हैदराबादमधील दिलसुखनगर भागात २०१३ मध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी यासीन भटकळ आणि इतर चार जणांना सोमवारी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. असादुल्ला अख्तर, एझाज शेख, तहसीन अख्तर आणि झिया उर रहमान उर्फ वकास अशी उर्वरित चार दोषींची नावे आहेत.

दिलसुखनगरमध्ये २१ फेब्रुवारी २०१३ रोजी दोन स्फोट झाले होते. यामध्ये १८ जण ठार तर १३१ जण जखमी झाले होते. याप्रकरणी भटकळ, असादुल्ला अख्तर, एझाज शेख, तहसीन अख्तर आणि झिया उर रहमान उर्फ वकाससह रियाझ भटकळविरोधात गुन्हा दाखल झाला होता. यातील रियाझ भटकळ हा सध्या पाकिस्तानमध्ये असून उर्वरित पाच जणांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केली होती.

गेल्या वर्षी २४ ऑगस्टला राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएच्या न्यायालयात भटकळ आणि त्याच्या साथीदारांविरोधात सुनावणी सुरु झाली होती. गेल्या आठवड्यात एनआयएच्या विशेष न्यायालयाने यासीन भटकळ आणि त्याच्या चार साथीदारांना दोषी ठरवले होते. इंडियन मुजाहिदीन या प्रतिबंधित संघटनेच्या सदस्यांना दहशतवादाच्या प्रकरणात दोषी ठरवण्याची ही पहिलीच वेळ होती. भादंवि कलमे, शस्त्रास्त्र कायदा व बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायदान्वये न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते. सोमवारी एनआयएच्या विशेष न्यायालयाने यासीन भटकळ, असादुल्ला अख्तर, एझाज शेख, तहसीन अख्तर आणि झिया उर रहमान उर्फ वकास या सर्वांना फाशीची शिक्षा सुनावली. यातील एझाज शेख हा महाराष्ट्राचा आहे. तर झिया उर रहमान हा पाकिस्तानचा आहे.

एनआयएने त्यांच्या आरोपपत्रात हैदराबादमधील या स्फोटाचा कट इंडियन मुजाहिद्दीनने रचल्याचे म्हटले होते. रियाझ भटकळ यात प्रमुख आरोपी होता व त्याने असादुल्ला अख्तर व वकास यांना मंगलोर येथे स्फोटके लपवण्यासाठी जागा पाहण्यास सांगितले होते. रियाझने पाठवलेली स्फोटके अज्ञात व्यक्तीमार्फत मिळाली व हवालामार्गाने पैसेही मिळाले होते. नंतर अख्तर व वकास हे हैदराबादला गेले व तहसीन अख्तर ऊर्फ मोनू याच्याबरोबर काम सुरू केले. तो अब्दुल्लापूरमेट भागात राहात होता. नंतर तिघांनी मिळून दोन आयइडी व प्रेशर कुकर बॉम्ब व टायमरची जुळणी केली. २१ फेब्रुवारीला सायकल खरेदी करून त्यावर बॉम्ब लावून त्या दिलसुखनगर भागात ठेवल्या. एनआयएच्या चौकशीत असे निष्पन्न झाले, की आरोपींना परदेशातून मदत मिळाली होती. हैदराबाद येथे अब्दुल्लापूरमेट येथे त्यांनी चाचणी स्फोटही केला होता. हे आरोपी इंटरनेटने एकमेकांशी संपर्कात होते असे एनआयएने म्हटले होते. खटल्यात पुराव्यादाखल ४४० साक्षीदार तपासण्यात आले. २५१ कागदपत्रे व ३०० स्फोटक पदार्थ त्यात पुराव्यासाठी सादर केले गेले होते.

Story img Loader