सौदी अरेबियामध्ये हिजाब परिधान न करता फोटो काढून तो सोशल मीडियावर अपलोड केल्याने पोलिसांनी एका तरुणीला अटक केली आहे. महिला संघटनांनी या तरुणीच्या धाडसाचे कौतुक केले असले तरी सोशल मीडियावर या तरुणीविरोधात संताप व्यक्त होत आहे. तिचा शिरच्छेद करा अशी मागणी कट्टरतावाद्यांनी केली आहे.
सौदी अरेबियामध्ये महिलांनी हिजाब परिधान करणे बंधनकारक असते. एका तरुणीने रियाधमधील प्रसिद्ध कॅफेबाहेर फोटो काढला. या फोटोमध्ये तिने हिजाब परिधान केले नव्हते. तरुणीच्या या धाडसी पावलाचे महिला संघटनांनी कौतुक केले असले तरी सौदीमधील कट्टरतावाद्यांना ही बाब फारशी रुचली नाही. महिलेचा शिरच्छेद करा इथपासून ते तिला कुत्र्यांसमोर फेका असे या कट्टरतावाद्यांचे म्हणणे होते. सौदीतील पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. पोलीस प्रवक्ते फवाझ अल मैमान यांनी दिलेल्या माहितीनुसार नैतिकता कायम राहावी आणि नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी आम्ही त्या महिलेला अटक केली आहे. सध्या त्या महिलेची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. महिलेने सौदीतील नियमांचे उल्लंघन केले आहे. लोकांनी इस्लाममधील शिक्षांविषयी समजून घेण्याची गरज आहे असे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसांनी या महिलेचे नाव जाहीर केलेली नाही. मात्र सोशल मीडियावर या महिलेचे नाव समोर आले आहे. मलाक अल शहरी असे या तरुणीचे नाव असून या तरुणीने महिला – पुरुष संबंधांवर उघडपणे भाष्यदेखील केले होते. वाद चिघळताच त्या तरुणी ट्विटर अकाऊंट डिलीट केले आहे. सौदी अरेबियामध्ये महिलांसाठी कठोर नियम आहेत. या देशात महिलांना गाडी चालवण्यावरही निर्बंध आहेत. या घटनेने सौदी अरेबियामधील महिला हक्कांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.