने इटलीत चार वर्ष तुरुंगात काढली होती. २०१५ मध्ये त्याची सुटका झाली होती.