इसिस या दहशतवादी संघटनेचा नेता अबू बक्र अल बगदादी हा ठार झाल्याचे इराण रेडिओने म्हटले आहे. इराण रेडिओचा हवाला देऊन आकाशवाणीने दिलेल्या वृत्तानुसार अबू बक्र अल बगदादी हा गोलान टेकडय़ांच्या भागातील इस्रायली रुग्णालयात मरण पावला. या बातमीची अजून शहानिशा झालेली नाही. अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात तो जखमी झाला होता. इसिस या संघटनेने अनेक परदेशी नागरिकांना ओलिस ठेवून नंतर त्यांचे शिरच्छेद केले होते त्यामुळे पाश्चिमात्य देशात त्याच्या विरोधात संतापाची लाट होती.
इसिस या जिहादी गटाचा नेता अल बगदादी हा मार्चमध्ये करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात गंभीर जखमी झाला असल्याचे वृत्त द गार्डियनने दिले होते. या वृत्तानुसार अल बगदादी हा अमेरिकेने सीरियन सीमेवर निनेवेह जिल्ह्य़ात अल बाज येथे केलेल्या हवाई हल्ल्यात तो जायबंदी झाला होता. नुकताच त्याचा एका जर्मन महिलेशी विवाह झाला होता.
अल बगदादी जबर जखमी झाला असून तो आता दुखापतीतून बरा होणे अवघड जात होते. असे असले तरी जिहादी गटावर त्याचे वर्चस्व कायम होते. हा इराकी जिहादी नेता वयाच्या चाळिशीचा होता व त्याला पकडण्यासाठी अमेरिकने १ कोटी डॉलरचे इनाम लावले होते. इसिसची सूत्रे २०१० मध्ये त्याने घेतली व त्याने अल काईदाच्या स्थानिक शाखेचे रूपांतर आंतरखंडीय दलात केले व स्वत:ला जिहादी समुदायाचा नेता घोषित केले. यापूर्वी २०१४ मध्ये इराकी अधिकाऱ्यांनीही अल बगदादी जखमी झाल्याचे सांगितले होते पण त्याची खातरजमा झाली नव्हती.  इसिसने यापूर्वी एक ध्वनिफीत जारी केली असून त्यात अबु बकरअल बगदादी दिसत आहे.
खरेतर अबू बकर अल बगदादी याला अमेरिकी व इराकी दलांनी २००४ मध्ये फालुजाह येथे अटक केली पण नंतर सोडून दिले होते. २ मे २०११ रोजी ओसामा बिन लादेन या अल काईदाच्या अतिरेक्याचा अमेरिकी कारवाईत मृत्यू झाल्यानंतर अल बगदादी याने लादेनची स्तुती करून त्याच्या मृत्यूचा बदला घेण्याची प्रतिज्ञा केली होती.
त्यानंतर त्याने दक्षिण बगदादमध्ये हल्ला करून २४ पोलिसांना ठार केले. १५ ऑगस्ट २०११ रोजी त्याने आत्मघाती दले तयार करून आयएसआयच्या मदतीने मोसुल येथे ७० जणांचा बळी घेतला. २२ डिसेंबर २०११ रोजी बगदादमध्ये हल्ला करून ६३ जणांना ठार केले. २९ जून २०१४ रोजी त्याने इसिस ही संघटना स्थापन केली त्याचे नाव इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट असे आहे.

Story img Loader