वित्तीय क्षेत्रामध्ये उत्तुंग झेप घेण्याच्या महत्त्वाकांक्षेने झपाटलेल्या दिल्लीतील २३ वर्षीय युवतीने पहिल्याच प्रयत्नात चार्टर्ड अकाऊंटंट (सीए), कंपनी सेक्रेटरी (सीएस) आणि कॉस्ट अकाऊंटंट या तीनही परीक्षा उत्तीर्ण होत नवे शिखर गाठले. पल्लवी सचदेव असे तिचे नाव असून वित्तीय क्षेत्रातील तीनही महत्त्वाच्या परीक्षा उत्तीर्ण होणारी ती देशातील सर्वात लहान मुलगी ठरण्याची शक्यता आहे.
आयसीआयसीआय बँकेच्या अध्यक्षा चंदा कोच्छर यांना आपला आदर्श मानणारी पल्लवी दिल्ली विद्यापीठातील पदवीधर आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर वित्तीय क्षेत्रातील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या ‘बाक्र्लेज्’ या वित्त संस्थेत तिला नोकरीही मिळाली आहे. एकदा एखादा विषय समजला की तो फारसा अवघड राहत नाही, असे पल्लवीने तीन परीक्षा एकाच वेळी उत्तीर्ण होणे अवघड गेले नाही का, या प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले. भविष्यातील योजना काय आहे असे विचारले असता, पुढील महिन्यात आपले स्वप्न असलेल्या ‘बाक्र्लेज्’ या इंग्लंडच्या वित्त संस्थेत रुजू होण्यासाठी आतुर असल्याचे ती म्हणाली.
समाजातून आजही मिळणारी दुय्यम वागणूक, विकृत नजरा, लैंगिक अत्याचार, कुटुंबात होणारी अवहेलना अशा अनेक अडचणी वर्षांनुवर्षे सहन करत आलेली स्त्री आज पुरुषाच्या तोडीस तोड काम करत आहेच; पण ध्येयासक्ती आणि मेहनत यांच्या जोरावर तिने यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत. दिल्लीची पल्लवी सचदेव आणि मुंबईची अश्विनी नेने या अशाच दोन ‘यशस्वीनी’..