रेल्वे मालवाहतुकीला चालना देण्यासाठी मे महिन्यापासून काही मार्गावरील मालवाहतुकीचे वेळापत्रकच जाहीर करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. मे आणि जून या दोन महिन्यांपुरते प्रथम हे वेळापत्रक आखले जात आहे.
या प्रयोगाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन पुढील कार्यवाही होईल, असे रेल्वे बोर्डाचे सदस्य महम्मद जमशेद म्हणाले. आजवर रेल्वे मालवाहतुकीचे कोणतेही वेळापत्रक नव्हते. निश्चित वेळेची हमी मिळाल्यास रेल्वेद्वारे मालवाहतूक करण्याकडे उद्योजकांचा कल वाढेल, या विचारातून मालगाडय़ांच्या वेळापत्रकाचा निर्णय होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत रेल्वे मालवाहतुकीत एक टक्का वाढ झाली असून ती ११०१.७६ दशलक्ष टनावर गेली आहे.