भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे योगदान देत ‘मिसाइल मॅन’ हे बिरूद सार्थकी लावणारे भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे सोमवारी सायंकाळी पावणेआठ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने येथे देहावसान झाले. ते ८४ वर्षांचे होते. २००२ ते २००७ या काळात राष्ट्रपतीपदाची धुरा अत्यंत यशस्वीरीत्या संभाळून डॉ. कलाम यांनी त्या पदावर आपल्या चमकदार कामगिरीची मोहर उमटविली. विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ. कलाम यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले होते.
शिलाँग येथील ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेण्ट’मध्ये डॉ. कलाम यांचे व्याख्यान होते. त्यासाठी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तेथे आल्यानंतर त्यांनी काही काळ विश्रांती घेतली. सायंकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी त्यांच्या व्याख्यानास प्रारंभ झाला आणि काही वेळातच ते जागीच कोसळले. साधारण सातच्या सुमारास त्यांना बेथनी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. मात्र, पावणेआठच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
मेघालयाचे राज्यपाल व्ही. षण्मुगनाथन् यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली. कलाम यांना वाचविण्यासाठी वैद्यकीय पथकाने अथक प्रयत्न करूनही त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत, असे षण्मुगनाथन् यांनी सांगितले. डॉ. कलाम यांचे पार्थिव नंतर लष्करी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. त्यानंतर विशेष विमानाने मंगळवारी सकाळी ते दिल्ली येथे आणण्यात येणार असल्याची माहिती मेघालयचे मुख्य सचिव पी. बी. ओ. वार्जिरी यांनी दिली.
‘सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती’ असा मान मिळविणारे डॉ. कलाम हे २००२ ते २००७ या कालावधीत देशाचे राष्ट्रपती होते. दरम्यान, डॉ. कलाम यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारने सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून, मंगळवारी संसदेच्या उभय सभागृहांमध्ये कलाम यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडून त्यांच्या स्मृत्यर्थ कामकाज तहकूब केले जाण्याची शक्यता आहे.
रामेश्वरम्मध्ये शोककळा
डॉ. कलाम यांच्या निधनाचे वृत्त समजताच रामेश्वरम् या त्यांच्या जन्मगावी शोककळा पसरली. कलाम यांचे मोठे बंधू मोहम्मद मुथू मीरा मराईकर हे ९९ वर्षांचे असून त्यांना आपल्या धाकटय़ा भावाच्या विरहाचा शोक अनावर झाला. आपल्याला भावाचे मुख बघायचे आहे, असा हेका मराईकर यांनी धरला होता. मराईकर यांचे पुत्र जैनुलाबुद्दीन यांनी ही माहिती दिली.

त्यांनी खूप काही दिले..
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याबरोबर भरपूर काम करण्याची संधी मला मिळाली. पोखरण येथील अणुचाचणी असेल, सबमरीन रिअ‍ॅक्टर असेल किंवा देशातील वैज्ञानिक कार्यक्रमाची दिशा ठरविण्याचा विषय असेल.. अशा विविध विषयांमध्ये डॉ. कलाम यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली. कोणतीही समस्या आली की ते त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी योजनेचा आराखडा तयार करण्यात मग्न असायचे. यामुळे ते जेव्हा निवृत्त झाले त्यावेळेस मी त्यांना विचारले की, आता पुढे काय करणार? तेव्हा ते मला म्हणाले की, मी आता मुलांशी संवाद साधणार. तेव्हा त्यांनी वर्षभरात एक लाख मुलांशी संवाद साधण्याचा संकल्प सोडला. यानंतर ते काही काळातच राष्ट्रपती झाले. तेव्हा मी पुन्हा त्यांना त्यांच्या संकल्पाबद्दल विचारले असता ते म्हणाले की, आता तर काम आणखी सोपे झाले. अशाच एका कार्यक्रमासाठी ते स्वित्र्झलडला गेले असताना तेथील मुलांशी त्यांनी संवाद साधला आणि तेथेही त्यांनी मुलांना वागणुकीची शपथ घ्यायला लावली. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या पलीकडे जाऊन त्यांनी खूप काही दिले. डॉ. कलाम हे अत्यंत साधे आणि सर्वाशी मिळून मिसळून वागणारे व्यक्तिमत्त्व होते.
– डॉ. अनिल काकोडकर,
अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष

