शनिवारी रात्री तुर्कस्तानातील फुटबॉल स्टेडियमबाहेर दोन बॉम्बस्फोट झाले आहेत. फुटबॉल सामना संपल्यानंतर स्टेडियमबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये २९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १६६ जण जखमी झाले आहेत. पोलिसांना लक्ष्य करण्यासाठी हे बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो आहे. या स्फोटांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये पोलिसांचे प्रमाण सर्वाधिक असल्याने हा अंदाज व्यक्त केला जातो आहे.

तुर्कस्तानातील बेसिकतास स्टेडियमबाहेर शनिवारी रात्री दोन बॉम्बस्फोट झाले. यातील एक स्फोट कारच्या माध्यमातून करण्यात आला, तर दुसरा स्फोट आत्मघाती प्रकारातील होता. या स्फोटामध्ये बसचा वापर करण्यात आला. या दोन बॉम्बस्फोटांमध्ये ४५ सेकंदांचे अंतर होते.

अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारलेली नाही. मात्र आयसिस किंवा कुर्दिश बंडखोरांनी हे बॉम्बस्फोट घडवले असल्याची शक्यता आहे.

स्थानिक वेळेनुसार बेसिकतास स्टेडियमबाहेर रात्री १० वाजून ३० मिनिटांनी बॉम्बस्फोट झाले. यानंतर प्रत्यक्षदर्शींनी या भागात गोळीबाराचे आवाजदेखील ऐकले. यानंतर पोलिसांनी या भागाचा ताबा घेतला. ‘या स्फोटात जखमी झालेले बहुतांश जण पोलीस कर्मचारी आहेत. पोलीस पथक अंकाराहून इस्तंबूलला जात असताना बॉम्बस्फोटाची घटना घडली. या हल्ल्याची जबाबदारी अद्यापपर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही,’ अशी माहिती तुर्कस्तानचे गृहमंत्री सुलेमान सॉयल यांनी दिली आहे.

‘यंदाच्या वर्षात तुर्कस्तानात बॉम्बस्फोटाच्या घटना घडल्या आहेत. आयसिस किंवा कुर्दिश बंडखोरांनी हे स्फोट घडवून आणले असल्याची शक्यता आहे. विशेष पोलीस दलाची तुकडी ज्या ठिकाणी होती, त्याच ठिकाणी कारमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला. फुटबॉल चाहते घरी परतल्यानंतर ही घटना घडली. त्यामुळे बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना पोलिसांनाच लक्ष्य करायचे होते, ही बाब उघड आहे,’ असेही सुलेमान सॉयल यांनी म्हटले आहे.

Story img Loader