‘एनएसजी’च्या अहवालात चिंता व्यक्त
देशाच्या काही भागांतील नागरिकांकडून अद्याप दहशतवाद्यांना पाठिंबा मिळत असून तो थांबल्याशिवाय दहशतवादी कारवाया पूर्णपणे थांबणे शक्य नसल्याचे नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) या कमांडो पथकाने तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे.
‘एनएसजी’च्या दिल्लीजवळील मनेसार येथील तळावर ‘नॅशनल बॉम्ब डाटा सेंटर’ (एनबीडीसी) आहे. तेथे देशात झालेल्या सर्व बॉम्बस्फोटांची माहिती संकलित करून तिचे विश्लेषण केले जाते. या केंद्राने एप्रिल ते जून २०१६ या तिमाहीचा अहवाल नुकताच जाहीर केला. या अहवालात ‘इंप्रुवाइज्ड एक्प्लोझिव्ह डिव्हाइस’ (आयईडी) स्फोटांच्या माहितीचेही विश्लेषण केले आहे. त्यानुसार अनेक हल्ल्यांत जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांतील दहशतवाद्यांनी सरकारी दारुगोळा कारखान्यांत सुरक्षा दलांसाठी उत्पादन झालेल्या दारुगोळ्याचा वापर केल्याचे दिसून आले आहे. त्यातून हेच दिसून येते की या कारखान्यांतील काही व्यक्तींचे दहशतवाद्यांशी लागेबांदे आहेत. याबाबतही अहवालात चिंता व्यक्त केली आहे. जम्मू-काश्मीरमधील काही घटनांमध्ये दहशतवाद्यांनी चिनी बनावटीची स्फोटके आणि शस्त्रे वापरल्याची माहिती पुढे आली आहे.
चालू वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत देशभारत ९३ स्फोटांच्या घटना घडल्या आणि त्यात ३९ जणांचा मृत्यू झाला व १८५ जण जखमी झाले. तर गेल्या वर्षी याच काळाच अशा ९२ घटना घडल्या होत्या. त्यात ६० जण मृत्युमुखी पडले आणि २०६ जण जखमी झाले होते. म्हणजेच या काळात झालेल्या स्फोटांत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १ टक्क्य़ांनी वाढ झाली आणि मृतांच्या संख्येत १६ टक्क्य़ांना घट झाली. बहुतांशी स्फोटांत सामान्य नागरिक हेच दहशतवाद्यांचे मुख्य लक्ष्य होते.