actor Sudip Pandey died of heart attack
प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, इंजिनिअरींग सोडून आलेला सिनेविश्वात
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Solapur mayor Mahesh kothe death marathi news
Mahesh Kothe : कुंभमेळ्यात स्नान करताना सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचा हृदयविकाराने मृत्यू
Stunts by bikers kill young man in road accidnet
दुचाकीस्वारांच्या स्टंटबाजीने घेतला रस्त्यावरील तरुणाचा बळी
Iqbal Chagla passed away, Senior lawyer Iqbal Chagla,
ज्येष्ठ वकील इक्बाल छागला यांचे निधन
Yograj Singh on Yuvraj Singh cancer 2011 world cup
Yograj Singh: “युवराज सिंग ‘त्यावेळी’ मरण पावला असता तरी मला अभिमान वाटला असता”, वडील योगराज सिंग यांचे विधान
लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूआधी ताश्कंदमध्ये नेमकं काय घडलं होतं? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
Lal Bahadur Shastri Death : लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूआधी ताश्कंदमध्ये नेमकं काय घडलं होतं?
musician-singer Rahul Ghorpade passes away
प्रसिद्ध संगीतकार-गायक राहुल घोरपडे यांचे निधन

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे आपल्या कारकीर्दीत लोकांचे राष्ट्रपती म्हणून ओळखले गेले आणि त्यांचे हे स्थान त्यांच्या मृत्यूनंतरही कायम रहाणार आहे. कलाम हे अत्यंत लोकप्रिय होते.  मुलांबद्दल त्यांना अतीव प्रेम, माया होती आणि आपला वैयक्तिक संपर्क आणि प्रेरणादायी भाषणांमधून त्यांनी देशभरातील युवा वर्गाला स्फूर्ती दिली. माझ्या या मित्राला माझी मन:पूर्वक श्रद्धांजली.
प्रणब मुखर्जी, राष्ट्रपती

डॉ. कलाम यांच्यासोबत खूप सुरुवातीपासून काम करत आहे. मिसाइल तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत असताना आम्ही एकमेकांसोबत खूप वेळ घालवला. त्यांच्यासोबतच्या आठवणी आजही अगदी ताज्या आहेत. त्यांनी विज्ञानाच्या प्रसाराबरोबरच विकसित भारताचे पाहिलेले स्वप्न खरोखरच खूप दिशादर्शक होते.
– डॉ. आर. चिदंबरम, पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार

राष्ट्रपती असताना आणि राष्ट्रपती पद सोडल्यावरही ते ज्या धडाडीने काम करत होते तेही खरोखरच कौतुकास्पद होते. ते डीआरडीओमध्ये असताना त्यांनी मला एकदा पेटंट या विषयावर व्याख्यान देण्यासाठी बोलावले होते. त्यावेळेस मी त्यांना ‘मिस्टर टेक्नॉलॉजी ऑफ इंडिया’ असे म्हटले.
डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ

ते त्रिवेंद्रममध्ये असताना माझी आणि त्यांची ओळख झाली.  अगदी ४ जुलैला डॉ. कलाम यांनी लिहिलेल्या ट्रान्सेनडेन्स या पुस्तकाचे प्रकाशनाच्या वेळी मी उपस्थित होतो. यामध्ये त्यांनी विज्ञान आणि अध्यात्माची योग्य सांगड घातली आहे. माझी आणि त्यांची विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या पलीकडे जाऊन या विषयावर जास्त चर्चा होत असे.
डॉ. विजय भटकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ

