१४ जुलैला फ्रान्समधल्या नाइस शहरात झालेल्या हल्ल्याबद्दल आता नवी माहिती समोर येत आहे. या हल्ल्याचा मुख्य सुत्रधार महंमद लाहोजज बॉहलेल हा गेल्या कित्येक महिन्यांपासून या हल्ल्याचा कट रचत होता. तसेच या कटात त्याच्या सोबत पाच जण देखील सहभागी होते.
१४ जुलैला फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस असतो. हा दिन साजरा करण्यासाठी नाइस या शहारात कित्येक लोक जमले होते. आतिबाजीचा कार्यक्रम संपल्यानंतर महंमद बॉहलेल याने गर्दीवर ट्रक चालवून अनेकांना आपल्या ट्रकखाली चिरडले होते. या हल्ल्यात ८४ हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणाचा अधिक तपास करत असताना महंमद हा या हल्ल्याची काही महिने आधीपासूनच योजना आखत असल्याचे समोर आले. तसेच २०१५ पासूनच या
कार्यक्रमावर त्याची नजर होती हे देखील त्याच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या फोटोवरून पोलिसांना समजले. या हल्ल्याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या पाचही जणांची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. हे पाचही जण याआधी कधीच गुप्तचर विभागाच्या रडारवर नव्हते. पण बॉहलेल यांच्या फोन संभाषणावरून मिळालेल्या माहितीनुसार या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. या पाचही जणांवर हत्या आणि दहशतवादी कृत्यात सामिल असल्याच्या आरोपांवरून खटला सुरू आहे.
नाइस हल्ल्याची इसिसने जबाबदारी स्वीकारत बॉहलेल याला इसिसचा शूर लढवय्या म्हणून घोषित केले होते. परंतु फ्रान्सने तो चालक इसिसचा असल्याचा कोणत्याच वृत्ताला दुजोरा दिला नाही. पकडण्यात आलेल्या पाचही आरोपींकडून अशा प्रकारची कोणतीच माहिती पोलिसांना मिळाली नाही. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांना ४०० हून अधिक पुरावे सापडले आहेत. या पुराव्यांच्या आधारे पोलीस अधिक तपास करत आहेत.
नाइस हल्ल्याचा ‘तो’ चालक कित्येक महिन्यांपासून रचत होता कट
राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमावर २०१५ पासून होती आरोपीची नजर
Written by लोकसत्ता टीम
First published on: 22-07-2016 at 17:37 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nice truck attack was planned for months