भारतीय मच्छीमारांच्या हत्येचा आरोप असलेल्या नौसैनिकांना भारतात पाठविण्यास नकार देण्याच्या इटली सरकारच्या भूमिकेवर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तीव्र टीका केली आहे. कोणत्याही देशाने भारताला गृहीत धरू नये, असे त्यांनी इटलीला ठणकावले आहे.
दोघा नौसैनिकांना भारतात पाठविण्याबाबत इटलीने घेतलेली नकारार्थी भूमिका आणि सर्वोच्च न्यायालयाला दिलेले आश्वासन याला हरताळ फासण्याचा प्रकार अयोग्य आहे. त्यामुळे कोणत्याही देशाने भारताला गृहीत धरू नये, असेही गांधी यांनी काँग्रेस संसदीय पक्षाच्या बैठकीत स्पष्ट केले.
इटलीच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी सर्व प्रकारे पाठपुरावा केला जाईल, असेही त्या म्हणाल्या. सोनिया गांधी या मूळच्या इटलीच्या असल्याने काँग्रेस पक्षावर विरोधी पक्षांकडून टीका होत असल्याच्या पाश्र्वभमीवर गांधी यांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Story img Loader