गुरूंबरोबर ती अखेरची भेट
माजी राष्ट्रपती व ‘मिसाइल मॅन’ एपीजे अब्दुल कलाम यांनी त्यांना घडवणाऱ्या शिक्षकांची भेट घेऊन अलीकडेच चर्चा केली. बेस्ची महाविद्यालयात कलाम आले होते व त्यांनी रेव्हरंड फ्रान्सिस लॉडिस्लॉस चिन्नादुराई यांची भेट घेतली. चिन्नादुराई यांनी त्यांना तिरूची येथील सेंट जोसेफ महाविद्यालयात १९५० ते १९५४ दरम्यान भौतिकशास्त्र व उष्मागतिकी हे विषय शिकवले होते. कलाम व चिन्नादुराई यांच्यात पंधरा मिनिटे चर्चा झाली. चिन्नादुराई हे ९४ वर्षांचे असून त्यांनी सांगितले की, कलाम आले व भेटले त्यामुळे आनंद झाला. कलाम हे हुशार विद्यार्थी होते व ते दरदिवशी भौतिकशास्त्र तीन तास शिकत असत.
श्रद्धांजली
मी अणुऊर्जा आयोगाचा अध्यक्ष असताना आणि त्याच्याही आधी डॉ. कलाम यांच्यासोबत विविध विषयांवर सातत्याने चर्चा होत असे. अनेक प्रकल्पांचा आराखडा त्यांच्याशी चर्चा करून ठरविल्याचे मला आठवते. लोकांना सतत उत्साही ठेवण्याचे आणि त्यांना विकसित भारताचे स्वप्न दाखविण्याचे मोलाचे काम त्यांनी केले होते.
– डॉ. श्रीकुमार बॅनर्जी, अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष
*******
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला एका उंचीवर नेऊन ठेवणारा एक मार्गदर्शक आपण आज गमावला आहे. डॉ. कलाम हे थोर शास्त्रज्ञ होते. अवकाश क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या थोर मार्गदर्शकास मी मुकलो आहे. डॉ. कलाम हे संपूर्ण देशासाठी, विशेषत: तरुणांसाठी प्रेरणास्थान होते आणि शेवटपर्यंत ते कायमच तरुणांच्या संपर्कात होते.
-नरेंद्र मोदी, पंतप्रधान
*******
डॉ. कलाम हे विकासाची दृष्टी असणारे थोर शास्त्रज्ञ असून ते खरेखुरे भारताचे सुपुत्र होते. त्यांचे आयुष्य देशभरातील लक्षावधी युवकांसाठी कायमचे प्रेरणादायी ठरेल. अवकाश आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून कलाम यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे.
-हमीद अन्सारी, उपराष्ट्रपती
*******
डॉ. कलाम यांचे निधन दु:खदायक असून त्यांच्याशी आपला विशेष संबंध होता. भारताच्या लाडक्या सुपुत्रांपैकी एक असलेले कलाम हे माझ्या आवडत्या व्यक्तिमत्वांपैकी एक होते. आजचा दिवस अत्यंत वाईट दिवस म्हणायला हवा.
-ममता बॅनर्जी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री
*******
कलाम यांच्या निधनामुळे आपली वैयक्तिक हानी झाली आहे. कलाम हे थोर शास्त्रज्ञ तसेच प्रसिद्ध समाजसेवकही होते. आपल्या विनंतीवरून कलाम यांनी अनेक वेळा बिहारला भेट देऊन राज्याच्या विकासासाठी मोलाचे मार्गदर्शन केले आहे. नालंदा आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना करण्याकामी कलाम यांचा मोलाचा वाटा होता.
-नितीशकुमार, बिहारचे मुख्यमंत्री

