जगभरात व्हॅलेंटाईन डेनिमित्त बाजारपेठा लाल रंगात रंगल्या असतानाच पाकिस्तानमध्ये इस्लामाबाद हायकोर्टाने प्रेमात भंग आणला आहे. इस्लामाबाद हायकोर्टाने पाकिस्तानमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यावर बंदी घातली असून आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी असे हायकोर्टाने म्हटले आहे.

इस्लामाबाद हायकोर्टात अब्दूल वहीद नामक व्यक्तीने व्हॅलेंटाईन डे विरोधात याचिका दाखल केली होती. प्रसारमाध्यम आणि सोशल मीडियावर व्हॅलेंटाईन डेचे जे प्रोमोशन केले जात आहे ते इस्लामी विचारधारेविरोधात असून त्याच्यावर तात्काळ बंदी घालावी असे याचिकेत म्हटले होते. सोमवारी झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने पाकिस्तानमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यावर बंदी घातली. याशिवाय प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियानेही व्हॅलेंटाईन डेचे प्रोमोशोन करणे तात्काळ थांबवावे असे हायकोर्टाने म्हटले आहे. पाकिस्तानमधील माध्यमांवर नियंत्रण ठेवणा-या ‘पेमरा’ने हायकोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी होत आहे की नाही यावर लक्ष ठेवावेही हायकोर्टाने स्पष्ट केले.