पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या ७ रेस कोर्स येथून सफदरजंग विमानतळापर्यंतच्या विशेष भुयारी मार्गाचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले असून, येत्या दोन महिन्यांत हा विशेष भुयारी मार्ग सुरू होणार असल्याचे समजते.
त्यामुळे या विशेष भुयारी मार्गाचा वापर करणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान असणार आहेत. दीड किलोमीटर लांबीचा हा भुयारीमार्ग दिल्लीतील केमाल अतातुर्क मार्ग, गोल्फ कोर्स येथून सफदरजंग विमानतळाशी जोडण्यात आला आहे.
पंतप्रधानांची सुरक्षा आणि त्वरित विमानतळावर पोहोचता येण्यासाठी २०१० साली या विशेष भुयारीमार्गाचे काम सुरू करण्यात आले होते. हा भुयारीमार्गाचे काम अखेरच्या टप्प्यात असल्याने या मार्गाचा नरेंद्र मोदींना वापर करता येणार आहे. यामार्गातून निवासस्थानापासून थेट सफदरजंग विमानतळावर पोहोचता येणार आहे. तेथून हेलिकॉप्टर द्वारे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्याचीही सोय करण्यात आली आहे.