डॉ. कलाम हे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि थोर मानवतावादी होते. ते थोर राष्ट्रपती आणि अत्यंत लोकप्रिय नेतेही होते.
-स्वराज पॉल
*******
कलाम यांचे निधन झाल्यामुळे देशाने आज थोर शास्त्रज्ञ आणि विनम्र व्यक्तिमत्व गमावले आहे. त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी, हीच प्रार्थना.
-आनंदीबेन पटेल,
गुजरातच्या मुख्यमंत्री
*******
डॉ. कलाम यांच्या निधनामुळे आज प्रत्येक भारतीयास आपली वैयक्तिक हानी झाल्याचे दु:ख वाटेल. कलाम यांनी समाजाच्या प्रत्येक थरातील लोकांची सेवा केली आहे. अलीकडच्या इतिहासात असे फार कमी लोक आहेत की ज्यांनी तरुण असो वा वृद्ध, गरीब, श्रीमंत, सुशिक्षित असो वा आशिक्षित-विभिन्न भाषा बोलणारे लोक, अशा प्रत्येक घटकाशी संपर्क ठेवला होते. कलाम या सर्वाच्याच संपर्कात होते आणि त्यांना कलाम यांनी मार्गदर्शन केले. कलाम यांनी भारताचे प्रथम नागरिक म्हणून तसेच एक शिक्षक, शास्त्रज्ञ व संघनेता म्हणून केलेल्या कार्याबद्दल त्यांना आपली आदरांजली.
-पी.चिदंबरम, माजी मंत्री
*******
आपले प्रेरणास्थान, देशाचे मिसाईल मॅन अशी प्रतिमा असलेल्या कलाम यांचे निधन ही मोठी हानी आहे. त्याचे निधन धक्कादायक आहे. कलाम साहेबांनी आम्हाला मोठी स्वप्न बघायला शिकवलं आणि ही स्वप्ने पूर्ण होऊ शकतात असा विश्वास निर्माण केला. देशाला महासत्ता बनविण्याच्या वाटेवर ते घेऊन गेले होते
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस</strong>
*******
कलाम यांच्यासोबत सुमारे वीस वर्षे शास्त्रज्ञ म्हणून काम करण्याचे सौभाग्य लाभले. त्यांच्याशी माझे १९८६ पासून संबंध होते. अग्नी मिसाईलच्या चाचणीस मदत करण्यास अनेक देशांनी नकार दिला होता. तेव्हा कलाम यांनी स्वत ही समस्या सोडवण्याचा निर्णय घेतला.  कुठलाही अहंकार नसलेले ते साधे, विनम्र आणि सकारात्मक व्यक्ती होते. ते माझे गुरू आणि मित्रही होते.
– एस. एम. देशपांडे ,शास्त्रज्ञ
*******
वैज्ञानिक सल्लागार होते तेव्हापासून त्यांना ओळखतो. संरक्षण मंत्रालयाचा वार्षिक अहवाल प्रकाशित होत असतो. त्यासाठी छायाचित्र हवे असायचे. पोखरण येथील अण्वस्त्र चाचणीचे सारे श्रेय त्यांनाच जाते. ही चाचणी होत आहे, हे अमेरिकेला कळले देखील नव्हते एवढे काटेकोर नियोजन त्यांच्यामुळेच शक्य झाले.
-विंग कमांडर अशोक मोटे (निवृत्त)
*******
दिल्लीला विज्ञान केंद्रात असताना तत्कालीन संरक्षणमंत्री मुलायमसिंग यादव यांचे वैज्ञानिक सल्लागार असताना त्यांना भारतरत्नने गौरविण्यात आले. त्यावेळी त्यांच्या जीवनकार्यावर आणि वैज्ञानिक प्रवासावर प्रदर्शन आयोजित करण्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली होती. त्यावेळी त्यांना भेटून त्यांना काही त्यांची जुनी छायाचित्रे मागितली.  त्यावेळी त्यांच्या जीवनावर आधारित अनेक छायाचित्रे त्यांच्याकडून मिळविली आणि प्रदर्शन आयोजित केले.
-रामन विज्ञान केंद्राचे संचालक अय्यर रामदास

कलाम यांची इंदिरा गांधी यांच्याबाबत आठवण
भारताच्या पोखरण येथील पहिल्या यशस्वी अणुस्फोटांचा संदेश तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना देण्यासाठी राजस्थानच्या वाळवंटातून कलाम यांना थेट दिल्लीला पाठवण्यात आले होते. त्यावेळी कलाम यांना आपल्या अंगावरील धुळीने माखलेल्या कपडय़ांची लाज वाटत होती. मात्र इंदिरा गांधी त्यांना अभिमानाने म्हणाल्या होत्या की, काळजी करू नका. यू आर वेल क्लॅड इन युवर व्हिक्टरी.
१९७४ साली घेतलेल्या या अणुचाचण्यांचा उल्लेख ‘स्माईलींग बुद्ध’ असा केला जातो.  अणुशक्तीचा शांततामय मार्गाने उपयोग करण्याप्रती वचनबद्धताच त्यातून प्रतीत होते.

माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या निधनाबद्दल सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. मात्र, शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार नाहीत.

Story img Loader