चीनमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांना आता नास्तिक व्हावं लागणार आहे. सदस्यांनी धर्म न सोडल्यास त्यांना शिक्षेला सामोरं जावं लागेल, असा इशाराच पक्षाकडून देण्यात आला आहे. ‘पक्षाची विचारधारा लक्षात घेता सच्चा मार्क्सवादी होण्यासाठी सदस्यांना नास्तिक व्हावं लागेल,’ असं कम्युनिस्ट पक्षानं एका पत्रकातून म्हटलं आहे. ‘कम्युनिस्ट पक्षाच्या एखाद्या सदस्यानं धार्मिक प्रथा-परंपरांचं पालन सुरु ठेवल्यास त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल,’ असं चीन सरकारचं अधिकृत वर्तमानपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सनं म्हटलं आहे.

डाव्या विचारधारेचा कम्युनिस्ट पक्ष कोणत्याही धर्माला मानत नाही. मार्क्सवादी सिद्धांतानुसार कम्युनिस्ट पक्ष स्वत:ला नास्तिक म्हणवून घेतो. चीनच्या संविधानाचा विचार केल्यास, देशातील लोकांना धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. मात्र संविधानानं धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला असूनही सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षानं सदस्यांना नास्तिक होण्याचे आदेश दिले आहेत. चीनच्या सत्ताधारी पक्षाचा हा आदेश संविधानाच्या विरोधात आहे.

कम्युनिस्ट पक्षाच्या धार्मिक विषयांसबंधीच्या विभागाचे संचालक वांग जुआन यांनी पक्षाच्या मासिकात ‘नास्तिकतेवर’ भाष्य केलं आहे. ‘पक्षाच्या सदस्यांनी कोणत्याही धर्मावर विश्वास आणि श्रद्धा ठेवू नये. हा सर्व सदस्यांसाठी एक इशारा आहे,’ असं मासिकातील लेखात नमूद करण्यात आलं आहे. परकीय शक्ती धर्माचा वापर करत चीनमध्ये घुसखोरी करण्याचे आणि देशाच्या सुरक्षेला निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत, असंही मासिकानं म्हटलं आहे.

‘कम्युनिस्ट पक्ष सामान्यपणे सर्व धर्मांकडे सहिष्णूपणे पाहतो. मात्र स्वत:च्या सदस्यांना धार्मिक प्रथा-परंपरांचं पालन करण्यापासून कम्युनिस्ट पक्षाकडून कायमच आडकाठी केली जाते,’ असं काऊंसिल ऑन फॉरेन रिलेशन्स नावाच्या अमेरिकन थिंक टँकनं म्हटलं आहे. चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे एकूण ९ कोटी सदस्य आहेत. या सदस्यांपैकी धार्मिक संघटनेशी संबंध असलेल्या पक्षाच्या सदस्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाणार आहे.