भारताने आंतरराष्ट्रीय म्युनिच सुरक्षा संमेलनात अमेरिका, जर्मनी आणि रशियासहित अनेक देशांसोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीत जम्मू-काश्मीरच्या पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला. या तीन दिवसीय संमेलनाची रविवारी सांगता झाली. गुरुवारी झालेल्या या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते.

भारतीय उच्चाधिकाऱ्यांनी सांगितले की, ५५ व्या म्युनिच सुरक्षा संमेलनात भारताचे उप सुरक्षा सल्लागार पंकज सरन यांनी सहभाग घेतला होता. या संमेलनात विविध देशांतील ६०० पेक्षा अधिक प्रतिनिधींनी भाग घेतला होता. यामध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादासहित सुरक्षासंबंधी विविध मुद्द्यांवर विस्ताराने चर्चा झाली. या संमेलनात जागतिक नेते आणि संपूर्ण जगभरातील सुरक्षातज्ज्ञांनी भाग घेतला होता.

यावेळी सरन यांची इतर अनेक देशांच्या प्रतिनिधींसोबत द्विपक्षीय बैठक पार पडली. या देशांनी पुलवामात सीआरपीएफच्या जत्थ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा स्पष्टपणे निषेध केला. तसेच या शहीद जवानांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अमेरिका, जर्मनी, रशिया, नाटो, अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, बांगलादेश, मंगोलिया, अर्मेनिया आणि ओमानच्या प्रतिनिधींसोबत भारताची द्विपक्षीय बैठक पार पडली. यावेळी भारताच्या जमिनीवर सुरु असलेल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कारवायांबाबत भारताकडून चिंता व्यक्त करण्यात आली. याला या बैठकीत व्यापक समर्थन मिळाले.