राज्यघटनेतील ३७० व्या कलमानुसार जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा दिल्याबाबत चर्चा करण्याच्या भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावावर केंद्रीय मंत्री फारूख अब्दुल्ला यांनी टीकेची झोड उठवली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम लागू केल्याने नेमके काय फायदे-तोटे झाले यावर चर्चा केली पाहिजे, फायदे झाले असतील आमच्या पक्षाचा या कलमाला पाठिंबा आहे असे सांगून नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील ‘ललकार’ मेळाव्यात हळूच ३७० व्या कलमाची दुखरी नस दाबली होती. भाजप नेते नरेंद्र मोदी दहा वेळा पंतप्रधान झाले तरी त्यांना हे ३७० वे कलम रद्द करता येणार नाही, असे अब्दुल्ला सोमवारी रात्री एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. जातीय तेढ निर्माण करण्यासाठी भाजपने आता हा वाद उकरून काढला असा आरोप काँग्रेसने केला आहे. ३७० कलमाचा मुद्दा १९४७ मध्येच निकाली निघाला आहे आता त्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही, असे माकपने म्हटले आहे तर हे कलम रद्द करण्यास संसदेत मतदानाचीही गरज नाही, राष्ट्रपती केवळ एक वटहुकूम काढून हे कलम रद्द करू शकतात, असे मत भाजपचे सुब्रह्मण्यम स्वामी यांनी व्यक्त केले.
भाकपचे नेते गुरुदास दासगुप्ता यांनी सांगितले, की जम्मू-काश्मीरला कलम ३७० अन्वये विशेष दर्जा जिलेला आहे त्यावर चर्चा होऊच शकत नाही, तो मुद्दा कायमचा निकाली निघालेला आहे. जर त्यावर वादचर्चा सुरू केली, तर त्यामुळे जातीय तणाव वाढेल असे ते म्हणाले. काँग्रेसचे राजीव शुक्ला यांनी सांगितले, की भाजप आता १९४७ मध्ये निकाली निघालेल्या मुद्दय़ावर उगाचच वाद उकरून काढीत आहे.
भाजप नेत्यांच्या मते जर या कलमामुळे जम्मू-काश्मीरमधील लोकांना हानी झाली असेल तर त्यावर वादचर्चा झाली पाहिजे. चर्चा न करण्याला तो काही पवित्र ग्रंथ नाही, धर्मनिरपेक्षतेच्या पुरस्कर्त्यांना या कलमामुळे  जम्मू-काश्मीरमधील अनेक लोकांना सोसावे लागलेले दु:ख माहीत नाही, त्यांच्यासाठी कलम ३७० हे त्यांच्यासाठी कुबडीसारखे आहे, असे भाजपचे मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले. भाजपचे दुसरे नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी मोदी दहा वेळा पंतप्रधान झाले, तरी  ३७० वे कलम रद्द करू शकणार नाहीत, या नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावर टीकेची झोड उठवली असून ते म्हणाले, की फारूख अब्दुल्ला कुठली राज्यघटना वाचतात तेच समजत नाही. खरेतर घटनेने ३७० कलम रद्द करण्याची परवानगी दिली आहे. ते रद्द करण्यासाठी संसदेत मतदानाचीही गरज नाही. राष्ट्रपती केवळ एक वटहुकूम काढून हे कलम रद्द करू शकतात.
काश्मीर प्रश्न पाकिस्ताना सातत्याने उपस्थित करीत असल्याबद्दल ते म्हणाले, की पाकिस्तान कधीही काश्मीर जिंकू शकणार नाही हे मी माझ्या रक्ताने लिहून देऊ शकतो. फारूख अब्दुल्ला यांच्या आईच्या वडिलांचे दफन लाहोर येथे झाले पण त्या ठिकाणी भेट देण्याची परवानगी त्यांना अद्याप मिळालेली नाही. भारत झेलम व चिनाब, सिंधू नदीचे पाणी वळवील या पाकिस्तानच्या भीतीबाबत ते म्हणाले, की काहीही झाले तरी भारत असे मार्ग अवलंबणार नाही. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० बाबत केलेल्या वक्तव्यानंतर आता राजकीय पक्षांनी त्यांची मते व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

Story img Loader