प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरू असलेल्या जोरदार गोळीबार आणि उखळी तोफांच्या भडिमाराने भारत आणि पाकिस्तान सीमेवर अशांतता शिगेला गेली असतानाच शांततेसाठी देण्यात येणाऱ्या नोबेल पुरस्कारावर या देशांमधील मानवतावादी कार्यकर्त्यांनी संयुक्त मोहोर उमटवली आहे. लहान मुलांच्या हक्कांसाठी सातत्याने लढणारे ज्येष्ठ कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानात तालिबानी अतिरेक्यांच्या विरोधात ठामपणे उभे राहून मुलींच्या शिक्षणासाठी प्राण पणाला लावणारी अवघी १७ वर्षांची मलाला युसूफजाई या दोघांना यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार घोषित झाला आहे.
भारतात लहान मुलांना मुक्तपणे जगू दिले जात नाही. जगण्याच्या लढाईत नकळत्या वयात त्यांना जुंपले जाते आणि शाळेच्या दप्तराऐवजी घर चालविण्याचे ओझे त्यांच्या चिमुकल्या खांद्यावर देऊन त्यांना कामाला जुंपले जाते. या विरोधात ६० वर्षांचे कैलाश सत्यर्थी गेली सुमारे तीन दशके प्रखर लढा देत आहेत. त्यासाठी त्यांनी ‘बचपन बचाओ आंदोलन’ ही स्वयंसेवी संस्था स्थापन केली आहे. गांधीजींचा वारसा जपत त्यांनी विविध लोकशाही आयुधे वापरत आपली चळवळ पुढे नेली आहे. नोबेल पुरस्कार समितीने या बाबीचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे.
पाकिस्तानातील मलाला युसूफजाई बीबीसी वृत्तसमूहाच्या उर्दू प्रसारण सेवेसाठी वयाच्या ११ व्या वर्षांपासूनच ब्लॉग लिहीत आली आहे. पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या धमक्यांपायी मुलींना शिकू दिले जात नाही व समाजात एकूणच त्यांची अवस्था दयनीय असते. याविरोधात तिने आवाज बुलंद केला होता. त्यामुळे चिडून जाऊन तालिबानी अतिरेक्यांनी तिच्यावर जीवघेणा हल्लाही चढवला होता. तिच्या डोक्याला गोळी लागून ती गंभीर जखमी झाली होती, परंतु मोठय़ा जिद्दीने मृत्यूशी दोन हात करीत तिने ही लढाई जिंकली होती. त्यानंतरही तिने आपले काम सुरूच ठेवले आहे.
सत्यार्थी आणि मलाला हे दोघेही समाजातील दबल्या गेलेल्या वर्गासाठी लढत आहेत. भारत आणि पाकिस्तानातील तसेच हिंदू आणि मुस्लीम धर्माच्या या कार्यकर्त्यांना एका वेळी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळत आहे ही आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे, असे नोबेल समितीने आपल्या पत्रकात नमूद केले आहे.

सहाव्या वर्षी शाळेत प्रथम जाताना रस्त्यावर माझ्याच वयाचा एक मुलगा राबताना दिसला. शाळेत मी पहिला प्रश्न विचारला तो हाच की, तो मुलगा शाळेत का नाही? पुढे मी इलेक्ट्रिक इंजिनिअर झालो. प्राध्यापकी करू लागलो. पण हा प्रश्न मनातून गेला नाही. या प्रश्नानंच मला बालहक्क चळवळीत ओढून नेलं.
– कैलाश सत्यार्थी

नोबेल शांतता पुरस्कार हे माझं ध्येय नाही. शांतता हे माझं ध्येय आहे. प्रत्येक मुलाला शिक्षण, हे माझं ध्येय आहे. एक मुलगा, एक शिक्षक, एक पुस्तक, एक लेखणी एवढय़ा बळावर जग बदलता येतं. दहशतवादाशी लढायचा सोपा मार्ग आहे, पुढची पिढी सुशिक्षित करा.
– मलाला युसूफझाई

Story img Loader