भारताचा ६८ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात दिल्लीतील राजपथावर संपन्न झाला. यावेळी भारतीय सैन्य जगाला आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवले. शिस्तबद्ध संचलन आणि श्वास रोखायला लावून धरायला लावणाऱ्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. यासोबतच राज्य सरकार आणि केंद्राचे विविध चित्ररथदेखील उपस्थितांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू होते.
अबूधाबीचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान राजपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. राजपुत्र शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राजपथावर स्वागत केले.
संयुक्त अरब अमिरातीच्या १७९ सैनिकांनी केलेले संचन हे यंदाच्या राजपथावरील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य होते. यासोबतच नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या कमांडोंनी पहिल्यांदाच राजपथावर संचलन करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नॅशनल सिक्युरिटी गार्डचे कमांडो अर्थात ब्लॅक कॅट्सचे संचलन अत्यंत दिमाखदार होते.