भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात जाणाऱ्या मुस्लिमांची समाजातून हकालपट्टी करुन त्यांना चोप देऊ अशी धमकी टिपू सुलतान मशिदीचे शाही इमाम मौलाना नुरुर रेहमान बरकती यांनी दिली आहे. हा फतवा आहे का यावर त्यांनी भाष्य करणे टाळले असले तरी या विधानावरुन आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोलकातामधील पत्रकार परिषदेत टिपू सुलतान मशिदीचे शाही इमाम मौलाना नुरुर रेहमान बरकती यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. भाजप आणि संघ पश्चिम बंगालमध्ये शब-ए- बरातच्या आयोजनात अडथळे आणत असल्याचा आरोप त्यांनी केला. संघ आणि भाजपमध्ये जाणाऱ्या मुस्लिमांना आम्ही शिक्षा देऊ. चांगला चोप दिल्यावर त्यांना इस्लाम धर्मातून काढून टाकू अशी धमकीच त्यांनी दिली आहे. मुस्लिमांनी कोणत्याही राजकीय पक्षासाठी काम करावे. पण संघ आणि भाजपसाठी त्यांनी काम करु नये असे त्यांनी सांगितले. भाजपने जर संघापासून फारकत घेऊन काम केले तर मुस्लिम समाजातील व्यक्ती भाजपसाठी काम करु शकेल असेही त्यांनी सांगितले. हिंदू समाजातील धर्मनिरपेक्ष मंडळींनीही एकत्र येऊन भाजप आणि संघाविरोधात उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.
संघाकडून मुस्लिमांवर हल्ले होत असल्याने त्यांच्या संघटनेत मुस्लिमांनी जाणे योग्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपण संघाचे स्वयंसेवक नसून देशाचे पंतप्रधान आहेत आणि देशाचे रक्षण करणे हे आपले काम आहे हे विसरु नये असेही बरकती म्हणालेत. मशिदीबाहेर ‘जय श्री राम’ अशा घोषणा देणाऱ्या मंडळींवर मुस्लिम समाज किती दिवस गप्प बसेल हे माहित नाही असेही त्यांनी नमूद केले. तिहेरी तलाकचेही शाही इमाम बरकती यांनी समर्थन केले आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डामध्ये तिहेरी तलाकवरुन सध्या राजकारण सुरु आहे. पण बोर्डाने शरीयतसाठी लढा दिलाच पाहिजे. तिहेरी तलाकवरुन सुरु झालेल्या वादावार तोडगा निघायला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.