कैलाश सत्यार्थी व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजिनीयर; पण भारतात लहान मुलांकडून पैशांसाठी ज्या प्रकारे काम करून घेतले जाते त्याने ते इतके अस्वस्थ झाले की, तिशीच्या आधीच चांगली नोकरी सोडून त्यांनी बालहक्क रक्षणासाठी स्वत:ला झोकून दिले. बालकांचे बालपण वाचवायला हवे, या उद्देशाने त्यांनी ‘बचपन बचाओ आंदोलन’ ही स्वयंसेवी संस्था सुरू केली. गेल्या ३० वर्षांत सत्यर्थी आणि त्यांच्या ‘बचपन बचाओ’ने तब्बल ८० हजार बालकांना बालकामगाराच्या जोखडातून मुक्त करून त्यांना बालपणाचा आनंद भरभरून मिळेल याची तजवीज केली. आज भारतात बालकामगार क्षेत्रातील सगळ्यात ठळक आवाज ‘बचपन बचाओ’चाच आहे.
बालकामगारांसंदर्भात सत्यर्थीचा अगदी सांगोपांग अभ्यास आहे. दारिद्रय़, बेकारी, निरक्षरता यामुळे बालकामगार अस्तित्वात येतो, असे म्हटले जाते; परंतु बालकामगारामुळे या समस्या अधिक तीव्र होण्याची उलट प्रक्रियासुद्धा घडते हे सत्यार्थीनी दाखवून दिले. दिल्ली, मुंबईसारख्या भल्यामोठय़ा महानगरांपासून झारखंड, बिहार आणि राजस्थानातील खेडोपाडय़ांत बालकामगाराची अनिष्ट प्रथा आजही सुरू आहे. देशाच्या बहुतेक सर्व भागांमध्ये प्रत्यक्ष जाऊन ही प्रथा मोडून काढण्याचा धाडसी प्रयत्न सत्यार्थी यांनी केला. सुरुवातीला कारखान्यांचे मालक आणि पोलिसांकडूनही त्यांना विरोध झाला. त्यांची अवहेलना झाली; परंतु या मूल्याप्रति सत्यर्थी यांची निष्ठा इतकी प्रखर होती की, विरोध आणि अवहेलना हळूहळू मावळत गेली आणि सत्यर्थी यांचे स्वागत होऊ लागले.
बालकामगाराप्रमाणेच शिक्षणाच्या अधिकारासाठीही कैलाश सत्यार्थी यांनी जिवाचे रान केले. बालकामगारांना सक्तीचा आणि मोफत शिक्षणाधिकार मिळालाच पाहिजे यासाठी त्यांनी मोठी मोहीम हाती घेतली होती. बालकांच्या हक्कांची ही मोहीम सत्यर्थी यांनी भारताबाहेर जगभर पोहोचवली. विशेषत: आशिया व आफ्रिका खंडांतील तिसऱ्या जगातील देशांमध्ये बालकांकडे सहानुभूतीने पाहिले जात नाही. म्हणूनच या देशांमध्ये आपली चळवळ नेऊन पोहोचविण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला.
जगभर गालिचे विणण्यासाठी सर्रास लहान मुलांना कामाला जुंपले जाते. ही अनिष्ट प्रथा संपवण्यासाठी त्यांनी चळवळ हाती घेऊन ती तडीला नेली. परिणामी या गालिच्यांवर आता ‘गुड वीव्ह’ असा शिक्का मारला जाऊ लागला आहे. हा गालिचा विणताना लहान मुलांचे हात लागलेले नाहीत, अशी खात्री हा शिक्का देतो.
बालकामगारविरोधी मोहिमेच्या प्रवासात सत्यार्थी यांना जसा प्रखर विरोधाचा सामना करावा लागला तशीच पुरस्कारांची हिरवळही त्यांनी अनुभवली. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना प्राप्त झाले. अमेरिकेतील ‘डिफेंडर ऑफ डेमॉक्रसी अॅवॉर्ड’, इटलीचा ‘मेडल ऑफ इटालियन सिनेट’, अमेरिकेतील ‘रॉबर्ट केनेडी इंटरनॅशनल ह्य़ूमन राइट्स अॅवॉर्ड’, जर्मनीचा ‘फ्रेडरिक एबर्ट इंटरनॅशनल ह्य़ूमन राइट्स अॅवॉर्ड’ अशा अनेक पुरस्कारांचा सन्मान सत्यर्थी यांना लाभला आहे.
नोबेल पुरस्कारासाठी सत्यार्थी यांचे नामांकन यापूर्वीही अनेकदा झाले आहे. सत्यार्थी यांना नोबेल पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांनी एक प्रकारे इतिहासच रचला आहे. शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार याआधी १९७९ साली मदर तेरेसा यांना मिळाला होता. त्यांची कर्मभूमी भारत असली तरी जन्माने त्या भारतीय नव्हत्या. सत्यार्थी हे जन्मभूमी आणि कर्मभूमी भारत असणारे पहिले नोबेल पुरस्कारविजेते ठरले आहेत.
नोबेल देशाला अर्पण – सत्यार्थी
नोबेल पुरस्काराच्या निमित्ताने देशातील लक्षावधी बालकांच्या लढय़ाला अधिकृतताच मिळाली आहे. हा पुरस्कार देशाला अर्पण, अशा शब्दांत कैलाश सत्यार्थी यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या. त्यांच्यासोबतच शांततेचे नोबेल मिळवणारी पाकिस्तानची मलाला युसुफजाई हिलासुद्धा आपण या लढय़ात सहभागी होण्याचे आवाहन करणार आहोत, असेही सत्यार्थी यांनी सांगितले.
सत्यर्थी यांना मिळालेला नोबेल पुरस्कार म्हणजे बालकामगारसारख्या अनेकविध समस्यांशी झगडणाऱ्या भारतीय समाजाच्या प्रगतिशीलतेला मिळालेली मानवंदनाच आहे.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
शांततेचे नोबेल पारितोषिक मिळवणारे कैलाश सत्यर्थी आणि मलाला युसूफजाई या मानवतावादी कार्यकर्त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! सत्यर्थी यांनी आपले सारे आयुष्य मानवतावादास आणि सामाजिक कार्यास समर्पित केले. संपूर्ण राष्ट्राला त्यांचा अभिमान आहे. मलाला युसूफजाई हिचे आयुष्य अपार धर्याने आणि साहसाने भरलेले आहे. तालिबानी दहशतवाद्यांना न डगमगता तिने मुलींच्या शिक्षणासाठीचे कार्य सुरू ठेवले. नोबेल जाहीर झाल्याने तिचेही अभिनंदन.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान
बालहक्कासाठी कैलाश सत्यर्थी यांनी सुरू केलेली चळवळ अभिमानास्पद आहे. सामाजिक कार्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, नोबेल पुरस्कार हा त्यांचा अधिकारच होता. मलालाचेही योगदान मोठे असून दोघांचेही अभिनंदन!
– सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्षा