हिंदू देवी – देवतांविषयी समाजवादी पक्षाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी राज्यसभेत वादग्रस्त विधान केल्याने वाद निर्माण झाला. या विधानामुळे आक्रमक झालेल्या भाजप खासदारांनी नरेश अग्रवाल यांनी संसदेची माफी मागण्याची मागणी केली. तर अग्रवाल यांचे विधान कामकाजातून वगळण्यात आल्याने माफीचा प्रश्नच येत नाही असे समाजवादी पक्षाने म्हटले आहे.
राज्यसभा आणि लोकसभेत बुधवारी स्वयंघोषित गोरक्षकांच्या हिंसाचाराचा मुद्दा चांगलाच गाजला. राज्यसभेतील चर्चेदरम्यान सपाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी गाय आणि रामाविषयी वादग्रस्त विधान केले. हिंदू देवी- देवतांच्या नावावरुन त्यांनी वादग्रस्त विधान करत नव्या वादाला तोंड फोडले. अग्रवाल म्हणाले, १९९१ मध्ये राम जन्मभूमीसाठी आंदोलन सुरु होते. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आम्हाला मतदारांना स्पष्टीकरण द्यावे लागायचे. भाजपचे काही ठेकेदार जे स्वतःला विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते सांगायचे की जे आमच्याकडून प्रमाणपत्र घेऊन येणार नाही ते हिंदू नाही. यानंतर त्यांनी काही ओळी वाचून दाखवल्या ज्या रामभक्तांनी तुरुंगाच्या भिंतीवर लिहील्या होत्या असा दावा त्यांनी केला.
अग्रवाल यांच्या ओळी ऐकताच भाजप खासदार आक्रमक झाले. अनंत कुमार जागेवर उभे राहून अग्रवाल यांनी राज्यसभेची माफी मागावी अशी मागणी केली. अग्रवाल यांनी हिंदू समाजाचा अपमान केला आहे. असे विधान त्यांनी संसदेच्या बाहेर केले असते तर त्यांच्यावर खटलाच दाखल झाला असता असे त्यांनी सांगितले. तर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही राज्यसभेत या वादावर भाष्य केले. अग्रवाल यांनी हिंदू देवाचे नाव मद्याशी जोडले आहे. यासाठी त्यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. ‘राम का अपमान, नही सहेंगा हिंदूस्तान’ अशा घोषणा भाजप खासदारांनी याप्रसंगी दिल्या. शेवटी अग्रवाल यांचे विधान कामकाजातून वगळण्याच्या सूचना पीठासीन अधिकाऱ्यांनी दिल्या.
काँग्रेस खासदार गुलाम नवी आझाद यांनीदेखील गोरक्षकांच्या हिंसाचारावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. जुनैदची हत्या तसेच दलित समाजातील वृद्धाला मंदिरात प्रवेश नाकारण्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. या सर्व घटनांमध्ये कोणत्या पक्षाचा हात आहे हे समोर आले आहे असे गुलाम नवी आझाद यांनी सांगितले. गोरक्षेच्या नावाखाली गुंडगिरी सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला. व्हॉट्स अॅप मेसेजच्या आधारेही अटक केली जात असून असे झाल्यास प्रत्येकजण तुरुंगातच जाईल असे त्यांनी सांगितले. यावर केंद्र सरकारच्यावतीने मुख्तार अब्बास नकवी यांनी उत्तर दिले. जमावाकडून एखाद्या व्यक्तीची हत्या करण्याच्या घटनांना धार्मिक रंग दिला जात आहे. या घटना गुन्हेगारी स्वरुपाच्या आहेत. त्यांना राजकीय किंवा धार्मिक रंग देऊ नका असे आवाहन त्यांनी केले.