मोबाईल वॉलेट कंपनी पेटीएमला ६ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. ४८ ग्राहकांनी ६ लाखांची फसवणूक केल्याची तक्रार पेटीएमने सीबीआयकडे नोंदवली आहे. मागील काही दिवसांपासून पेटीएमच्या सर्व्हरमध्ये अनेक अडचणी येत आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरातील लाखो लोक पेटीएम सेवेचा लाभ घेत आहेत. सध्या पेटीएमकडून सर्व्हर दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र यासाठी नेमका किती कालावधी लागेल, हे पेटीएमकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. याशिवाय सर्व्हरमधील बिघाडाचे कारणदेखील पेटीएमकडून सांगण्यात आलेले नाही.

नोटाबंदीनंतर अनेकांनी ऑनलाईन पेमेंट करण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे पेटीएमचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. नोटाबंदीनंतरच्या दुसऱ्याच दिवशी पेटीएमने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र वापरुन जाहिरातदेखील केली होती. रोख रकमेच्या तुटवड्यामुळे अनेकांनी पेटीएमचा पर्याय निवडला. गेल्या महिन्याभरात लाखो लोक पेटीएमकडे वळले. मात्र यातील ४८ लोकांनी पेटीएमला ६ लाखांचा गंडा घातला आहे.

अनेक छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी गेल्या महिन्याभरात पेटीएमचा वापर सुरू केला. रोख रक्कम उपलब्ध नसल्यामुळे पेटीएम सेवेला अनेकांनी पसंती दिली. मात्र आता अनेक दुकानदार आणि ग्राहकांना तांत्रिक कारणामुळे पेटीएम वापरण्यात अडचणी येत आहेत. सर्व्हर डाऊन होणे, इंटरनेटचा स्पीड कमी असणे, यामुळे व्यवहार पूर्ण होत नसल्याची तक्रार आता अनेकांकडून करण्यात येते आहे.

काही दिवसांपूर्वीच क्वॉलकॉम या चिपसेट निर्मिती करणाऱ्या कंपनीने भारतातील कोणतेही मोबाईल अॅप सुरक्षित नसल्याचे म्हटले होते. ‘भारतातील कोणतेही ई-वॉलेट आणि मोबाईल बँकिंग अॅप्लिकेशन हार्डवेअर दर्जाच्या सुरक्षेचा वापर करत नाही. हार्डवेअर दर्जाच्या सुरक्षेमुळे ऑनलाईन व्यवहार सुरक्षित होतात. मात्र भारतातील अॅपमध्ये याचा अभाव आहे,’ असे क्वॉलकॉमने म्हटले होते.

‘जगभरातील बहुतांश बँकिंग अॅप आणि ई-वॉलेट अॅप हार्डवेअर सुरक्षेचा वापर करत नाहीत. हे अॅप पूर्णपणे एँड्रॉईड मोडवर चालतात. त्यामुळे वापरकर्त्यांचे पासवर्ड अतिशय सहजपणे मिळवले जाऊ शकतात. याशिवाय वापरकर्त्यांच्या हातांचे ठसेदेखील सहजपणे मिळवता येतात. भारतातील डिजीटल वॉलेट्स आणि मोबाईल बँकिंग अॅपसाठी हा अतिशय चिंतेचा विषय आहे,’ असे क्वॉलकॉमचे वरिष्ठ संचालक उत्पादन व्यवस्थापकांनी सांगितले आहे.

 

Story img Loader