एकीकडे सीमावर्ती भागात चीनचे सैन्य तसेच मुलकी नागरिकसुद्धा भारतीय हद्दीत घुसखोरी करीत असताना चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग व त्यांच्या पत्नी पेंग लियुयान यांचे बुधवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ६४ व्या वाढदिवशीच भारत दौऱ्यावर आगमन झाले. पारंपरिक रिवाजानुसार दिल्लीमार्गे भारतात प्रवेश करण्याऐवजी ‘मोदींच्या’ गुजरातमार्गे प्रवेश करून तसेच गुजराती भूमीवर पाऊल ठेवल्यापासून काही तासांतच गुजरातशी संबंधित तीन करार करीत त्यांनी आपल्या परराष्ट्र धोरणात मोदींना महत्त्वाचे स्थान असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या स्वागतासाठी आपली कर्मभूमी गुजरातमध्ये जातीने हजर राहात अस्सल गुजराती आतिथ्याच्या लाल पायघडय़ा त्यांच्यासमोर अंथरल्या. चीनची घुसखोरी आणि आक्रमकता यांची पूर्ण माहिती असूनही मोदी यांनी जिनपिंग दाम्पत्याच्या स्वागतात कणभरही उणीव राहणार नाही याची पूर्ण काळजी घेतली.
‘एअर चायना’च्या विशेष विमानाने आगमन झाल्यावर अध्यक्षीय दाम्पत्याचे ‘द हयात’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये पंतप्रधान मोदी यांनी प्रवेशद्वारी येऊन स्वागत केले. त्यानंतर लगेच ते उभयतांना घेऊन अहमदाबादच्या सफरीवर निघाले. साबरमतीचा रमणीय किनारा, गांधीजींचा आश्रम, तेथील ऐतिहासिक चरखा, खादीचा हार, गुजराती नृत्य आणि रंगांची उधळण, अस्सल गुजराती पक्वान्नांची रेलचेल अशा भारलेल्या वातावरणात मोदी आणि क्षी जिनपिंग यांची चर्चाही सुरू होती आणि हास्यविनोदही सुरू होते.
उभय नेत्यांच्या उपस्थितीत गुजरातशी संबंधित तीन महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. चीनमधील ग्वांगझू आणि अहमदाबाद यांना ‘भगिनी शहरां’चा दर्जा देणे, गुजरातमध्ये औद्योगिक नगरी वसविणे आणि चीनचा ग्वांगडाँग प्रांत आणि गुजरात सरकार यांच्यात सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध विकसित करणे असे हे तीन करार आहेत. जिनपिंग यांच्या स्वागतासाठी अहमदाबादमध्ये अनेक ठिकाणी गुजराती, इंग्रजी आणि
चिनी भाषेतील भलीमोठी होर्डिग्ज लावण्यात आली होती.
भेटीचे वैशिष्टय़
राजशिष्टाचारानुसार देशाच्या राजधानीऐवजी अहमदाबाद येथे ही भेट होत असल्यामुळे उभय नेत्यांमधील संबंध जिव्हाळ्याचे असल्याचा संकेत मिळत आहे. या भेटीत गुजरात राज्याचे औद्योगिक विस्तार खाते आणि चायना डेव्हलपमेंट बँक यांच्यात औद्योगिक नगरी उभारण्याबाबत सहकार्य करार करण्यात आला. ग्वांगझू- अहमदाबाद या शहरांना ‘भगिनी शहरां’चा दर्जा देण्याचा निर्णय यामुळे गुजरात आणि चीन यांच्या नवनवीन कल्पना आणि सेवा यांची देवाण-घेवाण सुलभ झाली आहे.
वाढदिवस साधेपणाने साजरा
पंतप्रधान झाल्यानंतरचा आपला पहिलाच वाढदिवस नरेंद्र मोदी यांनी आईच्या पाया पडून आणि तिच्या हातची मिठाई खाऊन साजरा केला. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या भेटीसाठी पंतप्रधान अहमदाबादला आले आहेत. वाढदिवसानिमित्त ते एकटेच कोणतीही सुरक्षाव्यवस्था न घेता गांधीनगरला आईला भेटण्यासाठी गेले. पंतप्रधान झाल्यानंतर ते प्रथमच गुजरातमध्ये आले आहेत. नरेंद्र मोदी यांना आईने मिठाई देऊन त्यांचे अभीष्टचिंतन केले. या वेळी हिराबेन यांनी जम्मू-काश्मीरमधील पूरग्रस्तांना मदत म्हणून पंतप्रधान मदत निधीसाठी ५ हजार रुपयांची देणगी दिली.